जोन ऑफ आर्क : (६ जानेवारी १४१२–३० मे १४३१). झान दार्क (फ्रेंच). फ्रान्समधील एक थोर स्त्री आणि संत. जोनचा जन्म दोंरेमी-ला पूसेल (व्होझ) ह्या फ्रान्समधील खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. धार्मिक प्रवृत्तीच्या या मुलीस वयाच्या तेराव्या वर्षापासून शेतावर राबताना देव आपल्या कानात काही बोलत आहे, तसेच सेंट कॅथरिन, मार्गारेट व मायकेल या मृत संतांचे दर्शन होते, असा तिला भास होत असे.

इंग्लंड व फ्रान्स यांमधील शतवार्षिक युद्धातील हा काळ फ्रान्सला अतिशय प्रतिकूल होता. त्र्वाच्या तहाने फ्रान्सचे राजपद युवराज चार्ल्सला न मिळता इंग्लंडच्या राजाकडे जाणार होते. ऑर्लेआं ह्या महत्त्वाच्या ठाण्याभोवती इंग्लडचा वेढा पडला होता. अशा वेळी जोनने आईबापांच्या विरोधास व फ्रेंच अधिकाऱ्यांच्या नाखुषीस न जुमानता तिने युवराज चार्ल्सची भेट घेतली व इंग्रजांशी लढण्यास त्याला प्रवृत केले. तोपर्यंत निष्क्रय असलेल्या फ्रेंच सेनापतींवर आणि सैनिकांवर जोनच्या व्यक्तिमत्त्वाचा विलक्षण प्रभाव पडला होता. त्यांनी या युद्धात खूप शौर्य दाखविले आणि ऑर्लेआं, पाते इ. लढायांमध्ये विजय मिळवून जोनने चार्ल्सला गादीवर बसविले आणि राज्याभिषेक करविला.

पुढे कांप्येन्यच्या लढाईत ती शत्रूच्या हाती सापडली. चर्चचा अपमान करणे, चेटूक करणे इ. आरोप तिच्यावर लादण्यात येऊन इंग्रजांनी तिला रूंआन येथे १४३१ मध्ये जिवंत जाळले. १४५६ मध्ये तिच्यावरील आरोपांची जाहीर रीत्या चौकशी होऊन तिला निर्दोषी ठरविण्यात आले. तिच्या हौतात्म्याने फ्रान्सची राष्ट्रीय अस्मिता जागृत झाली. १९२० मध्ये पंधराव्या बेनिडिक्ट पोपने अधिकृत रीत्या तिला संतपद दिले. तिच्या हौतात्म्यामुळे यूरोपीय चित्रकारांनी तिची प्रतिमाचित्रे रंगविली. तसेच साहित्यिकांनी वाङ्‌मयात तिला नायिकेचे स्थान दिले आणि अनेक मनोरंजक कथा रचल्या.