आभीर :  एक प्राचीन भारतीय जमात. तिचा तपशीलवार, सुसंगत इतिहास जुळविण्याइतका   पुरावा   उपलब्ध नाही. तथापि प्राचीन साहित्यातील व कोरीव लेखांतील निर्देशांवरून काही महत्त्वाची माहिती हाती लागते.

केवळ कोरीव लेखांचाच पुरावा ग्राह्य धरला, तर ही जमात इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकांपासून चौथ्या शतकापर्यंत भारतातील राजकीय उलाढालीत सक्रियपणे सहभागी होती, असे दिसते. खानदेशात तर आभीरांचे राज्य तेराव्या शतकापर्यंत टिकून होते. महाभारत, पुराणे यांसारख्या साहित्यांतून मिळणारा पारंपरिक इतिहास लक्षात घेतला, तर अगदी भारतीय युद्धाच्या काळापासून आभीर ही एक राजकीय शक्ती होती असे दिसते. पौराणिक साहित्याच्या जोडीला पतंजलीच्या महाभाष्यासारख्या ग्रंथातही आभीरांचा उल्लेख येतो. आभीर ह्या मूळ संज्ञेची विविध अपभ्रष्ट रूपांतरे पेरिप्लस ऑफ द इरीथ्रिअन सी, बायबल आणि टॉलेमीचे लेखन यांतूनही येतात.

ही जमात भारताच्या वायव्येकडून, हेरात आणि कंदाहारच्या बाजूने प्रथम पंजाबात आली असावी. आभीरांच्या द्वेषामुळे सरस्वती नदी विनशन येथे अदृश्य झाली, असे महाभारतात म्हटले आहे. त्यानंतर आभीरांनी सध्याच्या सिंध, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र वगैरे प्रदेशांतून वस्त्या करून राजसत्ताही स्थापल्या असाव्यात. काही पुराणांतून दहा आभीर राजांनी ६७ (काहींच्या मते १६७) वर्षे राज्य केले, असे म्हटले आहे; पण त्यांची नावे दिली नाहीत. तिसऱ्या-चौथ्या शतकात आभीरांचे उत्तर कोकणात व नासिक प्रदेशात राज्य होते. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखावरून त्याने आभीरांना जिंकले होते, असे दिसते. नासिक येथील शिलालेखांत शिवदत्तपुत्र ईश्वरसेनाचा उल्लेख आहे. त्याने २४८/२४९ मध्ये एक संवत स्थापला होता, असे दिसते. त्याला पुढे कलचुरी किंवा चेदिसंवत असे नाव पडले.

आभीरांना काही ठिकाणी क्षत्रिय म्हटले असले, तरी अनेक ठिकाणी त्यांची वैश्यानंतरच्या गटात गणना केलेली दिसते. सर्वसामान्यत: आभीर हे गोपालन व कृषी हे व्यवसाय करीत असत. त्यांच्यापैकी काही लुटालूट व दरोडेखोरीही करीत असावेत. सध्याचे अहीर हे प्राचीन आभीरांचेच वंशज असावेत. पश्चिम खानदेशातील नंदुरबार, साक्री वगैरे तालुक्यांतील सध्या अहिराणी बोली बोलणाऱ्या काही जातींना अहीर म्हणून निर्दिष्ट करतात, हेही या संदर्भात लक्षात ठेवणे जरूर आहे. हे कृष्णाला देव मानतात. तथापि यादवांच्या अंतानंतर कृष्णाच्या स्त्रियांना घेऊन जाणाऱ्या अर्जुनावर आभीरांनीच हल्ला करून त्यांच्या स्त्रिया पळवून नेल्या होत्या, ही पौराणिक कथा नजरेआड करता येणार नाही.

आभीर हे प्रदेशनामही होते. मूळात हा प्रदेश निश्चितपणे कोणता होता, हे खातरीने सांगता येणार नाही. पण साहित्यातील बरेचसे निर्देश हा भारताच्या पश्चिम भागातला एक प्रदेश असावा, असे सुचवितात. टॉलेमीच्या भूगोलात उल्लेखिलेला सिंधच्या नैर्ऋत्य भागातील अबिरिया म्हणजे आभीर देश असण्याचा बराच संभव आहे. मध्य प्रदेशातील सध्याच्या रेवा जिल्ह्यात आभीरपल्ली नावाचे एक गाव होते, हेही ह्या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे.

संदर्भ :

  • Nilkantha Sastri, K. A. Ed. A Comprehensive History of India, Vol. 2, Calcutta, 1956.