आचार्य ईश्वरकृष्ण विरचित सांख्यकारिका हा सांख्यदर्शनावरील प्रमुख ग्रंथ आहे. या ग्रंथाला ‘सांख्यसप्तति’ असेही म्हणतात. या ग्रंथात एकूण ७२ कारिकांमध्ये (श्लोकांमध्ये) सांख्य तत्त्वज्ञान संक्षेपाने सांगितले आहे. ईश्वरकृष्णांच्या काळाविषयी विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. आचार्य बलदेव उपाध्याय, डॉ. आद्याप्रसाद मिश्र आणि पं. गोपीनाथ कविराज यांच्या मतानुसार ईश्वरकृष्णांचा काळ इ. स. पू.१००, डॉ. गार्बे यांच्या मते इ. स. १००, डॉ. दासगुप्ता व व्हिंसेण्ट स्मिथ यांच्या मतानुसार इ. स. २००, डॉ. बेलवलकर आणि डॉ. कीथ यांच्या मतानुसार इ. स. ३०० व डॉ. ताकाकुसू यांच्या मतानुसार इ. स. ४५० हा मानला जातो.

सांख्यकारिकेमध्ये पुढील विषयांचे वर्णन आढळते –

सर्व जीवांना आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक असे तीन प्रकारचे दु:ख कायम पीडा देत असते. त्यामुळे जीव त्या दु:खांपासून निश्चितपणे आणि कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी उपाय शोधत असतो. परंतु, दृष्ट (प्रत्यक्ष) उपाय आणि वैदिक यागादि कर्मे यांमुळे दु:खापासून कायमस्वरूपी मुक्ती प्राप्त होत नाही; तर प्रकृति, पुरुष आणि प्रकृतीपासून निर्माण झालेली अन्य २३ व्यक्त तत्त्वे यांच्या यथार्थ ज्ञानामुळे दु:खापासून मुक्ती मिळते; म्हणून या सर्व तत्त्वांचे ज्ञान ज्या दर्शनात सामावलेले आहे, त्या सांख्यदर्शनाचे अध्ययन करणे आवश्यक आहे. याप्रमाणे पहिल्या दोन कारिकांमध्ये सांख्यदर्शनाचे प्रयोजन स्पष्ट केले आहे.

तिसऱ्या कारिकेत २५ तत्त्वांचे विभाजन कार्यकारणभावानुसार चार भागांमध्ये कसे होते याविषयी स्पष्टीकरण आहे. २५ तत्त्वांपैकी प्रकृति ही केवळ कारण आहे आणि कार्य नाही म्हणजे ती कोणापासूनही उत्पन्न होत नाही; महत् इत्यादी ७ तत्त्वे कारण व कार्य दोन्ही आहेत; मन इत्यादी १६ तत्त्वे केवळ कार्य आहेत आणि पुरुष हा कारणही नाही व कार्यही नाही. या २५ तत्त्वांचे ज्ञान ज्या प्रमाणांद्वारे होते, त्या तीन प्रमाणांचे स्वरूप ४ ते ७ या कारिकांमध्ये सांगितले आहे. ती प्रमाणे एकूण तीन आहेत – दृष्ट (प्रत्यक्ष), अनुमान आणि आप्तवचन (शब्द).

सृष्टीचे कारण प्रकृति असून ती सूक्ष्म असल्यामुळे तिचे ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे होत नाही, तर अनुमानाद्वारे होते हे आठव्या कारिकेत सांगितले आहे. कोणतेही कार्य उत्पत्तीच्या पूर्वीही आपल्या कारणात सूक्ष्मरूपाने अस्तित्वात असते, हा सत्कार्यवादाचा सिद्धांत नवव्या कारिकेत; पुरुष, प्रकृति व २३ व्यक्त तत्त्वे यांमधील साम्य व भेद १० व ११ या दोन कारिकांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांचे स्वरूप, कार्य आणि त्यांचा परस्परसंबंध १२ व १३; प्रकृति या तत्त्वाला सिद्ध करणारे अनुमान १४ ते १७ आणि पुरुष या तत्त्वाला सिद्ध करणारे अनुमान १८ ते २० या कारिकांमध्ये आहे.

चैतन्यस्वरूप पुरुष हा त्रिगुणरहित असल्यामुळे त्याच्यात कोणत्याही क्रिया घडून येत नाहीत व प्रकृतिमध्ये क्रिया घडून येत असल्या तरीही ती अचेतन असल्यामुळे तिला ज्ञान होत नाही. त्यामुळे या दोघांना अंध-पंगु न्यायानुसार कैवल्यासाठी परस्परांची अपेक्षा असते, हे २१ व्या कारिकेत सांगितले आहे. त्यानंतर सृष्टिप्रक्रिया (सांख्यकारिका २२), बुद्धीचे आठ धर्म (२३), अहंकार व त्याची तीन रूपे (२४-२५), ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये (२६), मनाचे स्वरूप (२७), इंद्रियांची कार्ये (२८), प्राण व अंत:करण यांचा संबंध (२९), बाह्य-करण अर्थात ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये आणि अंत:करण यांची वैशिष्ट्ये (३०-३६), बुद्धीचे श्रेष्ठत्व (३७), तन्मात्र (३८), लिंग-शरीर (३९-४२), बुद्धीचे विविध भाव (४३-४५), प्रत्ययसर्ग (४६-५२), भौतिकसर्ग (५३-५६), प्रकृति-पुरुष संबंध (५७-६८) असे अनेक विषय सांख्यकारिकेमध्ये स्पष्ट केले आहेत.

अंतिम चार (६९-७२) कारिकांमध्ये आचार्य ईश्वरकृष्णांनी सांख्यदर्शनाची परंपरा सांगितलेली आहे. ते म्हणतात की, महर्षि कपिल यांनी आसुरि नावाच्या शिष्याला ज्ञान दिले. आसुरि यांनी पंचशिख नावाच्या शिष्याला ज्ञान दिले व पंचशिखांनी त्याचा प्रसार केला. या पद्धतीने गुरु-शिष्य परंपरेने ते ज्ञान आचार्य ईश्वरकृष्णांपर्यंत आले. त्यांनी सांख्यकारिका हा ग्रंथ षष्टितन्त्र नावाच्या ग्रंथावर आधारित आहे, असे अंतिम श्लोकात नमूद केले आहे. फक्त मूळ ग्रंथातील आख्यायिका आणि अन्य दर्शनांच्या मताचे खंडन न घेता केवळ सांख्य तत्त्वज्ञानच सांख्यकारिकेमध्ये मांडण्यात आलेले आहे. सांख्यकारिकाचा आधार असलेला षष्टितन्त्र  हा ग्रंथ आज उपलब्ध नाही, परंतु त्यातील काही वाक्ये योगसूत्रावरील व्यासभाष्यामध्ये उल्लेखिलेली आढळतात. अनेक विद्वान षष्टितन्त्र या ग्रंथाचे कर्ते पंचशिख आहेत असे मानतात; तर आचार्य उदयवीर शास्त्री इ. काही विद्वान महर्षी कपिल हेच त्याचे कर्ते आहेत असे मानतात.

सांख्यकारिका या ग्रंथावर अनेक टीकाग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत. त्यापैकी प्रमुख ग्रंथांची नावे पुढीलप्रमाणे – माठरवृत्ति (आचार्य माठर), युक्तीदीपिका (लेखक अज्ञात), गौडपाद भाष्य (आचार्य गौडपाद), जयमंगला (लेखक अज्ञात), सांख्यतत्त्वकौमुदी (वाचस्पति मिश्र). सुमारे सहाव्या शतकात परमार्थ नावाच्या एका भारतीय विद्वानाने सांख्यकारिकामाठरवृत्ति यांचा चिनी भाषेत अनुवाद केला. तो अनुवाद कनकसप्तति, सुवर्णसप्तति, हिरण्यसप्तति इत्यादी नावांनी चिनी विद्वानांमध्ये प्रसिद्ध आहे.

सांख्यदर्शनाचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सांख्यकारिका हा ग्रंथ विद्वानांमध्ये अतिशय प्रामाणिक आणि महत्त्वपूर्ण मानला जातो.

पहा : पंचशिखाचार्य.

                                                                                                             समीक्षक : कला आचार्य