नारळासारखा सरळ व उंच वाढणारा एक शोभिवंत वृक्ष. तेलमाड हा वृक्ष ॲरॅकॅसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव एलिइस गिनीन्सिस आहे. हा आफ्रिकन वृक्ष मूळचा पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या (अंगोला आणि गँबिया) उष्ण प्रदेशातील असून तो गियाना, ब्राझील व वेस्ट इंडीज बेटे येथेही आढळतो. अलीकडे उष्ण प्रदेशातील मलेशिया, इंडोनेशिया आणि काँगो अशा अन्य देशांत तेलमाडाची लागवड केली गेली असून त्यापासून मिळणाऱ्या पामतेलाच्या निर्यातीतही हे देश पुढे आहेत.

तेलमाड वृक्ष

तेलमाड ६–२४ मी. उंच वाढतो. या वृक्षाचे खोड शाखाहीन असून त्यावर गळून गेलेल्या पानांच्या खुणा असतात. शेंड्याला संयुक्त, मोठ्या व काटेरी पानांचा पिसासारखा झुबका असतो. प्रत्येक पानावर ५०–६०, तलवारीप्रमाणे लांब, टोकदार व जाड पर्णिका असतात. फुलोरा शेंड्याकडे पानांबरोबर येत असून तो आखूड व जाड कणिशासारखा असतो. फुले एकलिंगी असून नर-फुले व मादी-फुले एकाच झाडावर येतात. एका वेळी ६–८ फुलोरे येत असून प्रथम नर-फुले व नंतर मादीफुले येतात. फळे आठळीयुक्त, पिवळी, लाल, शेंदरी किंवा काळी चकचकीत असून ती गुच्छाने येतात. फळे अक्रोडासारखी लंबगोल व टोकदार असून साल मांसल असते. त्यांत एक बी असते. बियांत पांढरा मगज असतो. परागण होऊन फळे तयार होण्यासाठी सहा महिने लागतात.

तेलमाड फळे

तेलमाडाच्या फळांपासून दोन प्रकारची तेले मिळतात; मांसल सालीपासून ३०–७०% पामतेल मिळते व बियांतील मगजापासून ४४–५३% पाम मगज तेल मिळते. पामतेलाचा रंग फिकट पिवळा ते गर्द नारिंगी असून ते चवदार व सुवासिक असते. ते खाण्यासाठी वापरतात. शिवाय साबण, मेणबत्त्या, मार्गारीन इ. उद्योगांत ते वापरतात. बियांच्या मगजापासून मिळणारे तेल पातळ, पांढरे व किंचित पिवळे असते. त्याला खोबरेल तेलाप्रमाणे सुवास आणि चव असते. त्यामधील स्टायरीन चॉकलेट बनविण्यासाठी तर शुद्ध तेल औषधे व सौंदर्यप्रसाधनांत वापरतात. झाडाच्या खोडाला व शेंड्याला भोके पाडून नीरा मिळवितात. तिचा ताडी व गूळ बनविण्यासाठी वापर करतात. तेलाचा उपयोग जैवइंधन म्हणूनही करतात.

एलिइस प्रजातीत दोनच जाती आहेत; एलिइस गिनीन्सिस (आफ्रिकन ऑईल पाम) आणि एलिइस ओलिफेरा (अमेरिकन ऑईल पाम). या दोन्हीपासून तेल मिळते. मात्र अमेरिकन ऑईल पामची लागवड मध्य व दक्षिण अमेरिकेपुरती मर्यादित असल्याने त्यांचा उपयोग स्थानिक गरजांसाठी होतो. जगातील बाजारपेठेत आफ्रिकन ऑईल पामपासून मिळणारे तेल विकले जाते.