रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण : जागतिक पातळीवरील आरोग्याचा दर्जा आणि रोगांचे प्रमाण व प्रादुर्भाव यांचा मापदंड ठेवणारी प्रणाली म्हणजे ‘आयसीडी’. तिच्याद्वारे सर्व रोगांचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी एक विशिष्ट संकेतावली तयार केली असून तीत शरीराचे बाधित अवयव व विविध रोगांची लक्षणे यांसंदर्भातील माहिती अंतर्भूत आहे. मानवी रोगांचे वर्गीकरण करणाऱ्या या प्रणालीच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटने (आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय संस्था) आयसीडीची पहिली आवृत्ती इंटरनॅशनल कॉजेस ऑफ डेथ या नावाने १८९३ मध्ये प्रकाशित केली. तीत सर्व ज्ञात रोगांचे व जखमांचे वर्गीकरण असून प्रत्येक रोगाचे निदानात्मक वैशिष्ट्यासह स्पष्टीकरण दिले आहे.

१९४८ पासून जागतिक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) आयसीडी प्रकाशित करण्याची जबाबदारी स्वीकारली. या संघटनेद्वारे आयसीडीची सहावी आवृत्ती प्रकाशित झाली. या संघटनेने १९६० च्या सुरुवातीपासूनच मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिक आजारांचे निदान आणि वर्गीकरण यांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने विशेष कार्य केले आहे. संघटनेद्वारे प्रकाशित झालेल्या आठव्या आवृत्तीमध्ये विविध मानसिक विकारांचा समावेश करण्यात आला असून तीत समाविष्ट विकारांचे वर्ग परिभाषित करणारी सूचीही तयार केली आहे. आयसीडी –१० ही जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेली रोग व संबंधित आरोग्यसमस्या यांच्या आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय वर्गीकरणाची दहावी आवृत्ती होय.

संदर्भ : 

  • https://www.who.int/classifications/icd/en/HistoryOfICD.pdf

समीक्षण : विवेक बेल्हेकर; मनीषा पोळ