हल, क्लार्क लेनर्ड : (२४ मे १८८४–१० मे १९५२). अमेरिकन नववर्तनवादी मानसशास्त्रज्ञ. अक्रॉन, न्यूयॉर्क येथे त्याचा जन्म झाला. तरुणवयातच पोलिओचा संसर्ग झाल्यामुळे त्याला अपंगत्व आले. मिशिगन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर ‘संकल्पनांची उत्क्रांती’ या विषयावर त्याने संशोधन सुरू केले. १९१८ मध्ये त्याने विस्कॉन्सिन विद्यापीठाची पीएच्.डी. मिळविली. प्रथम त्याच विद्यापीठात आणि नंतर येल विद्यापीठात त्याने प्राध्यापक म्हणून काम केले.
हल यास प्रारंभी संमोहनशास्त्र, सूचनाग्रहण यांसारख्या विषयांचे आकर्षण होते; परंतु पुढे यंत्रमानवांविषयी विचार करू लागल्यावर तो वर्तनवादाकडे झुकला. शिक्षणप्रक्रियेसंबंधी त्याने मौलिक संशोधन केले.
हल याच्या मते, मानसशास्त्र अजून परिपूर्ण शास्त्रीयतेच्या पायरीप्रत पोहोचलेले नाही. या शास्त्रात अधूनमधून नवे शोध लागतात हे खरे; परंतु वर्तनाची निश्चित भाकिते करण्याइतपत ते उपयुक्त ठरत नाही. सारे संशोधनकार्य अर्धवट स्वरूपाचे राहते; कारण या शास्त्रापाशी आवश्यक ती तर्कशुद्ध, सर्वंकष तत्त्वप्रणाली नाही. हल याने ‘अभ्युपगम निगमनात्मक विचारप्रणाली’ अशी एक सविस्तर तत्त्वप्रणाली तयार केली. तीत भूमितीत असतात, त्याप्रमाणे प्रारंभी व्याख्या व गृहीतके असून त्यापासून तर्कोचित निगमने काढली आहेत. त्याची ही तत्त्वप्रणाली प्रत्यक्षात कितीशी सोयीची आहे हा प्रश्नच आहे.
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एडवर्ड चेस टोलमन (Edward Chace Tolman १८८६–१९५९) याच्याप्रमाणेच हल याने वर्तनवादाचा जनक जे. बी. वॉटसन(१८७८–१९५८) यास मंजूर नसलेल्या काही संकल्पना थोडाफार बदल करून स्वीकारल्या. ‘सर्वांगस्पर्शी वर्तन’, ‘उद्दिष्टान्वेषी क्रिया’ आणि ‘मध्यस्थ परिवर्तनीयके’ या टोलमनच्या कल्पनांना हल याने मान्यता दिली; परंतु टोलमनला ‘प्रेरण’ आणि ‘जाणीव’ ही दोन प्रकारची परिवर्तनीयके अभिप्रेत होती. त्यांपैकी फक्त ‘प्रेरण’ उपयुक्त असून ‘जाणीव’ उपेक्षणीय होय, असे हल याचे मत आहे.
वॉटसन याने त्याज्य ठरविलेला एडवर्ड ली थॉर्नडाइक (१८७४–१९४९) याचा शिक्षणासंबंधीचा ‘परिणामाचा नियम’ हल याने नव्या वर्तनवादी स्वरूपात स्वीकारला. त्याच्या मते, प्रेरणा अथवा गरज उत्पन्न झाली, की प्राण्याचा समतोल ढळतो. हा समतोल पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्राणी हालचाल करू लागतो, की ज्यामुळे ‘ताण’ कमी होतो. अशी क्रिया प्राणी पुन:पुन्हा करतो व शिकून घेतो. अशा रीतीने थॉर्नडाइकची जाणीवसूचक ‘समाधान’ अथवा ‘तृप्ती’ ही संज्ञा स्वीकारण्याऐवजी हल याने ‘ताणक्षय’ ही वर्तनवादी संज्ञा वापरली.
विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) याच्या हेतूवादी मानसशास्त्रातील ‘हेतू, ‘सहजप्रवृत्ती’, ‘सहजप्रवृत्तींची तृप्ती’ या मुख्य कल्पना हलच्या वर्तनवादी मानसशास्त्रात ‘उद्दिष्ट’, ‘प्रेरण’, ‘ताणक्षय’ या नावांनी थोड्या निराळ्या स्वरूपात वावरतात. सारांश, हलच्या मानसशास्त्रीय विचारसरणीत वर्तनवाद आणि हेतूवाद यांचा अविरोध दिसून येतो. हल याचे उल्लेखनीय ग्रंथ असे : हिप्नॉसिस अँड सजेस्टिबिलिटी (१९३३), मॅथेमॅटिको-डिडक्टिव्ह थिअरी ऑफ रोट लर्निंग (१९४०), प्रिन्सिपल्स ऑफ बिहेव्हिअर : ॲन इंट्रोडक्शन टू बिहेव्हिअर थिअरी (१९४३). ए बिहेव्हिअर सिस्टिम हा त्याचा अखेरचा ग्रंथ (१९५२).
हल अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनचा अध्यक्ष होता (१९३५-३६). सोसायटी ऑफ इक्सपेरिमेंटल सायकॉलॉजीस्ट्स तर्फे हल यास ‘वॉरन मेडल’ देऊन गौरविण्यात आले (१९४५).
न्यू हेवन (कनेक्टिकट) येथे त्याचे निधन झाले.