शरीरावर कायटिनाचे कवच असलेला आणि पायांच्या पाच जोड्या असलेला एक अपृष्ठवंशीय प्राणी.  संधिपाद संघातील कवचधारी वर्गाच्या दशपाद गणात झिंग्यांचा समावेश होतो. झिंगे जगात सर्वत्र आढळतात. भारत, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया व मेक्सिको येथे झिंगे पकडण्यात येतात. भारतात पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेशात आणि पश्चिम किनाऱ्यावर केरळ व महाराष्ट्रात झिंग्यांचे उत्पादन उल्लेखनीय आहे. झिंगा म्हणजे प्रॉन. प्रॉनचे वर्गीकरण पिनीड प्रॉन आणि नॉनपिनीड प्रॉन अशा दोन प्रकारांत करतात. पिनीड प्रॉन आकाराने मोठे तर नॉनपिनीड आकाराने लहान असतात. सामान्यपणे पिनीड प्रॉन म्हणजे झिंगे आणि नॉनपिनीड प्रॉन म्हणजे चिंगाटी अथवा कोळंबी होय.

झिंगा (पिनीयस इंडिकस)

भारतात झिंग्यांच्या १२-१५ जाती असून महाराष्ट्रात ८-१० जाती आढळतात. त्यांपैकी एका झिंग्याचे शास्त्रीय नाव पिनीयस इंडिकस आहे. भारतात झिंगे समुद्रामध्ये ३०-४० मी. खोल पाण्यात, उथळ जागी, खाऱ्या आणि निमखाऱ्या पाण्यात तसेच खाजणात आढळतात. तसेच नद्या, जलाशय व पाझर तलावात काही जातींचे झिंगे आढळतात. काही ठिकाणी गोड्या पाण्यात तसेच समुद्रकिनाऱ्याला नदीमुखाजवळील मचूळ पाणी अडवून कृत्रिम हौदात किंवा तळ्यात झिंगा-शेती केली जाते.

झिंगे पारदर्शी पांढऱ्या रंगाचे असून त्यांची उपांगे लालसर असतात. संपूर्ण शरीर कायटिनमय कवचाने वेढलेले असून शरीराचे शिरोवक्ष आणि उदर असे दोन भाग असतात. शिरोवक्ष १३ खंडांचे व उदर सहा खंडांनी बनलेले असते. उदर भाग शिरोवक्षाखाली बराचसा वाकडा असतो. त्यामुळे त्यांचा आकार स्वल्पविराम चिन्हासारखा दिसतो. शिरोवक्षात शिर (डोके) ५ खंडांचे आणि वक्ष ८ खंडांचे असते. शिराच्या पुढील बाजूस स्पृशा आणि स्पृशिका मिळून दोन जोड्या, वरील बाजूस डोळ्यांची एक जोडी व खालच्या बाजूला मुख असते. मुखाभोवती जंभाची एक जोडी व जंभिकांच्या दोन जोड्या असतात. त्यांना मुख उपांगे म्हणतात. वक्ष भागावर उपांगाच्या आठ जोड्या असतात. यांपैकी पहिल्या तीन जोड्या अन्न मुखाकडे नेणाऱ्या उपांगांच्या असून उरलेल्या पाच जोड्या पायाच्या असतात. या उपांगांचा उपयोग चालण्यासाठी व पोहण्यासाठी होतो. शिरोवक्षाच्या मानाने उदर जास्त लांब व स्पष्ट दिसणाऱ्या ६ खंडांनी बनलेले असते. उदराच्या खालच्या बाजूस वल्ह्यासारख्या प्लवपादांच्या पाच जोड्या असून त्यांचा उपयोग पोहण्यासाठी होतो. प्लवपादांची सहावी जोडी मोठी असून ती उदराच्या पश्च टोकाला असते. तिला पुच्छपाद म्हणतात. उदराचा अंत्यखंड आणि पुच्छपाद मिळून एक मोठे प्लवांग बनते. त्याला पुच्छपर म्हणतात.

झिंगे पाण्याच्या तळाशी उदर पायाने चालतात. प्लवपादांच्या साहाय्याने संथपणे पोहतात. आकस्मित धोका वाटल्यास शरीरातील स्नायूंचे आकुंचन करून पुच्छपराच्या मदतीने झटकन उलट्या दिशेने पोहोतात. शत्रूच्या तोंडातून निसटून जाण्यासाठी स्वत:चा एखादा पाय तोडून बचाव करतात. याला स्वविच्छेदन म्हणतात.

झिंगा सर्वभक्षी असून शेवाळे, वलयी प्राणी, प्राणी प्लवक, संधिपादांची अंडी व पिले आणि मृदुकाय प्राणी यांचे भक्षण करतो. अन्ननलिका सरळ असून त्यात अन्नपचन होते. कल्ल्यांमार्फत श्वसन होते. हृदय पृष्ठीय बाजूस असते. हरित ग्रंथी उत्सर्जनाचे कार्य करतात. चेतासंस्था पूर्ण विकसित असून डोळे, संतुलन पुटी, गंधेंद्रिये आणि स्पर्शेंद्रियाच्या मदतीने संवेदना ग्रहण करतात.

झिंग्यात नर व मादी बाहेरून सहज ओळखू येतात. नर आकाराने मादीपेक्षा मोठा असतो. नराचे उदर निमुळते तर मादीचे रुंद असते. ऑक्टोबर-डिसेंबर व मार्च-जून असे दोन प्रजननाचे हंगाम असतात. मादी दर वेळेस ३-४ लाख अंडी घालते. अंड्यांचे बाह्यफलन होते. फलित अंडी मादीच्या प्लवपादांना चिकटून राहतात. फलित अंड्यांतून १३-१४ तासांत डिंभ बाहेर पडतात. डिंभांची वाढ होत असताना त्यांचे पाच वेगवेगळ्या अवस्थांमधून रूपांतरण होते. शेवटच्या अवस्थेतील डिंभके किनाऱ्याच्या दिशेने स्थलांतरित होतात. तेथे त्यांची वाढ होऊन प्रौढ झिंगे निर्माण होतात. साधारणपणे ३-४ महिन्यांत झिंगे प्रजननक्षम बनतात व खोल समुद्राकडे स्थलांतर करतात. त्यांची वाढ होत असताना प्रत्येक वेळी जुने कवच टाकून नवे कवच तयार होते (कवच निर्मोचन). एका वर्षाच्या झिंग्याची लांबी १३-१४ सेंमी. तर दोन वर्षांच्या झिंग्याची लांबी १८ सेंमी. होते. असे पूर्ण वाढ झालेले झिंगे खाण्याकरिता वापरतात.

झिंग्यांच्या अनेक जातींमध्ये जीवदीप्ती आढळते. त्यामुळे प्रजननाच्या वेळी त्यांना जोडीदार ओळखता येतो. झिंगे पकडून ताज्या स्वरूपात वापरले जातात. तसेच ते शीतगृहात साठवून विक्रीसाठी पाठविले जातात. मोठ्या आकाराचे झिंगे शिरोवक्ष काढून गोठवितात. काही वेळा झिंग्यांचे कवच व अन्ननलिका काढून मांसाचा लगदा शिजवितात व नंतर गोठवून डबाबंद करतात. लहान आकाराचे झिंगे उन्हात सुकवितात आणि त्यांचे तुकडे अथवा पूड तयार करतात.

चिंगाटी (कोळंबी) आणि झिंगा ही नावे बऱ्याचदा समानार्थी वापरली जातात. परंतु हे दोन भिन्न प्राणी आहेत. त्यांच्यात अनेक फरक आहेत. त्यापैकी काही ठळक फरक म्हणजे चिंगाटीमध्ये उदराचा दुसरा खंड पहिल्या आणि तिसऱ्या खंडांना झाकून टाकतो, तर झिंग्यात दुसरा खंड फक्त तिसऱ्या खंडालाच झाकतो. चिंगाटीमध्ये कल्ल्यांच्या अक्षावर पटलांची एकच रांग असते, तर झिंग्यांमध्ये पिसाप्रमाणे दोन रांगा असतात. चिंगाटीमध्ये उदर शिरोवक्षाखाली जास्त वाकलेले असते, तर झिंग्यामध्ये उदर कमी वाकलेले असते. चिंगाटीला पायांच्या पहिल्या तीन जोड्यांच्या पुढच्या बाजूस चिमटे असतात, तर झिंग्याला पायांच्या पहिल्या दोन जोड्यांना चिमटे असतात.

जलसृष्टीतील अन्नसाखळीत झिंगे महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा