लूई, चौदावा : (५ सप्टेंबर १६३८ – १ सप्टेंबर १७१५). फ्रान्सचा मध्ययुगातील श्रेष्ठ व लोकहितैषी राजा. बूर्बाँ  घराण्यातील तेरावा लूई व राणी ॲन (ऑस्ट्रियाची राजकन्या) या दांपत्यापोटी सेंट-जर्मन या गावी त्याचा जन्म झाला. तेराव्या लूईच्या मृत्यूनंतर (१६४३) वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी तो फ्रान्सच्या गादीवर बसला. तो सज्ञान होईपर्यंत राजमाता ॲन आणि पंतप्रधान झ्यूल माझारँ हे राज्यकारभार पाहात होते.

माझारँ याने त्यास लष्करी शिक्षणाबरोबर राजपुत्रास योग्य असे विद्याविषयक शिक्षण दिले. यावेळी फ्रान्समधील असंतुष्ट सरदारांनी राजाचे अधिकार सीमित करण्यासाठी विशेषत: आर्मांझां रीशल्य व माझारँ यांनी लादलेल्या आर्थिक भारांविरुद्ध अनेक सशस्त्र उठाव केले (१६४८-५३). ते फ्राँद या नावाने प्रसिद्ध आहेत. सुरुवातीस उठाववाल्यांनी राणी ॲनवर दडपण आणले; परंतु दरम्यान तीस वर्षांच्या युद्धातून वेस्टफेलियाच्या शांतता तहाने (१६४८) फ्रान्सचे सैन्य मुक्त झाले. तेव्हा उठावाविरुद्ध शासनाने कडक धोरण अवलंबिले. स्पेनने फ्राँद-सरदारांना मदत केली; परिणामत: फ्रान्स-स्पेन यांत संघर्ष उद्भवला आणि तो पुढे दहा वर्षांनी पिरेनीजच्या तहाने (१६५९) संपुष्टात आला. माझारँने सरदार, धर्मगुरू आणि सधन व्यापारी वर्ग यांचा विरोध अशा प्रकारे मोडून काढला; फ्रान्सचे लष्करी वर्चस्व प्रस्थापित केले आणि सरदारंचा पाणउतारा होऊन राजाचा अधिकार सर्वमान्य झाला. या तहानुसार स्पेनची राजकन्या माराया टेरिसा हिचा विवाह लूईबरोबर करावा आणि हुंड्याची रक्कम न मिळाल्यास तिचा स्पेनसंबंधीचे सर्व वारसा-हक्क लूईला प्राप्त व्हावेत, असे ठरले. या अटीप्रमाणे लूईने माराया टेरिसाशी विवाह केला (जून १६६०). त्याचे माझारँच्या मारी मांचिनी या भाचीवर प्रेमे होते, पण फ्रान्सची राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी त्याने मांचिनीला नकार दिला. टेरिसापासून त्याला सहा मुले झाली. त्यांपैकी फक्त ज्येष्ठ मुलगा जगला, तोही १७१२ मध्ये मरण पावला. लूईच्या रंगेल जीवनाविषयी अनेक कथा-वदंता प्रसृत झाल्या आहेत. त्याच्या रक्षांपैकी व्हेलर, मार्किस द माँतेस्पॉन, मँतनॉन या प्रसिद्ध असून कोर्ट दरबारी त्यांना प्रतिष्ठा होती. त्यांना लूईपासून मुले झाली आणि त्या मुलांना त्याने वैध वारस ठरवून पुढे शाही मानसन्मान दिले. माराया टेरिसाच्या मृत्यूनंतर कवी पॉल स्कॉरोन याची विधवा पत्नी फ्रान्स्वा (नंतरची मादाम द मँतनॉन) या मैत्रिणीशी त्याने गुप्तपणे अनुलोम विवाह केला (१६८३ वा १६८४). ती अखेरपर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ राहिली. लूईवर तिचा मोठा प्रभाव होता आणि राणी टेरिसाची तिच्यावर प्रथम मर्जी होती.

माझारँच्या मृत्यूनंतर (९ मार्च १६६१) लूईने शासकीय सूत्रे हाती घेतली. राज्यमंडळास याविषयी निवेदन करताना ‘आपण स्वत:च राज्यसंस्था आहोत’ (आय् ॲम् द स्टेट) असे त्याने प्रतिपादन केले आणि राज्यपद ही ईश्वरदत्त देणगी आहे, असे तो मानू लागला. त्याला फ्रान्स्वा लूव्हा, ह्यूजीस लिआँ, झां कॉलबेअर यांसारखे कर्तृत्ववान व कार्यक्षम मंत्री लाभले. कॉलबेअरच्या आर्थिक धोरणांमळे फ्रान्सची प्रगती वेगाने झाली. त्याने व्यापारवादी तत्त्वावर उद्योग आणि वाणिज्य यांची वाढ केली; आरमारात सुधारणा केल्या व वसाहतीत व्यापार वाढविला; लष्कराची पुनर्रचना लूव्हा या संरक्षण मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामुळे राजसत्ता मजबूत झाली. त्याने पॅरिसमध्ये परिणामकारक पोलीसव्यवस्था कार्यवाहीत आणली. बूँर्बा घराण्याची प्रतिष्ठा वाढविणे, फ्रान्सच्या सीमा विस्तृत करणे, फ्रान्सचा यूरोपात दरारा निर्माण करणे हे त्याच्या परराष्ट्रीय धोरणाचे मुख्य सूत्र होते. त्याकरिता त्याने राज्यविस्ताराचे धोरण अंमलात आणले. तो १६६७ पासून पूर्णत: युद्धात गुंतला आणि ही युद्धे त्याच्या अखेरपर्यंत अखंड चालू होती. स्पेन (१६६७), हॉलंड (१६७२) आणि अखेरच्या काळातील इंग्लंड, हॉलंड, ऑस्ट्रिया आणि पवित्र रोमन साम्राज्य यांविरुद्धची ही युद्धे फ्रान्सला तशी महाग पडली आणि आर्थिक हानीही झाली; तथापि रिझविकच्या शांतता तहाने (१६९७) या युद्धांना पायबंद बसला. स्पेनच्या वारसा हक्काचे युद्ध (१७०१-१४) हे लूईच्या जीवनातील अखेरचे महत्त्वाचे युद्ध. याने लूईच्या नातवास स्पेनची गादी मिळाली; परंतु फ्रान्स आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या कमकुवत झाला. फ्रान्सच्या आधिपत्याखाली अॅल्सेस-लॉरेन, स्पेन, इंडीज बेटे व काही इटालियन वसाहती आल्या.

लूईच्या वेळी प्येअर कोर्नेय, झां मोल्येर, ला फाँतेन, झां रासीन, मारी द सेव्हिन्या या साहित्यिकांनी फ्रेंच वाङ्मय आपल्या लेखणीने समृद्ध केले. त्यांना लूईने सढळ हाताने मदत केली. मोल्येरची नाटके प्रतिगाम्यांच्या विरोधी असतानाही रंगभूमीवर आली. फ्रान्सच्या सीमेवर लहानमोठे किल्ले बांधून त्याने संरक्षक फळी उभी केली. फ्रान्सची वैभवशाली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी व्हर्सायला भव्य आणि अप्रतिम राजवाडा बांधला. त्याच्या दरबाराचा थाट भपकेदार होता. व्हर्साय, मार्ली-लर्न्वा, ट्रिआनां इ. शहरांत त्याने राजप्रासाद, चर्चे, उद्याने आणि भव्य प्रासाद बांधून वास्तुकलेबरोबरच उद्यान वास्तूंस उत्तेजन दिले. जे. एच. मासाँर हा तत्कालीन प्रसिद्ध वास्तुविशारद. व्हर्सायच्या राजवाड्यातील कारंजांसाठी पाणी पुरविण्याची अभिनव कल्पना लूईने ट्रिआनां येथे जलप्रेरित यंत्र (हायड्रोलिक इंजिन) बसवून कार्यवाहीत आणली. हे जगातील एक आश्चर्य मानले जाते. त्याने संगीत, चित्रकला, ललितकला यांनाही प्रोत्साहन दिले व कलाकारांना राजाश्रय दिला. धार्मिक बाबतीत प्रथम तो सहिष्णू होता; परंतु मादाम द मँतनॉनच्या प्रभावामुळे किंवा कॅथलिकांना सवलती दिल्याने परराष्ट्रीय धोरणातील काही हेतू सफल होतील, या भावनेने त्याने कट्टर कॅथलिकवादी भूमिका अंगीकारली आणि प्रॉटेस्टंटांना (ह्यूगनॉत्स) नान्तेच्या फर्मानाप्रमाणे दिलेल्या सवलती रद्द केल्या (१८ ऑक्टोबर १६८५). त्यामुळे फ्रान्समधून अनेक प्रॉटेस्टंट इंग्लंड, हॉलंड, जर्मनी आदी देशांत गेले.

अखेरच्या दिवसांत लूईची प्रकृती खालावली. त्याच्यावर तीन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या (१६८४-८६). याच काळात त्याची पत्नी, मुलेबाळे, नातू, पणतू यांपैकी अनेकजण मरण पावले. शारीरिक व्यथा आणि आप्तेष्टांचा विरह यांमुळे तो अधिकच खचला. त्यात त्यास कोताची व्यथा जडली. तो व्हर्साय येथे मरण पावला. अखेरीस त्यास एकूण परिस्थितीची जाणीव झाली होती. मरतेसमयी त्याने आपला पणतू व वारस पंधरावा लूई याला पुढील उपदेश केला : ‘माझ्याप्रमाणे तू वास्तू बांधण्याचा आणि युद्धे खेळण्याचा हव्यास धरू नकोस’. चौदाव्या लूईची प्रदीर्घ कारकीर्द यूरोपच्या इतिहासात ‘लूई युगʼ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचा उल्लेख लूई द ग्रेट किंवा ग्रँड मॉनर्क असा करतात.

प्रभावी व रुबाबदार व्यक्तिमत्त्व, उत्तम प्रकृती, तीव्र स्मरणशक्ती आणि कामाचा उरक यांमुळे तो आपले निर्णय काटेकोरपणे अंमलात आणी. रंगेल व रसिक असूनसुद्धा त्याने प्रशासनात इतरांना, विशेषत: आपल्या प्रेयसींना, कधी हस्तक्षेप करू दिला नाही. तत्कालीन यूरोपच्या सामाजिक जीवनातील संकेत आणि चालीरीती यांवर लूईच्या राजदरबाराची छाप होती, असे मानले जाते. त्या वेळी संसदेचे (स्टेट्स जनरलचे) अस्तित्व नाममात्रच होते; त्यामुळे तिच्याकडे फक्त न्यायपालिकेचे काम होते आणि मंत्री हे मुख्यत: दुय्यम अधिकारी असत.

लूईच्या कारकीर्दीत कला, साहित्य, व्यापार, लष्कर, उद्योग इ. बहुविध क्षेत्रांत सुधारणा झाल्या; तथापि सततच्या युद्धांमुळे व शाही इतमामामुळे तिजोरीवर ताण पडला. परिणामत: हा खर्चाचा बोजा मुख्यत: शेतकर्‍यांना कररूपाने द्यावा लागत असल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष पसरला. फ्रेंच सरदार व्हर्सायलाच कायमचे ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचा कुळांशी संपर्क तुटला आणि अनुपस्थित मालकीचे स्वरूप प्राप्त झाले. साहजिकच त्यातून वर्गविग्रहाची भावना निर्माण झाली. या स्फोटक परिस्थितीतूनच पुढे फ्रेंच राज्यक्रांतीची आपातत: पार्श्वभूमी तयार झाली आणि यूरोपमध्ये फ्रान्सविरोधी राष्ट्रांची एकसंध फळी निर्माण झाली. तिने जर्मन राष्ट्रवादाची बीजे पेरली.

लूईच्या प्रदीर्घ कारकीर्दीत फ्रान्समध्ये मध्यवर्ती सत्तेचे अमर्यादित केंद्रीकरण झाले होते आणि आर्थिक व लष्करी दृष्ट्या फ्रान्स एक प्रबळ राष्ट्र बनले होते. त्यामुळे लूईने आक्रमक युद्धे करून फ्रान्सचा प्रादेशिक विस्तार घडवून आणला. याशिवाय ललितकला, साहित्य, स्थापत्य, शास्त्रीय ज्ञान इत्यादींचा विकास होऊन कायद्याचे संहितीकरण करण्यात आले. त्यामुळे फ्रान्स ही यूरोपातील एक अग्रगण्य सत्ता बनली. ‘राज्यसंस्था म्हणजे मीच आणि राजपद ही ईश्वरदत्त देणगी आहे’ या तत्त्वाचा परमोच्च बिंदू लूईच्या सर्वंकष राजेशाहीतून व्यक्त होतो.

संदर्भ :

  • Cronin, Vincent, Louis XIV, Ontario, 1964.
  • Durant, Will; Durant, Ariel, The Age of Louis XIV, New York, 1963.
  • Goubert, Pierre, Trans. Carter, Anne, Louis  XIV and Twenty Million Frenchmen, New York, 1970.
  • Jones, Mark, Medals of the Sun King, London, 1979.
  • Mitford, Nancy, The Sun King, London, 1966.
  • Sonnino, Paul, Ed. and Trans. Memories for the Instruction of the Douphin, New York, 1970.