मिथिल उपस्थापित फिनॉल संयुगांना क्रेसॉल (C7H8O) असे म्हणतात. ही फिनॉल या गटातील संयुगे आहेत. क्रेसॉलचे ऑर्थो-, मेटा- आणि पॅरा- असे तीन समघटक (Isomer) आहेत.

गुणधर्म : क्रेसॉल रंगहीन असते. क्रेसॉलचे हवेत संथ गतीने ऑक्सिडीकरण होऊन त्याचा रंग तांबूस पडतो. यांना फिनॉलसारखा लक्षणीय वास असतो.

ऑर्थो-क्रेसॉलचा विलयबिंदू २९.८ से. आणि उत्कलनबिंदू १९१ से. इतका आहे. सामान्य तापमानाला (३० से.) हा द्रवरूप असतो.

मेटा-क्रेसॉलचा विलयबिंदू ११.८ से. आणि उत्कलनबिंदू २०२ से. इतका आहे. सामान्य तापमानाला (३० से.) हा द्रवरूप असतो.

पॅरा-क्रेसॉलचा विलयबिंदू ३५.५ से. आणि उत्कलनबिंदू २०१.९ से. इतका आहे. सामान्य तापमानाला (३० से.) हा मऊ स्थायुरूप असतो.

तीनही क्रेसॉल पाण्यात अल्प प्रमाणात द्रावणीय असतात (सु. २.० ग्रॅ. /१०० मिलि.). ते सौम्य अम्लधर्मी आहेत (pKa  = १० — १०.३).

उत्पादन : क्रेसॉलचे उत्पादन प्रामुख्याने कोल टारच्या ऊर्ध्वपातनाने करतात. या प्रक्रियेत तिन्ही क्रेसॉल एकत्र बाहेर पडतात. या मिश्रणालाही क्रेसॉल किंवा ट्रायक्रेसॉल म्हणतात. अंशत: ऊर्ध्वपातनाने तीनही समघटक विलग करतात.

याशिवाय फिनॉलचे मिथिलीकरण (Methylation), क्लोरोटोल्यूइनचे जलीय विच्छेदन (Hydrolysis) किंवा टोल्यूइनचे सल्फॉनीकरण व जलीय विच्‍छेदन या पद्घतींनी देखील हे समघटक मिळविता येतात.

उपयोग : क्रेसॉल जीवाणूनाशक असल्यामुळे घरात किंवा रुग्णालयातील स्वच्छतेकरिता क्रेसॉलचे विरल द्रावण वापरतात. क्रेसॉलपासून अनेक महत्‍त्वाची संयुगे बनवता येतात.‍ ब्युटिलेटेड क्रेसॉल प्रतिऑक्सिडीकारक आहे. ॲमिल मेटा-क्रेसॉल व क्लोरो मेटा-क्रेसॉल हे जंतुनाशक आहेत.

मानवी शरीरावरील दुष्परिणाम : क्रेसॉले ही फिनॉल वर्गातील रसायने असल्यामुळे शरीराला विषारी आहेत. त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेचा दाह होतो. श्वासाद्वारे किंवा तोंडावाटे शरीरात गेल्यास यांचे फार घातक परिणाम दिसून येतात.

पहा : फिनॉले.