माउंटबॅटन, लॉर्ड लूई : (२५ जून १९००–२७ ऑगस्ट १९७९). भारतातील शेवटचा ब्रिटिश व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. त्यांचे पूर्ण नाव लूई फ्रान्सिस ॲल्बर्ट व्हिक्टर निकोलस ऑफ बॅटनबर्ग. लॉर्ड माउंटबॅटन हा प्रिन्स लूई ऑफ बॅटनबर्ग (१८५१–१९२४) यांचा धाकटा मुलगा. प्रिन्स लूई १८६२ पासून ब्रिटिश नौदलामध्ये होते. स्वकर्तृत्वावर त्यांनी डिसेंबर १९१२ मध्ये ब्रिटिश नौदलामध्ये प्रमुखपद मिळविले; पहिल्या महायुद्धाला तोंड फुटल्यानंतर ब्रिटिश नौदलाला पुरेसे यश मिळविता आले नाही. त्यामुळे प्रिन्स लूई यांच्यावर टीका होऊ लागली. बॅटनबर्ग ह्या जर्मन नावामुळे आणि लहानपण ऑस्ट्रियामध्ये गेलेले असल्यामुळे त्यांच्या राष्ट्रप्रेमाविषयी शंका घेतली जाऊ लागली. म्हणून ऑक्टोबर १९१४ मध्ये त्यांना नौदलप्रमुखपद सोडावे लागले. जर्मन द्वेषाची ही लाट पुढेही टिकून राहिल्याने राजाने आणि राजघराण्याशी संबंधितांनी आपली जर्मन नावे बदलावीत, असे शासनाने १९१७ मध्ये सुचविले. प्रिन्स लूई यांनी व्हिक्टोरिया राणीच्या नातीशी विवाह केल्यामुळे १९१७ मध्ये ते माउंटबॅटन बनले.

लूई (डिकी) माउंटबॅटन वयाच्या तेराव्या वर्षीच ऑझ्‌बर्न येथील रॉयल नेव्हल कॉलेजात दाखल झाले. जुलै १९१६ मध्ये त्यांनी प्रत्यक्ष नौदलात कॅडेट म्हणून प्रवेश केला. पुढे नौदलात त्यांना जे जे पद मिळाले, त्यावर आपल्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमटविला. मुख्यतः नौदलातील संदेशवहन आणि दूरसंदेश ह्यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला. दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा ‘केली’ (Kelly) ह्या जहाजाचा कॅप्टन म्हणून माउंटबॅटन काम पाहात असत. युद्धात ते जहाज निकामी झाल्यानंतर काही काळ त्यांनी इलस्ट्रियस ही विमानवाहू नौका सांभाळली. येथून पुढे त्यांच्या उत्कर्षाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.

पंतप्रधान विन्स्टन चर्चिल ह्यांनी १९४१ मध्ये तिन्ही सोनादलांच्या संयुक्त हालचालींचे सूत्रधार म्हणून माउंटबॅटनना नेमले. ह्या काळात यूरोपातील त्यांच्या कर्तृत्वाचा आणि संघटना-कौशल्याचा प्रभाव अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅन्क्लिन रुझव्हेल्ट यांच्यावर पडला. त्यामुळेच पुढे १९४३ मध्ये दक्षिणपूर्व (आग्नेय) आशियामधील दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने सुप्रीम कमांडर म्हणून माउंटबॅटन यांची नेमणूक केली. आग्नेय आशियामध्ये दोस्त राष्ट्रांचे सैन्य सगळीकडे पराभूत होत होते. त्यावेळी माउंटबॅटननी सैन्यामध्ये विश्वास निर्माण करून त्याचे धैर्य वाढविले. त्याचप्रमाणे भर पावसाळ्यात ब्रह्मदेशात जपानच्या सैन्याशी मुकाबला करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविली. त्यामुळे आग्नेय आशियातील दोस्त राष्ट्रांच्या सैन्याची प्रतिमा खूपच उंचावली. मात्र ह्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याची त्यांची योजना पूर्ण झाली नाही; कारण दोस्त राष्ट्रांनी अणुबॉम्बचा वापर करून युद्ध संपविण्याचा निर्णय घेतला. तरीही सिंगापूरमध्ये जपानी सैन्याची शरणागती माउंटबॅटननीच स्वीकारली. यशस्वी सेनानी म्हणून त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला. त्याचबरोबर बह्मदेश, सिंगापूर आणि इतर प्रदेशांच्या रहिवाशांशीही त्यांनी चांगले संबंध निर्माण केले. पश्चिमी साम्राज्यशाहीखाली असलेल्या देशांमध्ये युद्धानंतर राष्ट्रवादाला निर्णायक रूप आले आणि तेथील राष्ट्रवादी चळवळी प्रखर बनल्या. या चळवळींकडे पाहण्याचा माउंटबॅटन यांचा दृष्टिकोन उदार आणि समंजस होता. १९२० ते १९४५ या कालखंडात भारतात राष्ट्रवादी आंदोलन देशव्यापी झाले.

माउंटबॅटन यांच्या या उदार दृष्टिकोणामुळे महायुद्धानंतर निवडून आलेल्या क्लेमंट ॲटलींच्या मजूर पक्षाच्या शासनाने माउंटबॅटनना भारताचे व्हाइसरॉय म्हणून पाठविण्याचा निर्णय १९४७ मध्ये घेतला. सेनानी म्हणून यशस्वी ठरलेल्या माउंटबॅटनवर शासनप्रमुख होण्याची आणि भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्याची जबाबदारी पडली. मार्च १९४७ मध्ये माउंटबॅटन भारतात आले. ह्यावेळेस भारतातील परिस्थिती अत्यंत स्फोटक होती. हिंदु-मुस्लिम तणावांनी अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले होते. नौदलाचे बंड (१९४६), भारत छोडो आंदोलन आणि दुसऱ्या महायुद्धाचा ब्रिटनला बसलेला फटका यांमुळे भारतावर फार काळ नियंत्रण ठेवणे शक्य नाही, ह्याची जाणीव मजूर पक्षाच्या शासनाला झाली होती. म्हणूनच स्टॅफर्ड क्रिप्स-योजना व त्रिमंत्रि-योजना अयशस्वी झाल्यानंतरही ब्रिटिशांनी भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. माउंटबॅटन यांनी भारतातील जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ॲटलींच्या मागे लागून जून १९४८ पूर्वी स्वातंत्र्य देण्यात येईल, अशी घोषणा करवून घेतली.

प्रत्यक्षात स्टॅफर्ड क्रिप्स यांची आणि नंतरची त्रिमंत्रि-योजना ह्यांच्यावरील चर्चेतून काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र येणे अशक्य आहे, हे स्पष्ट झाले होते आणि फाळणीची अपरिहार्यता बहुतेक काँग्रेसने स्वीकारली होती. माउंटबॅटन यांनी प्रत्येक नेत्याशी स्वतंत्रपणे प्रदीर्घ चर्चा करून जवळजवळ सर्वच नेत्यांचा विश्वास संपादन केला. आकर्षक व्यक्तिमत्त्व, थंड डोक्याने युक्तिवाद करण्याची शैली, भारताच्या प्रश्नाबद्दलची कळकळ आणि इतर कोणत्याही व्हॉइसरॉयच्या तुलनेने माउंटबॅटन यांना मिळालेले विशेष अधिकार, यांमुळे त्यांना झटपट निर्णय घेणे शक्य झाले. भारतातील चिघळणारी परिस्थिती लक्षात घेऊन ३ जून १९४७ रोजी त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. इतक्या अल्प-मुदतीचे दडपण आल्याने काँग्रेस आणि लीगच्या नेत्यांना फाळणीच्या योजनेबद्दल शब्द फिरविता येणार नाही, अशी त्यांची अटकळ होती. फाळणी अटळ आहे, असे मत बनल्यानंतर अत्यंत धूर्तपणे, मुत्सद्देगिरीने आणि कार्यक्षम रीतीने त्यांनी संपूर्ण योजना राबवून १४ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र पाकिस्तान आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारत जाहीर करून सत्तांतर घडवून आणले. हे करीत असतानाच दोन्ही स्वतंत्र राष्ट्रे ब्रिटिश राष्ट्रकुलातच राहावीत, ह्यासाठी त्यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले.

काँग्रेस नेत्यांचा त्यांनी एवढा विश्वास संपादन केला, की स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली गेली (ऑगस्ट १९४७–जून १९४८). भारताच्या फाळणीबद्दल माउंटबॅटन ह्यांची भूमिका नंतर वादाचा विषय झाली असली, तरी त्यांचे भारताविषयीचे प्रेम वादातीत होते. प्रत्यक्ष फाळणीचा अप्रिय निर्णय त्यांनी अत्यंत कौशल्याने राबविला. तो राबवीत असताना ब्रिटिशांच्या हितसंबंधांना संरक्षण देण्याचे धोरणही त्यांनी कटाक्षाने पाळले.

भारतातून परत गेल्यानंतर १९४८ च्या जूनमध्ये ते पुन्हा नौदलाच्या सेवेत रुजू झाले. १९५२ ते १९५५ ह्या काळात ते भूमध्य समुद्राच्या क्षेत्रातील नाटोच्या नौदलाचे कमांडर इन्-चीफ होते. १९५५ मध्ये ते ब्रिटिश नौदलाचे प्रमुख (फर्स्ट सी लॉर्ड) बनले. १९५९ ते १९६५ पर्यंत संरक्षण विभागाचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) ह्या नात्याने तिन्ही सैन्य दलांच्या सुसूत्रीकरणाची फार महत्त्वाची कामगिरी त्यांनी पार पाडली आणि मग ते सेवानिवृत्त झाले.

माउंटबॅटन यांना राजघराण्याशी असलेल्या आपल्या नात्याचा फार अभिमान होता. देखण्या व्यक्तिमत्त्वाच्या माउंटबॅटन ह्यांचा विवाह १९२२ मध्ये एड्‌विना ॲश्ली (१९०१–६०) ह्या श्रीमंत आणि सौंदर्यसंपन्न युवतीबरोबर झाला होता. माउंटबॅटन आणि एड्‌विना दोघेही त्याकाळी त्यांच्या उदार, काहीशा डावीकडे झुकलेल्या विचारांबद्दल प्रसिद्ध होते. प्रत्यक्षात त्यांचा विचार आणि कार्य दोन्ही जहाल किंवा समाजवादी नव्हे तर मानवतावादी स्वरूपाचे होते. माउंटबॅटन दांपत्य आणि पाट्रिशिया व पॅमेला ह्या त्यांच्या मुली. ह्यांनी भारतीय जनतेला आपलेसे करून टाकले होते. सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचा त्यांचा गुण हेच त्याचे मुख्य कारण.

पत्नीच्या मृत्यूनंतर आणि निवृत्तीनंतर माउंटबॅटन काहीसे शांत आणि एकाकी जीवन ते कंठत होते. आयर्लंडमधील त्यांच्या डोनेगल उपसागरातील घराजवळ मासेमारी बोटीमध्ये आयरिश दहतशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटामध्ये त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Campbell-Johnson, Alan, Mission with Mountbatten, London, 1951.
  • Collins, Larry ; Dominique, Lapierre, Mountbatten and the Partition of India,  Vol. I : March 22-August 15, 1947, Delhi, 1982.
  • Das, Manmath Nath, Partition and Independence of India : Inside Story of the Mountbatten Days, Delhi. 1982.
  • Hatch, Alden, The Mountbattens, London, 1966.
  • Hodson, H. V. The Great Divide : Britain-India-Pakistan, London, 1969.
  • Moon, Penderal, Divide and Quit, London, 1961.
  • Terraine, John, The Life and Times of Lord Mountbatten, London, 1980.
  • Ziegler, Philip, Mountbatten, London, 1985.
  • तळवलकर, गोविंद, सत्तांतर : १९४७, खंड – २, मुंबई, १९८३.