माराया टेरिसा : (१३ मे १७१७ — २९ नोव्हेंबर १७८०). ऑस्ट्रिया, बोहीमिया व हंगेरीची राणी आणि पवित्र रोमन साम्राज्याची महाराणी. तिचा जन्म व्हिएन्ना येथे हॅप्सबर्ग राजकुटुंबात झाला. हॅप्सबर्गच्या सहाव्या चार्ल्सची ती ज्येष्ठ कन्या. चार्ल्सला मुलगा नसल्यामुळे त्याची सर्व भिस्त या मुलीवर होती. म्हणून त्याने राजकन्येला योग्य असे सर्व शिक्षण दिले आणि तिच्या इच्छेनुरूप लॉरेन्सच्या ड्युक फ्रान्सिस स्टिफन याबरोबर विवाह केला (१७३६). या दांपत्याला एकूण सोळा मुले झाली. त्यांपैकी दुसरा जोसेफ, दुसरा लीओपोल्ट आणि मारी आंत्वानेत ही तीन मुले इतिहासात प्रसिद्धीस आली.

मारायाचे वडील २० ऑक्टोबर १७४० मध्ये हॅप्सबर्ग गादीला वारस न ठेवता आकस्मिक निधन पावले. चार्ल्सने यूरोपीय राष्ट्रांच्या संमतीने मारायाला गादी मिळाली, अशी व्यवस्था केली होती; पण प्रशियाचा फ्रीड्रिख यास ही गोष्ट अमान्य होती. याशिवाय बव्हेरियाचा चार्ल्स ॲल्‌बर्ट, सॅक्सनीचा तिसरा ऑगस्टस व स्पेनचा पाचवा फिलिप हे हॅप्सबर्गसाठी वारस म्हणून पुढे आले. त्यातून ऑस्ट्रियन वारसा युद्धास (१७४०–४८) तोंड फुटले. या युद्धात तिने अत्यंत चाणाक्षपणे परिस्थिती हाताळून एक्स ला-शपेलच्या तहान्वये (१७४८) आपल्या हक्कास मान्यता मिळवून हे वारसा युद्ध थांबले.

हे संकट टळल्यावर ती पूर्णतः ऑस्ट्रियाची सम्राज्ञी बनली. तत्पूर्वीच तिने राज्यकारभारात फ्रान्सिस यास काही अधिकार देऊन सहसत्ताधीश बनविले (१७४५). त्याच्याकडे काही महत्त्वाची खाती सुपुर्द करण्यात आली. त्यामुळे फ्रान्सिस हा जरी बादशाह झाला, तरी खरी सत्ता मारायाच्या हाती होती. त्यानंतर लष्कर, व्यापारवृद्धी आणि कृषी उत्पन्न यांत तिने लक्ष केंद्रित केले आणि ऑस्ट्रियाची आर्थिक स्थिती भरभक्कम केली. याचबरोबर तिने पूर्वेकडे साम्राज्य वाढविले, सरदारांचे महत्त्व कमी करून त्यांना नोकरशाहीत गुंतविले आणि केंद्रसत्ता बळकट केली. फ्रिड्रिख द ग्रेटने गिळंकृत केलेला सायलीशियाचा प्रदेश मिळविण्याची तिला दुर्दम्य इच्छा होती. या सर्व कार्यात तिचा मुख्य प्रधान कौनिट्‌स याने सॅक्सनी, स्वीडन व रशिया यांबरोबरचे मैत्रीचे संबंध दृढतर करून महत्त्वाची कामगिरी बजावली आणि परराष्ट्रीय संबंधात जुना शत्रू असलेल्या फ्रान्सबरोबरही मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. पण सायलीशिया हा भाग तिला मिळाला नाही. उलट यामुळे इंग्‍लंड आणि प्रशिया हे देश दुखावले गेले व सप्तवार्षिक युद्धाला (१७५६–६३) प्रारंभ झाला. तेव्हा खड्या सैन्याचे महत्त्व जाणून तिने सैन्याची व प्रशासनाची पुनर्रचना केली. उत्पन्न वाढवून राज्याला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले. या युद्धाच्या वेळी मारायाने धैर्याने त्यास तोंड दिले आणि कोणतीही मानहानी न स्वीकारता सन्माननीय तोडगा काढून हे युद्ध संपले. तिचा पती फ्रान्सिस १७६५ मध्ये मरण पावला. तेव्हा ती सार्वजनिक जीवनातून अलिप्त झाली व आपल्या मुलाकडे काही अधिकार देऊन उर्वरित आयुष्य तिने जवळजवळ विरक्त अवस्थेत घालविले. पोलंडच्या विभाजनाला (१७७२) तिचा विरोध होता, तरीही प्रशिया आणि रशिया यांच्यामुळे फाळणी झाली. तेव्हा ऑस्ट्रियाला गॅलिशिया व लोडोमेरिया हे भाग मिळाले.

मारायाने परराष्ट्रीय धोरणाबरोबर देशांतर्गत अनेक सुधारणा केल्या. मुलकी सेवेत सुधारणा करून तिने केंद्रीय मंडळ स्थापन केले, तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाची सार्वजनिक आरोग्यसेवेशी सांगड घातली. नवीन विधिसंहिता निर्माण करून (१७६८) न्यायपद्धतीत सुलभता आणली. साम्राज्यात एकसूत्रीपणा आणला; शिक्षणात फेरफार केले. ती स्वतः जरी कॅथलिक चर्चची निष्ठावान अनुयायी होती, तरीसुद्धा तिने धर्मसत्तेचे वर्चस्व कमी करून राजसत्तेचे महत्त्व वाढविले; तसेच करपद्धतीत बदल घडवून आणून अमीर-उमराव व धर्मगुरूंवरही कर लादले.

मारायाच्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत ऑस्ट्रियावर अनेक राजनैतिक दडपणे आली आणि वारसायुद्ध, सप्तवार्षिक युद्ध यांसारखे आणीबाणीचे प्रसंग गुदरले; परंतु या सर्वांतून तिने आपल्या धैर्यशील नेतृत्वाने मार्ग काढले आणि अनेक सुधारणा करून साम्राज्याचे विभाजन वाचविले. पोलंडच्या विभाजनामध्ये ती नाखुशीने सहभागी झाली. व्यक्तिगत आयुष्यात प्रेमळ, धार्मिक आणि कुटुंबवत्सल अशी तिची ख्याती होती. यूरोपची एक थोर सम्राज्ञी व यूरोपच्या अनियंत्रीत राजसत्तेच्या कालखंडाची प्रतीक म्हणून तिचे नाव इतिहासात प्रसिद्ध आहे.

व्हिएन्ना येथे किरकोळ आजारानंतर ती मरण पावली.

संदर्भ :

  • Crankshaw, Edward, Maria Theresa, New York, 1970.
  • Pick, Robert, Empress Maria Theresa : the Earlier Years, 1717-1757, New York, 1966.