लाफाएत, मार्की द : (६ सप्टेंबर १७५७ — २० मे १८३४). फ्रेंच सेनानी, मुत्सद्दी आणि राजकीय नेता. त्याचे पूर्ण नाव मारी झोझेफ पॉल इव्ह रॉक झिल्बर द्यू मॉत्ये मार्की द लाफाएत. त्याचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या सधन सरदार घराण्यात चाव्हेनियाक (हौत लॉयर) येथे झाला. लहानपणीच त्याचे वडील वारले आणि काही वर्षांनी आई आणि आजोबा निवर्तले. त्याला वारसाहक्काने बरीच संपत्ती मिळाली व नातेवाइकांनी त्याचे संगोपन केले. त्याने व्हर्सायच्या लष्करी अकादमीत शिक्षण घेतले. विद्यार्थिदशेतच फ्रान्समधील श्रीमंत सरदार घराण्यातील आद्रिएन द नॉआय या मुलीशी त्याचा विवाह झाला (१७७३). सोळाव्या लूईच्या तरुण सरदारांच्या वर्तुळात त्याला प्रवेश मिळाला आणि घोडदळात त्याची कॅप्टन या पदावर नियुक्ती करण्यात आली.

अमेरिकन राज्यक्रांतीच्या संधीचा फायदा घेऊन तो फिलाडेल्फियाला (अमेरिका) गेला (१७७७). त्याची कॉन्टिनेन्टल काँग्रेसने विनावेतन मेजर जनरल पदावर नियुक्ती केली. त्याने लहानसहान लढायांत विजय मिळवून (१७७७-७८) सेनापती म्हणून नावलौकिक मिळविला. फ्रान्सने इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारताच तो फ्रान्सला परत आला (१७७९). त्याने अमेरिकेतील स्वातंत्र्यप्रेमींना सैन्य पाठविण्याविषयी आपल्या शासनाचे मन वळविले आणि १७८० मध्ये तो पुन्हा अमेरिकेत गेला. फ्रेंचांच्या मदतीने यॉर्कटाउन येथे वसाहतवाद्यांनी ब्रिटिशांचा पराभव केला. साहजिकच लाफाएत फ्रान्स आणि अमेरिका या दोन्ही देशांतील शूर वीर ठरला. तो अमेरिकी व फ्रेंच क्रांतिकारकांमधील दुवा म्हणून काम करीत होता. अमेरिकेला त्याने पुढे अनेक वेळा भेट दिली.

फ्रान्समध्ये परतल्यानंतर त्याने पाच वर्षे उदारमतवादी सरदारांना मदत करण्यात घालविली. खुला व्यापार, कर पद्धतीत सुधारणा, गुलामांची मुक्तता, प्रॉटेस्टंटांचे धार्मिक स्वातंत्र्य इ. विषयांत त्याने लक्ष घातले. सरदारवर्गातून त्याची स्टेट्स जनरलवर (संसद) निवड झाली. संसदेच्या अधिवेशनात (मे १७८९) त्याने सामान्य सभासदांच्या मागणीस पाठिंबा दर्शविला आणि स्टेट्स जनरलचे रूपांतर राष्ट्रीय सभेत झाले. त्याला फ्रान्समध्ये इंग्लंडप्रमाणे सांवैधानिक राजेशाही प्रसृत करावयाची होती. नॅशनल असेंब्लीच्या उपाध्यक्षपदी त्याची निवड झाली.

त्याने बुर्झ्वांना सर्वतोपरी सहकार्य केले व ११ जुलै १७८९ रोजी संसदेत मानवी हक्क आणि नागरिकत्व यांच्या जाहीरनाम्याचा मसुदा ठेवला. दुरुस्त्या होऊन तो २७ ऑगस्ट रोजी संमत झाला. राष्ट्रीय संरक्षक दलाचे सेनापतिपद त्यास देण्यात आले. सोळावा लूई आणि राणी आंत्वानेत यांना व्हर्साय राजवाड्यावरील प्रक्षुब्ध जमावाच्या हल्ल्यातून त्याने वाचविले (६ ऑक्टोबर १७८९). क्रांतिकारकांनी त्यांना पॅरिस येथे ओलीस ठेवले. साहजिकच लाफाएतचा प्रभाव वाढला. बूर्झ्वांकडे सत्तेचे हस्तांतर झाले, पण यापेक्षा अधिक स्वातंत्र्य दिल्यास लोक खासगी संपत्तीवर हल्ले करतील, अशी त्याला भीती वाटली.

जहालवादाचा प्रसार होऊ लागला, तसा प्रक्षोभ दडपण्याची त्याला इच्छा झाली. म्हणून मिराबोबरोबर काम करण्यास तो नाराज होता. त्यामुळे १७९१ मध्ये त्याची लोकप्रियता ढासळली. सामान्य लोक, सरदार आणि दरबारी सर्वच त्याचा द्वेष करू लागले. १७९१ चे संविधान कार्यवाहीत आल्यानंतर लाफाएत सक्रिय राजकारणातून जवळजवळ निवृत्त झाला.

इंग्लंड-फ्रान्स युद्धात त्याने सैन्याचे नेतृत्व स्वीकारले; पण देशात जॅकोबिनांचा उठाव होताच त्याने गोळीबार केला. परिणामत: एक विश्वासघातकी नागरिक म्हणून जनमानसात त्याची प्रतिमा झाली; तेव्हा तो ऑस्ट्रियात पळून गेला. तेथे त्याला अटक करण्यात आली (१७९२). नेपोलियनच्या विजयानंतर तो फ्रान्सला परत आला (१७९९). त्याने शेती व मेषपालनास सुरुवात केली. पुढे अठराव्या लूईच्या कारकिर्दीत (१८१४-१८२४) तो प्रतिनिधिगृहाचा सभासद होता. त्याने अमेरिकेचा पुन्हा दौरा केला (१८२५). तेव्हा त्याला दोन लाख डॉलर आणि फ्लॅरिडामधील एक वाडी आंदण देण्यात आली; पण ती विकून तो पुन्हा फ्रान्समध्ये आला. त्याने १८३० मधील क्रांतीत भाग घेऊन राष्ट्रीय सेनेचे पुन्हा नेतृत्व केले आणि दहाव्या चार्ल्सला पदच्युत करण्यात पुढाकार घेतला व लूई फिलिपला गादीवर बसविले. त्यानंतर तो सक्रिया राजकारणातून पूर्णत: निवृत्त झाला.

पॅरिस येथे तो मरण पावला.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासात लाफाएत याचे कार्य महत्त्वाचे आहे. फ्रेंच राज्यव्यवस्था उदारमतवादी व सहिष्णू मूल्यांवर आधारलेली असावी व अतिरेकी विचारांना तीत स्थान असू नये, असे त्याचे मत होते. त्यामुळे तो अस्थिर फ्रेंच राजकारणात प्रभावी ठरला नाही.

संदर्भ :

  • Buckman, peter, Lafayette : A Biography, Paddington, 1977.
  • Gottschalk, L. R. Lafayette Comes to America, Six Vols., Chicago, 1935-1973.
  • Lafayette, Marie Joseph, Lafayette in the Age of the American Revolution, 4 Vols., London, 1977-81.