स्वर्डलॉफ्स्क. पश्चिम-मध्य रशियातील स्वर्डलॉफ्स्क प्रांताचे प्रशासकीय केंद्र. प्रसिद्ध औद्योगिक शहर व देशातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक शहर. लोकसंख्या १५,०१,६५२ (२०१८ अंदाज). मध्य उरल पर्वताच्या पूर्व उतारावर, तोबोल नदीच्या इस्येट या उपनदीच्या दोन्ही तीरांवर हे शहर वसले आहे. हे स्थान यूरोप – आशिया सीमेपासून पूर्वेस अगदी जवळ आहे. इ. स. पू. ८००० – ७००० वर्षांपूर्वीपासून या परिसरात मानवी वसाहती असल्याचे पुरावे मिळतात. इ. स. १६७२ मध्ये स्थापन झालेल्या शार्ताश खेड्याजवळ १७२१ मध्ये लोखंड उद्योगाची स्थापना झाली. १७२२ मध्ये तेथे किल्ला बांधण्यात आला. याच ठिकाणाजवळ निर्माण झालेल्या वसाहतीला १७२३ मध्ये रशियन सम्राट पीटर द ग्रेटची द्वितीय पत्नी पहिली कॅथरिन हिच्या स्मरणार्थ इकॅतरनबर्ग असे नाव देण्यात आले. अल्पावधीतच हे खाणकाम व यंत्रनिर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र बनले. उरल प्रदेशातील सर्व लोखंड उद्योगांचे प्रशासकीय केंद्र म्हणून या नगराची वाढ झाली. १७८३ मध्ये या नगरातून ग्रेट सायबीरियन महामार्ग बांधण्यात आला. तेव्हापासून या नगराचे महत्त्व वाढले. १७९६ मध्ये याला नगराचा दर्जा मिळाला. १८७८ नंतर ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गामुळे हे नगर सायबीरियाशी जोडले गेले. ऑक्टोबर १९१७ मध्ये झालेल्या रशियन राज्यक्रांतीनंतर झार राजकर्ता निकोलस दुसरा व त्याच्या कुटुंबियांना याच नगरात १६ जुलै १९१८ रोजी देहान्त शासन दिले गेले. त्यामुळे हे नगर कुप्रसिद्ध बनले. बोल्शेव्हिक नेता यॅकफ एम्. स्व्ह्यर्डलफ याच्या स्मरणार्थ १९२४ मध्ये याचे स्व्हर्डलॉफ्स्क असे नामकरण करण्यात आले. १९९१ मध्ये सोव्हिएट युनियनचे अस्तित्व संपुष्टात आल्यापासून पुन्हा इकॅतरनबर्ग या मूळ नावानेच हे शहर ओळखले जाते. सोव्हिएट राजवटीत जैविक व रासायनिक युद्धतंत्रविषयक संशोधन आणि विकास केंद्र या शहरात होते. लोकशाही पद्धतीने पहिल्यांदा निवडून आलेले रशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्स्टिन यांनी याच शहरात आपले शिक्षण घेऊन आपली काही राजकीय कारकीर्द येथे व्यतित केली.
दुसऱ्या महायुद्धकाळात यूरोपीय रशियातील बरेचसे उद्योग या ठिकाणी हलविण्यात येऊन त्यांचा विस्तार करण्यात आला. आधुनिक इकॅतरनबर्ग हे रशियातील प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. अवजड उद्योगांसाठी ते विशेष प्रसिद्ध आहे. यंत्रनिर्मिती, धातुप्रक्रिया, धातुकर्म व रासायनिक उद्योगांतील यंत्रसामुग्री, डिझेल एंजिने, गोलक धारवा, पोलाद निर्मिती, वीजचक्की, रसायने, रबरी टायर, औषध निर्मिती, अन्नप्रक्रिया इत्यादी येथील महत्त्वाचे उद्योग आहेत. येथे काही लघु उद्योगही चालतात. उदा., रत्नांना पैलू पाडणे. शहराच्या जवळपास सोने व तांब्याच्या खाणी आहेत. इस्येट नदीवर धरण बांधले असून त्यामुळे पात्रात लहानलहान सरोवरे निर्माण झाली आहेत.
रस्ते, लोहमार्ग व हवाई वाहतूक मार्गांचे हे प्रमुख केंद्र असून त्यामार्गे हे ठिकाण पश्चिम रशिया व सायबीरिया यांच्याशी जोडले गेले आहे. हे एक प्रसिद्ध शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र असून येथे अनेक उच्च शिक्षण संस्था आहेत. त्यात उरल्स स्टेट युनिव्हर्सिटी (स्था. १९२०) आणि तंत्रनिकेतन, वनविद्या व वनस्पती संवर्धनशास्त्र, खाणकाम, कृषी, कायदा, वैद्यकीय व शिक्षक प्रशिक्षण याविषयीच्या प्रमुख संस्था आहेत. रशियन विज्ञान अकादमीची उरल शाखा आणि इतर अनेक वैज्ञानिक संशोधन संस्था येथे आहेत. एक पर्यटन केंद्र म्हणूनही हे शहर महत्त्वाचे आहे.
समीक्षक : नामदेव गाडे