ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील एक राजपूत संस्थान. क्षेत्रफळ ४,३२३ चौ. किमी. चतु:सीमा उत्तरेस  सिरोही  आणि उदयपूर, पूर्वेस दुर्गापूर, दक्षिणेस आणि पश्चिमेस पूर्वीचा मुंबई इलाखा व बडोद्याचा काही भाग. या संस्थानांचा नैर्ऋत्येकडील भाग सपाट व वालुकामय आहे. इतरत्र सुपीक प्रदेश, वृक्षाच्छादित डोंगर व नद्या आढळतात. तीळ, ऊस इ. मुख्य पिके होत.

ज्ञात इतिहासानुसार ८९० ते ९७० पर्यंत हे संस्थान गहलोत (गहिलोत) घराण्याच्या अंमलाखाली होते.  त्यानंतर सु. २०० वर्षे परमार घराण्याने या भागावर राज्य केले. अमरसिंह या शेवटच्या परमार राजाने हे संस्थान हाथी सोर्द या कोळ्याच्या स्वाधीन केले. तथापि त्याच्या मुलापासून सामेत्राचा राव सोनाग याने हे संस्थान जिंकून घेतले. या घराण्याच्या बारा पिढ्यांनी या भागावर राज्य केल्यावर, मुरादबक्ष या गुजरातच्या मोगल सुभेदाराने १६५६ मध्ये या घराण्यातील अखेरचा राजा राव जगन्नाथ यास हुसकावून लाविले. १७२८ मध्ये जोधपूरच्या राजाच्या आनंदसिंह व रामसिंह या दोघा बंधूंनी या भागावर आपली सत्ता प्रस्थापित केली. नंतर पेशव्यांच्या आज्ञेवरून दमाजी गायकवाडच्या वतीने बचाजी दुवाजीने ईडर संस्थान ताब्यात घेतले. तथापि फार काळ ते त्यांच्याकडे राहू शकले नाही. रामसिंहाने पुन्हा ईडरचा ताबा मिळविला. त्याचा पुतण्या शिवसिंह हा या भागाचा कारभार पाहू लागला. त्याच्या मृत्यूनंतर (१७९१) गादीबद्दल तंटे सुरू होऊन त्याच्या तीन मुलांना अनुक्रमे अहमदनगर, मोडासा व वायद हे प्रांत मिळाले. तथापि ही सत्ता फार काळ टिकू शकली नाही.

ब्रिटिश सरकारने १८४८ मध्ये हे तीनही प्रांत पुन्हा एकत्र केले व राठोड घराण्यातील प्रतापसिंहास ईडरच्या गादीवर बसवून (१९०२) महाराजा ही पदवी दिली. त्याच्या मृत्यूनंतर दौलतसिंह गादीवर आला. हिंमतसिंह हा या संस्थानाचा शेवटचा अधिपती.