सहेलियों की बारी : उदयपूर (राजस्थान) येथील फतेहसागर तलावाच्या काठावर स्थित असलेला हा एक प्रसिद्ध बगीचा आहे. असं म्हणतात की आपली राणी आणि तिच्या ४८ मैत्रिणींच्या विरंगुळ्यासाठी राणा संग्रामसिंग यांनी १७१० ते १७३४ या काळात या बागेची निर्मिती केली.

या बागेत चार तळी, असंख्य कारंजी, संगमरवरी शिल्प आणि विश्रांती घेण्यासाठी अनेक नक्षीदार मंडप आणि पाना-फुलांचे ताटवे आहेत.

नंतरच्या काळात महाराणा भोपालसिंग यांनी या ठिकाणी वर्षा – कारंज्यांच्या मंडपाची निर्मिती केली. या कारंज्याची रचना अशी होती की त्यातून पावसाच्या सरींचा वर्षाव झाल्याचा आभास निर्माण होत असे. मुख्य तलावाच्या काठावर चार काळ्या दगडातून घडवलेले मंडप आणि मध्यभागी एक श्वेत मंडप अशी रचना दिसून येते. श्वेत मंडपाच्या कळसातून ही पाण्याचा वर्षाव होतो. याला ‘रासलीला’ कारंजे असे नाव दिले आहे. काळ्या मंडपांवर चोचीतून पाण्याचा वर्षाव करणाऱ्या पक्षांची शिल्प आहेत.

सोंडेतून पाणी टाकणाऱ्या संगमरवरी हत्तीचे शिल्पही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही सर्व कारंजी त्यांनी इंग्लंडहून मागवून घेतल्याचे म्हटले जाते.

संदर्भ :

समीक्षक : श्रीपाद भालेराव