घरांचे प्रकारभाग   : बांधकामाच्या मजबूतपणावर आणि स्वरूपावर आधारित घरांचे असे वर्गीकरण करता येईल. हे वर्गीकरण साधारणपणे घरांचा टिकाऊपणा, घरबांधणीसाठी वापरलेली साधनसामग्री आणि तंत्रज्ञान यावर अवलंबून आहे. भारतात जनगणना करताना, घरांचे सर्वेक्षण करताना हे वर्गीकरण वापरले जाते.

१) कच्ची घरे

२) तात्पुरती घरे

३) पक्की घरे

कच्ची आणि पक्की हि दोन्ही स्वरूपाची घरे भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागात बघावयास मिळतात. परंतु, त्याचे स्वरूप आणि घरबांधणीसाठी वापरलेलं साहित्य यात मात्र फरक पडतो.

कच्च्या घराचा प्रकार

) कच्ची घरे : भारतासारख्या कृषिप्रधान देशात ग्रामीण भागात कच्ची घरे मोठ्या प्रमाणात बांधली जात. आजही अशी घरे ग्रामीण तसेच आदिवासी भागात आढळतात. तसेच शहरी भागातही कच्ची घरे बांधली जातात. परंतु त्याची रचना, घरबांधणीसाठी वापरलेलं साहित्य यात तफावत दिसून येते. परंपरागत कच्ची घरे ही साधारणतः कुडाच्या भिंती, त्यावर माती आणि शेणाचे लिंपण, लाकडी तुळया, त्यावर झावळ्यांचे किंवा गवताच्या गंजीचे छत आणि माती व शेणाने सारवलेली जमीन अशा स्वरूपाची असतात. अर्थात, भौगोलिक प्रदेशानुसार तिथे स्थानिकरित्या उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसामग्री, स्थानिक लोकांचे परंपरागत बांधकाम कौशल्य वापरून तिथल्या हवामानास अनुकूल अशी घरे बांधली जातात. त्यामुळेच, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात वेगवेगळी लोकवास्तुकला आढळून येते. लोकवास्तुकला हा वास्तुकलेतला एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असून त्यावर बरेचसे संशोधनही झालेले आहे. कच्च्या घरांचं आयुष्य कमी असतं असा एक ढोबळ समज जरी असला (आणि बहुतांशी तो खरा आहे), तरीही लोकवास्तुकलेनुसार बांधलेली काही घरे बराच काळ टिकतात.

शहरी भागातही कच्ची घरे बांधली जातात. ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात जी कुटुंबे स्थलांतरित होतात, त्यांना शहरात अधिकृत घर विकत किंवा भाड्याने घेणे शक्य नसते. अशा परिस्थितीत स्थलांतरित कुटुंबे शहरातील डोंगर उतार, सरकारी पडीक किंवा रिकाम्या जमिनी, रेल्वेरूळाच्या नजीकच्या जागा, बरेच वर्षे पडून असलेल्या खाजगी जागा यावर झोपड्यांच्या स्वरूपात अनधिकृतपणे घरे बांधतात. या झोपड्यादेखील कच्ची घरे या स्वरूपात मोडतात. प्रत्येक शहरांमध्ये स्थलांतरितांच्या झोपडपट्ट्या पाहावयास मिळतात. या अनधिकृत वस्त्या एक मोठी नागरी समस्या समजली जाते. झोपडपट्ट्यांमधल्या कच्च्या घरांसाठी विविध प्रकारचे बांधकाम साहित्य वापरले जाते. जुन्या इमारती पाडताना त्यातून निघालेल्या विटा, लोखंडी सळया, पत्रे, दारे, खिडक्या आणि प्लायवूड यांचा पुनर्वापर करून अशी घरे बांधली जातात. तसेच वीटभट्टीतून निघालेल्या कच्च्या किंवा अतिभाजलेल्या विटाही बांधकामासाठी वापरल्या जातात. बरेचदा लोकं स्वतःच आपली घरे बांधतात किंवा अकुशल कामगारांकडून ती बांधली जातात. बांधकामाचा खर्च कमीत कमी ठेवणे हा यामागचा मुख्य उद्देश्य असतो. निम्न दर्जाचे बांधकाम साहित्य आणि अकुशल कामगार यामुळे अशा घरांचे आयुष्य कमी असते. घरांचा निम्न दर्जा या व्यतिरिक्त घरातील अपुरी जागा, अपुरी वहिवाटीची जागा, अपुरा प्रकाश आणि वायुविजन, घरामध्ये संडास आणि न्हाणीघर अशा सोयी नसणे. अशा वस्त्यांत अपुरे रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी आणि वीज यांची अधिकृत आणि योग्य सोय नसणे, तसेच इतर नागरी सुविधा नसणे अशा अनेक समस्या झोपडपट्ट्यांमधून दिसून येतात. भूकंप, पाऊस आणि आगीपासून धोका अशा खूप मोठ्या समस्यांचा सामना झोपड्पट्टीवासीयांना करावा लागतो.

तात्पुरत्या घराचा प्रकार

) तात्पुरती घरे : तात्पुरती घरे ही विविध कारणांसाठी आणि त्याला अनुसरुन विविध बांधकाम साहित्य आणि तंत्रज्ञान वापरून तयार केली जातात. एखाद्या प्रकल्पातील विस्थापित लोक; वादळे, त्सुनामी, भूकंप, पूर, दरड कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित गावांचे पुनर्वसन; युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारे स्थलांतर यासारख्या विविध कारणासाठी तात्पुरती घरे बांधली जातात. प्रकल्पाचे स्वरूप, राहण्याचा कालावधी आणि तेथील हवामान यानुसार अशा तात्पुरत्या निवासस्थानाचे बांधकाम साहित्य आणि तंत्रज्ञान अवलंबून असते. बहुतांशी वेळा अशी निवासस्थाने ही पूर्वनिर्मित असतात आणि ती जागेवर कमीत कमी वेळात उभी केली जातात. बांधकाम जागेवर कमीत कमी वेळात घर उभे राहावे आणि प्रकल्प पूर्ण झाल्यावर दुसऱ्या प्रकल्पासाठी बांधकामाच्या सुट्ट्या भागांचा पुनर्वापर करता यावा अश्या प्रकारे या घरांची रचना केलेली असते. ही पूर्वनिर्मित घरे दोन प्रकारची असू शकतात.

  • पूर्वनिर्मित सुटे भाग कारखान्यात तयार करून जागेवर या भागांचे एकत्रीकरण करून घराची रचना करणे: या प्रकारची घरे वाहतुकदृष्ट्या सोयीची असतात, परंतु जागेवर सुटे भाग एकत्र करण्यासाठी तांत्रिक कौशल्याची गरज पडू शकते. तसेच एकत्रीकरणासाठी वेळ लागत असेल तर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी बाधित लोकांना त्वरित राहण्याची सोय करण्यास अडचणीचे ठरू शकते.

२) पूर्वनिर्मित तयार घर कारखान्यातून आणून जागेवर उभे करणे: या प्रकारची घरे वाहतुकीसाठी गैरसोयीची ठरू शकतात. परंतु जागेवर असे घर उभे करणे कमीत कमी वेळात शक्य झाल्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी बाधित लोकांना त्वरित राहण्याची सोय करण्यास उपयुक्त ठरतात.

या दोन्ही प्रकारची घरे आर्थिकदृष्ट्या परवडणारी असतीलच असे नाही. याप्रकारच्या घरांसाठी लोखंडी किंवा इतर धातूंची संयुगे यापासून बनविलेले बांधकामाचे सुटे भाग आणि त्यावर ताणून बसवलेले कापडी भिंतीचे आणि छताचे आवरण असे स्वरूप असू शकते. आजकाल त्रिमित छपाईचे बांधकाम तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञानदेखील पूर्वनिर्मित तयार घरांसाठी उपयुक्त ठरू शकते. यावर अधिक संशोधनाची गरज आहे.

3) पक्की घरे : बांधकाम साहित्याचा चांगला दर्जा, योग्य तंत्रज्ञान, तंत्रज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीत कुशल कामगारांनी केलेले बांधकाम ही पक्क्या घरबांधणीची वैशिष्ट्ये म्हणता येतील. बहुतांशी अधिकृत बांधकामे पक्क्या स्वरूपाची असतात. पक्की घरे बांधण्यासाठी कच्च्या घरांच्या तुलनेत अधिक वेळ, पैसे व मनुष्यबळ खर्ची पडते. एखाद्या लहान घरापासून ते उत्तुंग इमारतीपर्यंत पक्क्या घरांचे स्वरूप असू शकते. सिमेंट, वाळू, खडी, लोखंडी सळया वापरून केलेला, तसेच लोखंडी पूर्वनिर्मित इमारतीचे सुटे भाग यांचा इमारतीचा ढाचा, दगड, विटा, काँक्रीटचे विविध प्रकारचे ब्लॉक्स वापरून तयार केलेल्या भिंती, लोखंडी किंवा इतर धातूंची संयुगंपासून बनविलेली दारे, खिडक्या किंवा बाह्य आवरणे, रबर, प्लास्टिक आणि इतर संमिश्र साहित्य अशी कितीतरी साधनसामुग्री आधुनिक बांधकामात वापरली जाते. लोखंडी सळ्यांयुक्त सिमेंट काँक्रीटचे जागेवर केलेले बांधकाम किंवा पूर्वनिर्मित सिमेंट काँक्रीटचे सुटे भाग वापरून केलेले बांधकाम तसेच पूर्वनिर्मित लोखंडी बांधकाम घटक वापरून केलेले बांधकाम सांगाडे अशा कितीतरी प्रकारांनी पक्की घरे बांधता येऊ शकतात. आजकाल बांधकामासाठी बाह्य आच्छादन करण्यासाठी कितीतरी शोभिवंत साधनसामुग्री उपलब्ध आहे.

समीक्षक : श्रीपाद भालेराव