ॲलरिक, पहिला : (३७० — ४१०). व्हिसिगॉथ टोळीचा राजा. रोमन सम्राट पहिला थीओडोशियस याच्या पदरी असणाऱ्या व्हिसिगॉथ पलटणीचा हा प्रथम प्रमुख सेनापती होता. थीओडोशियसच्या मृत्यूनंतर व्हिसिगॉथांनी बंड पुकारले आणि ॲलरिक ह्यास आपला नेता निवडले. तेव्हा दुसरा नेता अथॅनरिक याला बाजूस सारून ॲलरिकने सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. ह्यानंतर सु. ३९५ मध्ये त्याने थ्रेस, मॅसिडोनिया व ग्रीस ह्या प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या व ते प्रदेश उद्‌ध्वस्त केले.

पुढे तो रोमन सेनापती स्टिलिकोच्या प्रतिकारामुळे पूर्वेकडे वळला व त्याने ईपायरस आपल्या ताब्यात घेतले. ४०१ च्या सुमारास त्याने इटलीवर पहिली स्वारी केली. स्टिलिकोबरोबरच्या एप्रिल ४०२ च्या युद्धानंतर त्याने माघार घेतली. त्यानंतर त्याने पुन्हा ४०३ मध्ये रोमकडे मोर्चा वळविला, पण व्हेरोना येथे त्याचा पराभव झाला. स्टिलिकोच्या मृत्यूनंतर, त्याने सम्राट होनोरिअसकडून खंडणी मागितली. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तेव्हा ॲलरिकने खुद्द रोममध्ये जाळपोळ करून अमाप लूट मिळविली. त्यानंतर त्याने सिसिलीमार्गे आफ्रिकेकडे मोर्चा वळविला. पण आकस्मिक आलेल्या वादळात व्हिसिगॉथांचे आरमार नष्ट झाले.

ॲलरिक आजारी पडून मरण पावला. बूझेंटॉ नदीच्या पात्रात ॲलरिकचे त्याच्या सर्व संपत्तीसह दफन करण्यात आले. या संपत्तीचा कुणालाही शोध लागू नये म्हणून थडगे बांधणाऱ्या सर्व गुलामांची कत्तल करण्यात आली, अशी एक दंतकथा प्रचलित आहे.