कोमीनिअस,जॉन एमस : (२८ मार्च १५९२–४ नोव्हेंबर १६७०). चेकोस्लोव्हाकियातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, परिवर्तनवादी व बिशप. त्यांचा जन्म निव्हनिक (चेकोस्लोव्हाकिया) येथे झाला. दारिद्र्यामुळे त्यांचे शिक्षण उशिरा सुरू झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी ते स्ट्रॅझनिस या लॅटिन विद्यालयात गेले. नंतर हेरबॉर्न व हायड्लबर्ग येथे त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्यांच्या जीविताचे प्रमुख तीन टप्पे पडतात : १६१४ मध्ये दीक्षा घेतल्यानंतर १६१८ मध्ये ते फुलनेक येथे कुलमंत्री झाले; परंतु तीस वर्षांच्या युद्धामुळे त्यांस काही दिवस अज्ञातवासात राहावे लागले. त्यानंतर त्यांनी चेक भाषेत द लॅबिरिंथ ऑफ द वर्ल्ड व पॅरडाइज ऑफ द हार्ट ही रूपकात्मक काव्ये लिहिली. पुढे मोरेव्हियन व बोहीमियन चर्चचा ते प्रमुख बिशप झाले. अखेरीस लेश्नो (लिसा) येथे लॅटिन शिकविण्यासाठी त्यांनी अध्यापकाचे कार्य अंगीकारले.
कोमीनिअस यांच्या वेळी यूरोपात सर्वत्र धार्मिक युद्धे व अंतर्गत कलह चालू होते. त्यामुळे प्रथम काही दिवस त्यांस निर्वासित म्हणून भटकावे लागले. त्यानंतर त्यांनी पूर्ववत कुलमंत्री, बिशप व अध्यापक या विविध पदांवर काम केले. त्यातून मिळालेल्या अनुभवावरून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मूलभूत सिद्धांत मांडले. त्यांचे बहुतेक सिद्धांत त्यांनी आपल्या डायडॅक्टिक मॅग्ना (१६२८–३२) या ग्रंथात विशद केले आहेत. त्यांच्या मते, सर्व शिक्षण लॅटिनऐवजी देशी भाषांतून द्यावे; भाषा चर्चात्मक किंवा संभाषणात्मक पद्धतीने शिकविल्या जाव्यात; विद्यार्थ्यास दररोजच्या जीवनातून दृष्टोत्पत्तीस येणाऱ्या वस्तूंच्या ओळखीद्वारे वा वस्तुपाठाद्वारे शिक्षण द्यावे आणि सर्वांसाठी एकच शैक्षणिक पद्धती असावी. वरील ग्रंथात पुढे ते म्हणतात, ‘धार्मिक संकुचिततेमुळे सर्व जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. त्यातून त्यास वाचवावयाचे असेल, तर प्रत्येक मानवाची बुद्धी व विचारशक्ती जागृत केली पाहिजे. ज्ञानाची सर्व भांडारे सर्वांना खुली झाली पाहिजेत. सर्व उपलब्ध ज्ञान सर्वांनाच संपादन करणे शक्य होईल, अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे.’ ह्या सिद्धांताला त्यांनी ‘पॅनसॉफिझम’ असे नाव दिले. त्यांच्या काळी वैज्ञानिक क्रांतीला सुरुवात झाली होती; तसेच विज्ञानविचार व प्रस्थापित रूढ धर्मविचार यांतील विरोधही अधिकाधिक उग्र होत चालला होता. कोमीनिअस यांच्या मते, सत्यज्ञान व वैज्ञानिक वा धार्मिक ज्ञान कधीही अहितकारक होणार नाही. धर्म व विज्ञान ह्यांमध्ये विरोध असावयाचे कारण नाही. मानवतेसंबंधी खरे प्रेम ज्ञानसंपादनामुळेच उत्पन्न होऊ शकेल व आंतरराष्ट्रीय संघर्ष टाळता येतील.
लहान मुलांना ज्ञानसंपादन सुलभ व्हावे, म्हणून सचित्र क्रमिक पुस्तके त्यांच्या हाती देण्याची कल्पना कोमीनिअस यांचीच आहे. १६२८ सालचे ऑर्बिस सेंश्युअॅलियम पिक्टस हे त्यांचे पुस्तक कदाचित शिक्षणक्षेत्रातील अशा प्रकारचे पहिलेच पुस्तक असेल. त्यांचे इंग्रजीत भाषांतर व्हिझिबल वर्ल्ड या शीर्षकाखाली १९१० साली झाले. याशिवाय मुलांच्या स्वभावाची ठेवण लक्षात घेऊनच त्यांच्या शिक्षणपद्धतीचे नियोजन झाले पाहिजे, शिक्षण अगदी बाल्यावस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंत विविध संस्थांमधून मिळावे, अशा संस्थांचे वातावरण प्रेमळ असावे, कठोर शिस्तीचा जाच असू नये, प्रत्येकाच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिक्षण मिळावे वगैरे गोष्टी त्यांनी प्रतिपादिल्या.
वरील पुस्तकांव्यतिरिक्त त्यांनी द गेट ऑफ लँग्वेजेस अन्लॉक्ड (१६५९) आणि पॅनसॉफिक प्रोड्रोमस (१६६९) ही आणखी दोन पुस्तके लिहिली. त्यांच्या २०० लहानमोठ्या लेखांचा एक समग्र ग्रंथ १८६७ साली प्रसिद्ध झाला. त्यांच्या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतरही झाले आहे. गोटफ्रीट व्हिल्हेल्म लायप्निट्स या जर्मन तत्त्ववेत्त्यावर त्यांचा पगडा होता.
अखेरच्या दिवसांत कोमीनिअस अॅम्स्टरडॅम येथे जाऊन राहिले व तेथेच त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Sadler, J. E., Comenius and the Concept of Universal Education, New York, 1966.
समीक्षक – संतोष गेडाम