वराह रूपातील भगवंतांनी महामुनी ऋभु यांना सांगितलेले तत्त्वज्ञान हा वराह उपनिषदाचा विषय आहे. ह्यात एकूण पाच अध्याय असून त्यांत भगवंतांनी ब्रह्मविद्येचे सार सांगितले आहे. त्या अनुषंगाने पहिल्या अध्यायात विश्वातील एकूण ९६ तत्त्वांचे वर्णन येते. प्रत्येकी पाच ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, तन्मात्र व महाभूते; पाच प्रकारचे प्राण; मन, बुद्धी, अहंकार व चित्त हे अंत:करणाचे चार घटक; स्थूल, सूक्ष्म व कारण असे तीन देह; जाग्रत्, स्वप्न व सुषुप्ती ह्या तीन अवस्था; अस्तित्त्व, उत्पत्ती, वृद्धी, परिणाम, क्षय व नाश हे सहा विकार; भूक-तहान, शोक-मोह आणि जन्म-मृत्यू ह्या सहा द्वंद्वरूप ऊर्मी; त्वचा, रक्त, मांस, मेद, मज्जा व अस्थी हे सहा देहकोश; काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे सहा शत्रू; विश्व, तैजस व प्राज्ञ हे तीन प्रकारचे जीव; सत्त्व, रज व तम हे तीन गुण; प्रारब्ध, अनागत व अर्जित ही तीन प्रकारची कर्मे; वचन, आदान, गमन, विसर्ग व आनंद ही पाच कर्मेंद्रियांची कामे; संकल्प करणे, निश्चय करणे, अभिमान करणे आणि अवधारण करणे ही चार अंत:करणांची कार्ये; मुदिता, करुणा, मैत्री व उपेक्षा ह्या चार भावना; दिशा, वायू, सूर्य, वरूण, अश्विनौ, अग्नी, इंद्र, उपेंद्र, यम, चंद्र, ब्रह्मा, रुद्र, जीवात्मा आणि परमात्मा अशी ही तत्त्वे होत. ह्या सर्वांहून परमतत्त्व म्हणजेच विष्णुतत्त्व पूर्णपणे विलक्षण होय (१.२-१५). आत्म्याचे आनंदरूपत्त्व, स्वयंप्रकाशत्त्व, स्वरूपत्त्व, चिन्मयत्त्व इत्यादींचे तात्त्विक विवेचन ह्या उपनिषदात येते. ब्रह्मसत्-चित्-आनंदस्वरूप आहे. सत्य (सत्) आणि प्रज्ञान (चित्) हे ब्रह्माचे लक्षण आहे. ब्रह्मज्ञानाने साधक अमृतपदास प्राप्त होतो (२.१८-२०). मृत्यूचक्रापासून मुक्ती मिळवण्याचा सगळयात चांगला मार्ग म्हणजे परमेश्वराची भक्ती होय असे म्हटले आहे (३.१२-१३). प्रणव, प्रणवाच्या अकारादि मात्रा, त्यांचे स्थूल, सूक्ष्म, बीज आणि साक्षी ह्या भेदानुसार चार प्रकार, पुन्हा त्यांच्याही जाग्रत्, स्वप्न, सुषुप्ती व तुरीया ह्या अवस्था यांचे यथार्थ वर्णन केले आहे (४.४-११). शुभेच्छा, विचारणा, तनुमानसी, सत्त्वापत्ति, असंसक्ती, पदार्थ भावना आणि तुर्यगा ह्या सात ज्ञानभूमी ब्रह्मप्राप्तीच्या पायऱ्या होत. जीवन्मुक्त व त्याची लक्षणे सांगून जीवन्मुक्तीचे शुकप्रणित व वामदेवप्रणित असे दोन प्रकारचे मार्ग येथे वर्णिले आहेत. शुकप्रणित मार्गाने म्हणजेच वैराग्यमार्गाने वा प्रत्यक्ष विधि आचरणाने असंप्रज्ञात समाधीद्वारे त्वरित मोक्ष मिळतो; तर वामदेव मार्ग हा योगदर्शनाने, सांख्यदर्शनाने, कर्मानुष्ठानाने व भक्तीने असे क्रमाने कर्मबंधनातून साधकाला मुक्त करीत अनेक जन्मांतील हठयोगाच्या निरंतर साधनेने सिद्ध होतो (४.३४-४२).
पाचव्या अध्यायात योगाभ्यासाची प्रक्रिया सांगितलेली आहे. लययोग, मंत्रयोग व हठयोग असे तीन प्रकारचे योग सांगून योगाची आठ अंगे; अकरा प्रकारची आसने; प्राणायाम; देह व अवयवांचे प्रमाण; नाडीचक्र; मूलबंध, उड्ड्यानबंध व जालंधरबंध इत्यादी संज्ञांचे विस्तृत वर्णन येते. योगसाधना ही काळाच्या बंधनातून मुक्त करणारी, शरीर सुदृढ, बलवान करणारी आहे असे म्हटलेले आहे. मूलाधार चक्र हेच बिंदूरूपशिव आणि कुंडलिनीरूप शक्ती या दोहोंचे स्थान होय (५.५०-५१). आरंभ, घट, परिचय किंवा प्रचय आणि निष्पत्ती ह्या चार योगभूमिका वा अवस्था वर्णिल्या असून निष्पत्ती भूमिका हीच असंप्रज्ञात समाधी अवस्था होय असे म्हटले आहे (५.७१-७५).
प्रस्तुत उपनिषद् प्रामुख्याने ज्ञानयोगाधिष्ठित आहे. कारण त्यात आरंभीच वेदान्तानुसार साधनचतुष्ट्य, आत्म्याचे स्वरूप, ब्रह्माचे लक्षण, जीवनमुक्ती इत्यादी विषयांचे विवेचन आढळते. तरीही हे उपनिषद योगसाधकांसाठी उपयुक्त ठरते. कारण यात योगविषयक नादानुसंधान (२.८३), प्रणव, ज्ञानभूमी (४.१-२, ११-१२), हठयोग आणि ऐश्वर्य, बंध, प्राणायाम, नाडी, आरंभ, घट, परिचय आणि निष्पत्ती या आठ प्रकारांचे संक्षिप्त वर्णन आढळते.
संदर्भ :
- दलाई, बी. के, योगोपनिषद्, संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, पुणे, २०१५.
समीक्षक : प्राची पाठक