वाड्यांचा इतिहास : वाडा हा महाराष्ट्रात विकसित झालेला परंपरागत निवासस्थानाचा प्रकार आहे. हा वास्तुप्रकार पेशवेकाळात उदयास आला. मराठा साम्राज्यात साधारणपणे सतराव्या शतकाच्या शेवटी ते १८१८ पर्यंत (पेशवे ब्रिटिशांच्या अधीन होईपर्यंत) वाडासंस्कृती पुण्यात भरभराटीस आली. पुढे १९ व्या शतकातही वाडे बांधले गेले, परंतु पेशवेकाळातच वाड्यांची खऱ्या अर्थाने भरभराट झाली. दुसरा पेशवा बाजीराव (पहिला) याने पुण्यास राजधानी हलविली. बाजीरावाने १७३०-३२ च्या सुमारास शनिवारवाडा हा राजेशाही वाडा बांधला. त्यानंतर अठराव्या शतकाच्या मध्यावर पुण्यात अनेक मंदिरे, घाट आणि वाडे बांधले गेले. बाजीराव (पहिला) याने पुण्याला राजधानी बनविले, त्याआधी पुण्यात सहा पेठा अस्तित्वात होत्या. पेठ बांधणे हा सरकारी आणि खाजगी असा संयुक्त उपक्रम असे. त्याकाळी राज्यकर्ते आपल्यातल्या विश्वासू माणसांस पेठ बांधण्याचा हक्क, परवानगी आणि जबाबदारी द्यायचे. पेठा बांधण्याचे काम सरकारी नियोजन आणि तात्कालिक निर्णय यातून पूर्णरुपास यायचे. पेशवाईच्या काळात पेठा बांधण्याच्या कामाला औपचारिक स्वरूप आले. या काळात पेठा बांधण्याचे शेटे आणि शेटे-महाजन या मंडळीना देण्यात येऊ लागले. त्यांच्या कामाचं स्वरूप हे लोकोपयोगी सुविधा पुरवण्याचं असे. रस्ते बांधणी करणे, जागेची बांधकामयोग्य विभागणी  करणे, सोयीसुविधा पुरवणे, तसंच खाजगी जागा विकसित करण्यासाठी आणि वसविण्यासाठी लोकांना आमंत्रित करणे, हे शेटे आणि शेटे-महाजन यांच्या कामाचं स्वरूप असे. त्यांच्या कामाचा मुख्य भाग म्हणजे स्थानिक कारागिरांच्या वस्तूंसाठी आणि आयात केलेल्या मालासाठी बाजारपेठ वसविणे. या शेटे  मंडळींना कारागीर आणि व्यापारी यांच्याकडून माल किंवा नगद स्वरूपात करवसुलीचा अधिकार होता. काही पेठा निवासी पेठा होत्या तर काही पेठा मुख्यत्वेकरून बाजारपेठा होत्या, उदा., कसबा पेठ, सोमवारपेठ, सदाशिवपेठ या निवासी पेठा तर मलकापूर आणि बुधवारपेठ या बाजार पेठा. तर विसापूर ही लष्करी छावणी होती.

निवासी पेठांमधली घरांची म्हणजेच वाड्यांची रचना वैशिष्टयपूर्ण होती. वाडी म्हणजे जमिनीचा तुकडा. यातूनच अनेक कुटुंबांच्या घरांचं मिळून असलेल्या एकत्र जागेच्या विकसनाला ‘वाडा’ हे नाव प्रचलित झालं. आता वाडा म्हणजे ‘मध्यवर्ती चौक असलेलं घर’ असा अर्थ रूढ आहे. वाडा हे जसं श्रीमंतांचं घर तसंच जनसामन्यांचंही घर. वाडा हे जसं एका कुटुंबाचं घर तसंच अनेक कुटुंबाचंही घर.

 वाड्याचा आराखडा : जमिनीच्या पूर्ण तुकड्यावर वाड्याचे बांधकाम होत असे. अगदी तुलना करायचीच म्हटली, तर बंगले आणि वाडा यांचा आराखडा हा मोकळी जागा आणि बांधकाम यांच्या परस्पर-संबंधात अगदी उलट असतो. म्हणजे बंगल्याच्या आराखड्यात प्लॉटच्या साधारण मध्यभागी बांधकाम, त्याबाजूला अर्धच्छादित व्हरांडा आणि सभोवताली मोकळी जागा असते. त्याच्या बरोबर उलट, वाड्यात मध्यभागी मोकळी जागा म्हणजेच चौक आणि या चौकाभोवती व्हरांड्याच्या/सोप्याच्या बाजूने खोल्यांचे बांधकाम केलेले असते.

आधी उद्धृत केल्याप्रमाणे, रचनेच्या दृष्टीने वाडा म्हणजे ‘मध्यवर्ती चौक असलेलं घर’. या चौकांची संख्या घर मालकाच्या आर्थिक आणि सामाजिक-राजकीय स्थानाप्रमाणे एक, दोन, तीन ते अगदी सात चौकांपर्यंतही असे. मध्यभागी चौक आणि चारी बाजूने व्हरांड्यातून प्रवेश करता येतील अश्या अनेक खोल्या असं वाड्याचं ढोबळ स्वरूप.  वाड्याच्या अंतर्गत रचनेचा विचार करता त्याचे मुख्य ३ भाग करता येतील: १) मधला चौक २) व्हरांडा ३) खोल्या. हे तीन भाग मिळून जर एक ‘स्वयंपूर्ण भाग’ (module) होतो असं मानलं तर, वाड्यात घरमालकाच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे हे स्वयंपूर्ण भाग अनेक पटीत असत. वाड्याची रचना ‘अंतर्मुखी’ असे. मध्यवर्ती चौकांमधून व्हरांड्यामध्ये प्रवेश करायचा आणि व्हरांड्यातून खोल्यांमध्ये. खोल्यांचे दरवाजे व्हरांड्याच्या बाजूला. बाहेरून खोल्यांमध्ये थेट प्रवेश करण्याची सोयच नसे. चौक, व्हरांडा आणि खोल्या यांची रचना अत्यंत साधी परंतु उपयुक्तेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध होती.

चौक : चौक हा वाड्याचा महत्त्वाचा भाग आहे. सार्वजनिक-खाजगी जीवन, विविध कार्यक्रम, घरगुती कामे, घरातल्या महिलांचं खाजगीपण आणि हवामान अनुकूलन या सगळ्याच दृष्टीने चौकाची योजना यथायोग्य होती. मध्यवर्ती चौकामुळे हवा आणि प्रकाश खेळता राहायला मदत होत असे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे वाड्याला एक किंवा अनेक चौक असत. अधिक चौकांची योजना घरातल्या महिलांना खाजगीपण मिळण्याच्या दृष्टीने तसेच नोकरवर्गाच्या खोल्या, घोड्यांचा तबेला, गोठा वगैरे गोष्टी समाविष्ट करण्याच्या दृष्टीने उपयुक्त होती. बाहेरच्या चौकाचा उपयोग हा पाहुणे आणि परिचित यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्याच्याशी संवाद साधण्यासाठी होत असे. त्यामुळे या सर्वात बाहेरच्या चौकाचं स्वरूप हे सार्वजनिक आणि औपचारिक असे. जसजसं बाहेरच्या चौकातून आतल्या भागात गेल्यास चौकाचा खाजगीपणा किंवा घरगुतीपण वाढत असे. एकदम मागच्या चौकात नोकरवर्गाच्या खोल्या, घोड्यांचा तबेला, गोठा, संडास, न्हाणीघर वगैरे जागांची सोया केलेली असे. मधले चौक हे घरगुती आणि खाजगी वापरासाठी असत. अशा रचनेमुळे बाहेरचं जग, समाज आणि व्यक्तिगत जीवन यांमध्ये क्रमाक्रमाने अंतर ठेवलं जात होतं. चौकांच्या वापराचा अर्थ प्रत्येक कुटुंब प्रमुख आणि त्याचे कुटुंबीय वेगवेगळ्या प्रकारे लावू शकत होते आणि ते वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकत होते. परंतु त्याचबरोबर कोणते चौक कामासाठी वापरायचे याचे काही संकेत होते. घरातली कर्ती माणसं चौकांचा उपयोग सार्वजनिक आणि कचेरीच्या कामांसाठी करत, तर मधले चौक हे स्त्रिया त्यांचे सण- समारंभ साजरे करण्यासाठी वापरत. त्यांना बाहेरच्या जगात जाऊन मिसळण्याची संधी फारच क्वचित उपलब्ध असे. आतल्या बाजूचे चौक घरगुती कामांसाठी उदा., पापड्या, कुरडया वगैरे तसंच धान्य, मसाल्याचे पदार्थ वाळवणे अशासाठी होत असे. एक चौक असलेल्या घरात महिलावर्गाला दोन किंवा तीन चौक असलेल्या घरापेक्षा कमी खाजगी जीवन मिळे. घरातल्या कर्त्या पुरुषांचं कचेरीचं कामकाज चौकाच्या एका बाजूला घडत असे आणि चौकाच्या दुसऱ्या बाजूला स्त्रियांचं घरगुती कामकाज चाले. त्यामुळे सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनातलं अंतर कमी होत असे. अधिक चौक असलेल्या घरात दृश्य स्वरूपातही आणि वापराच्या दृष्टीनेही चौकाच्या रचनेचा आडोशासारखा उपयोग होई. तसेच चौकामुळे घराचे अंतर्गत भाग जोडले जात.

वाड्याच्या मध्यवर्ती चौकाचे अनेक घटक होते. ओटा, सोपा (व्हरांडा), त्यावरची गच्ची, जिना, पुष्करणी/कारंजे, हौद, विहीर, तुळशीवृंदावन असे कितीतरी घटक या चौकाशी निगडित होते. अर्थात, हे सगळे घटक एकाच चौकात नसत. कोणत्या चौकात कोणते घटक असावेत, हे त्या चौकाच्या संपूर्ण घरातल्या स्थानावर अवलंबून असे. उदाहरणार्थ, पुष्करणी किंवा कारंजे सर्वात बाहेरच्या म्हणजे प्रवेशद्वाराजवळच्या चौकात असे, जो सार्वजनिक आणि कचेरीच्या कामांसाठी वापरला जात असे. तसेच तुळशीवृंदावन हे ज्या चौकाच्या बाजूला देवघर आहे त्या चौकात असे, जेणेकरून पूजा करणाऱ्या यजमानास किंवा घरातल्या स्त्रियांना तुळशीची पूजा करता येईल आणि तिचे दर्शन घेता येईल. हौद मागच्या चौकात असे जेणे करून स्वयंपाकघर तसेच स्वच्छतागृहासाठी पाण्याचा वापर करणं सहज शक्य होईल.

 खोल्या : वाड्यात अनेक खोल्या असत. काही खोल्या ह्या विशिष्ट कामासाठी वापरल्या जात, तर काही खोल्या या गरजेनुसार वेगवेगळ्या कामासाठी वापरल्या जात. कचेरी, खलबतखाना, धान्याची कोठी, देवघर, स्वयंपाकघर, बाळंतिणीची खोली, स्वच्छतागृह वगैरे या विशेष कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या खोल्या. त्या इतर कामांसाठी वापरता येत नसत. तर सोपा, पडवी, माजघर, बैठकीची खोली या खोल्या गरजेप्रमाणे विविध कारणासाठी वापरल्या जात. त्या काळात महिलांवर बंधने असल्यामुळे काही खोल्यांमध्ये, विशेषतः जिथे बाहेरच्या लोकांची वर्दळ असे अश्या घराच्या भागात त्यांना जायला मज्जाव असे. याउलट, बाळंतिणीच्या खोलीत सहसा कोणाला प्रवेश मिळत नसे. नोकरवर्गाचा वावरदेखील घराच्या विशिष्ठ भागापुरताच मर्यादित असे. वाड्यातल्या खोल्यांना सोप्यातून (व्हरांड्यातून) प्रवेशद्वार असे. तसंच , या खोल्यांचे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी अंतर्गत दरवाजे असत.

परंपरागत वाड्यात लगतच्या खोल्यांत नातेवाईकांची अनेक कुटुंबे राहायला असत. तसेच व्यवसाय किंवा कामकाजाची जागाही खालच्या मजल्यावर रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या खोल्यांत असे. वरच्या मजल्यावर शयनगृह असत. तसंच, श्रीमंतांच्या वाड्यामध्ये, वरच्या मजल्यावर सुंदर सजवलेला दिवाणखानाही असे. सण-समारंभांना पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी त्याचा उपयोग होई. इथे काचेच्या दिव्यांनी सजवलेले छत असे.

सोपा : सोपा म्हणजे चौकाच्या बाजूला जोतं असलेली अर्धाच्छादित जागा. सोपा हा देखील वाड्याचा महत्त्वाचा भाग होय. दगडी जोत्यावर ओळीने असलेल्या लाकडी किंवा दगडी खांबांवर आधारित वरच्या बाजूला सज्जे अशी या सोप्यांची रचना असे. अर्धाच्छादित असल्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होत असे आणि खोल्यांमध्ये गारवा जाणवत असे. सोपेदेखील विविध कामांसाठी वापरले जात. बाहेरच्या सोप्यांमध्ये पुरुषांच्या कामाच्या चर्चा, भेटीगाठी, गप्पा होत असत. तर आतल्या सोप्यांमध्ये महिलांचे घरगुती कामकाज चाले. मुलेही सोप्याच्या सावलीत खेळत. या सोप्यामध्येच लाकडी पाटाचा झोपाळा लटकवलेला असे. याचा वापर लहान मुलांपासून जेष्ठ पुरुषांपर्यंत सर्वजण करत.

कारंजे, विहिरीवरचा रहाट, झोपाळा हे केवळ उपयुक्त आणि दृश्य परिणाम साधणारे घटक नव्हते, तर त्याचा एक श्राव्य परिणाम देखील साधला जात असे. झोपाळ्यावर बसून गाणी म्हणणं आणि आजूबाजूच्या मुलांसोबत मैत्र जपणं हाही वाडासंस्कृतीच्या समाजजीवनाचा महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे वाडा हे केवळ चौक, खोल्या आणि सोपा या तीन घटकांनी बनलेलं घर न राहता तो एक मानवीमनाचा, समाजजीवनाचा आणि तिथे राहणाऱ्या माणसांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग होता.

 रचना आणि स्थापत्यशैली : वाड्याचे बांधकाम संमिश्र असे. या वाड्यांची, लाकडी किंवा दगडी खांब आणि भारवाही भिंती आणि त्यावर लाकडी तुळयांचा सांगाडा अशी मुख्य संरचनाप्रणाली होती. लाकडी तुळयांवर दगडी फरसबंदी आणि त्यावर मातीचा थर, त्यावर शेणाने सारवलेली जमीन किंवा फरसबंदी अशी वरच्या मजल्याची रचना असे. छत हे उतरत्या लाकडी वाश्यांच्या सांगाड्याने तयार केलेले असे. त्यावर भाजलेल्या मातीची अर्धगोलाकार कौलं लावलेली असत. चौकात आणि जोत्यावर दगडी फरसबंदी केलेली असे. सोप्यावर एकतर दगडी फरसबंदी असे किंवा शेणाने सारवलेली जमीन. हे घरमालकाच्या आर्थिक स्तरावर अवलंबून असे. संरचनाप्रणाली ही निश्चित प्रमाणाच्या पटीत असे. यातल्या एका प्रमाणाला एक खण असं म्हणत. एक खण म्हणजे दोन खांबांमधलं अंतर. हे अंतर ५ फूट ते १० फूट असे. एका वाड्याचे खण साधारण समान मापाचे असत. वाड्याची त्रिमितीय रचना त्याच्या संरचनाप्रणालीशी सुसंगत होती. तसंच, वाड्याचे त्रिमितीय रूप हे त्याच्या आराखड्याचे दृश्य स्वरूप होते. वाड्याची सौंदर्यरचना बांधकाम साहित्याशी प्रामाणिक होती. या अर्थाने, वाड्याची वास्तुशैली आणि आधुनिक वास्तुशैली यांची तुलना करता येईल. संरचनाप्रणाली आहे त्या रूपात सादर करणं, बांधकाम साहित्य त्याच्या नैसर्गिक रूपात प्रदर्शित करणं, आराखड्याची रचना करताना उपयुक्ततेवर भर, कमीत कमी अलंकृतता आणि साधेपणा ही आधुनिक शैलीची वैशिष्ट्ये वाड्याच्या वास्तुशैलीतही दिसतात. त्यामुळे आधुनिक शैलीची बीजे वाडा शैलीमध्ये आहेत, असं म्हणता येईल.

वाडे बहुतांशी मुख्य रस्त्याला लागून असत. हे वाडे एकमेकांना लागून असल्यामुळे शहरातल्या मध्यवर्ती भागात जागेची बचत होत असे, तसेच उन्हाळा आणि थंडीच्या दिवसात हवामान अनुकूलनही साधले जात असे. वाड्याच्या समोर अंगण नसे तर रस्त्याला लागून ओसरी असे. ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी, शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी संवाद साधण्याची जागा होती. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्ताला उन्हात, पावसात इथे आसरा मिळू शके. अरुंद जागा आणि लागून असणारे वाडे, त्याचे पहिल्या आणि वरच्या मजल्यावर सलग दिसणारे सज्जे, घरांचे मजले साधारण सारख्याच उंचीचे असल्यामुळे रस्त्याच्या या कडेपासून त्या कडेपर्यंत मिळणारी घराच्या दर्शनीभागांची सलगता यामुळे रस्त्याकडेला शहरी पोताची एक वेगळीच दृश्यपरिभाषा मिळत असे. घरांच्या मजल्यांची उंची साधारण सारखीच जरी असली तरी मजल्यांची संख्या कमी जास्त असे.

घटकांचे तपशील आणि त्यातलं सौंदर्य : घराच्या आणि घटकांच्या रचनेचे आकृतीबंध हे बांधकामाच्या तपशिलांमधून आणि बांधकाम साहित्याच्या पोतावरून,  तसंच कारागिरांच्या कौशल्यावर अवलंबून असत. प्रवेशद्वार हे मोठे आणि दोन झडपांचे असे. त्यातल्या एका झडपेमधे मुख्यद्वार बंद असताना स्वतंत्रपणे उघडता येईल अशी दुसरी लहान झडप असे. त्याला दिंडी दरवाजा म्हणत. मोठा दरवाजा बंद असताना हा दिंडी दरवाजा उघडून माणसांना ये-जा करता येत असे. वाड्यांचे दरवाजे नक्षीकाम करून सुशोभित केलेले असत. हत्तीच्या पाठीवर असते तशा अंबारीप्रमाणे दरवाज्यांवर मेघडंबरीची रचना केलेली असे. गच्चीला आधार देण्यासाठी कोनबैठकांची (Brackets) रचना केलेली असे. या कोनबैठकांवर उत्तम नक्षीकाम केलेले असे. सुरुवातीच्या काळात बांधलेल्या वाड्यात लाकडाच्या उत्तम कोरीवकाम केलेल्या कोनबैठकी वापरलेल्या पाहावयास मिळतात. पुणातल्या विश्रामबागवाड्यातल्या द्वारमंडपावरच्या गच्चीला आधार देण्यासाठी सिंहमुखी, गरुडमुखी आणि मकरमुखी कोनाधारांची रचना करण्यात आली आहे. पुढे ब्रिटिशकाळात ओतीव लोखंडाचा बांधकामात वापर सुरू झाल्यानंतर, या काळात विकसित झालेल्या वाड्यांमध्ये ओतीव लोखंडात नक्षीकाम केलेले कोनाधारही वापरलेले दिसून येतात. अर्थात, नक्षीकामाचे हे तपशील घरमालकाच्या आर्थिक आणि सामाजिक श्रेष्ठत्वावर अवलंबून असत. गर्भश्रीमंतांच्या वाड्यात स्तंभ, स्तंभशीर आणि स्तंभमूळ या सगळ्यातच कोरीवकाम केलेले आढळे. ‘बहुपत्री कमानी’ (Multi-foliated Arches) हे पेशवेकालीन वाड्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होय. या कमानी भारवाही नसून तुळईच्या खाली दोन खांबांमध्ये सुशोभीकरणासाठी वापरल्या जात.

घराच्या जोत्यावर असलेल्या मजल्याच्या खिडक्या लहान असत जेणेकरून बाहेरच्या माणसास खिडकीतून डोकावून बघता येत नसे. वरच्या मजल्यावरच्या खिडक्या अरुंद पण उंच असत. त्या दोन झडपांच्या असत. त्या झडपा पुन्हा दोन आडव्या भागात विभागल्या जात. जमिनीवर मांडी घालून बसले असता खालची झडप उघडी ठेवली असता बाहेरचे दृश्य दिसे आणि वायुविजन होई. तसेच, उभ्या स्थितीत वरची झडप उघडली असता डोळ्याच्या पातळीत उघडी खिडकी येत असे. या खिडकीच्या वर अजून एक छोटी खिडकी वायुविजनासाठी ठेवलेली असे. एकोणिसाव्या शतकात या खिडकीच्या स्वरूपात अठराव्या शतकातल्या खिडकीचा मूळ ढाचा तसाच राहून काही बदल होत गेले. लाकडी तावदानांच्या ऐवजी काचेची तावदाने आली. कुठे अर्धवर्तुळाकार कमान किंवा गॉथिक कमान दिसू लागली.

गुजरात, राजस्थान आणि उत्तरेकडील हवेल्यांशी तुलना करता मराठी वाडे हे साधे होते. विशेष म्हणजे हे वाडे बांधणारे कारागीर बहुतेकदा राजस्थानहूनच आणले जात. महाराष्ट्रीय वाडे फारसा डामडौल नसलेले, साधे होते. त्यांचा आकार, प्रमाण यांची रचना मानवी प्रमाणही साजेसे होती. तथापि, पेशवे, त्यांचे सरदार आणि इतर अधिकारीवर्ग यांचे वाडे मोठे व भव्य असत. शनिवारवाडा ही पेशव्यांची सातखंडी गढी म्हणजे सातमजली उंच होती. जनसामान्यांचे वाडे मात्र एक ते चार मजली असत. सर्वसामान्यांच्या वाड्याचा दर्शनीभाग अतिशय साधा, अरुंद आणि अनअलंकृत असे. श्रीमंतांच्या वाड्याचा दर्शनी भाग मात्र सज्जे असलेला आणि नक्षीकामाने सालंकृत केलेला असे. काही मोठ्या वाड्यांमध्ये मंदिरे देखील असत. तर लहान वाड्यांमध्ये छोट्या देवळ्यांमध्ये देवाची स्थापना केलेली असे.

संदर्भ :

समीक्षक : श्रीपाद भालेराव