वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील विंडवर्ड बेटांपैकी ग्रेनेडा या द्वीपीय देशाची राजधानी, औद्योगिक शहर व महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ३३,७३४ (२०१२). हे ग्रेनेडा बेटाच्या नैर्ऋत्य किनार्‍यावरील एका लहान द्वीपकल्पावर वसले आहे. शहराच्या भोवती जुन्या ज्वालामुखी कुंडयुक्त टेकड्या आहेत. फ्रेंच वसाहतकर्‍यांनी १६५० मध्ये सांप्रत नगराच्या जवळच वसाहतीची स्थापना केली होती. १७०५ मध्ये सांप्रतच्या ठिकाणी ती हलविण्यात आली. १८८५ ते १९५८ या कालावधीत येथे पूर्वीच्या ब्रिटिश विंडवर्ड बेटांची राजधानी होती. फेब्रुवारी १९७५ रोजी ग्रेनेडा स्वतंत्र झाल्यानंतर सेंट जॉर्जेस ही त्याची राजधानी झाली. कागद व कागदाच्या वस्तू तयार करणे, साखर व मद्यनिर्मिती हे येथील प्रमुख उद्योग आहेत. येथील द्वीपकल्पाभोवती असलेल्या उपसागर भागात कारनाजी हे एक खोल, अंतर्गत व भूवेष्टित बंदर असून वेस्ट इंडीजमधील उत्तम बंदरांमध्ये याची गणना होते. सौम्य उष्णकटिबंधीय आर्द्र हवामानामुळे ग्रेनेडा बेटावर उत्पादित होणार्‍या कोको, केळी, जायफळ, जायपत्री, लवंग, दालचिनी, आले इत्यादी मसाल्याच्या पदार्थांची निर्यात या बंदरातून केली जाते. शहराच्या पूर्वेस ११ किमी.वर ग्रँड एटांग हे निसर्गसुंदर सरोवर असून एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. संस्कृती, ऐतिहासिक वास्तू व नैसर्गिक सौंदर्य यांचे जतन करून सांप्रत शहर विकसित केले आहे. सेंट जॉर्जेस हे कॅरीबियनमधील लोकप्रिय पर्यटन केंद्र आहे. येथील रोमन कॅथलिक, अँग्लिकन व प्रेस्बिटेरियन चर्च, अठराव्या शतकातील फोर्ट जॉर्ज, ग्रँड अॅन्से पुळण, ग्रेनेडा राष्ट्रीय संग्रहालय ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. नौकाविहारासाठीही सेंट जॉर्जेस महत्त्वाचे आहे. सेंट जॉर्जेस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन ही शैक्षणिक संस्था येथे आहे. मॉरिस बिशप हा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात गुलामांच्या व्यापारावर बंदी घातल्याच्या घटनेच्या स्मरणार्थ येथे उत्सव साजरा केला जातो.

समीक्षक : वसंत चौधरी