महाराष्ट्रातील सागरी पुरातत्त्वीय स्थळ व मध्ययुगीन बंदर. हे स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघोटण नदीच्या मुखाशी डाव्या तीरावर वसले आहे. विजयदुर्ग हे मराठा कालखंडातील किल्ल्यासाठी प्रसिद्ध असले, तरी त्याचा उल्लेख प्राचीन पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी (Periplus Maris Erithrei) या इ. स. पहिल्या शतकातील ग्रंथात आहे. तसेच टॉलेमीच्या जिओग्राफीया या इ. स. दुसऱ्या शतकातील ग्रंथात त्याचा ‘बायझंटाइनʼ (Byzantine) असा उल्लेख आहे.
विजयदुर्ग किल्ल्यावरील काही बांधकामे विजापूरच्या अदिलशाही काळातील असून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर अनेक इमारती बांधल्या आणि तिहेरी संरक्षक कोट बांधला. त्यांनी विजयदुर्ग येथे आपला नाविक तळ बनवला होता. या किल्ल्याच्या बळकटपणामुळे मराठा आरमार दीर्घकाळ यूरोपीय सत्तांशी झुंज देऊ शकले.
गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानच्या (NIO) पुरातत्त्वज्ञांनी १९९५ मध्ये विविध साधने वापरून व पाण्यात ८ ते १० मीटरपर्यंत बुड्या मारून वाघोटण खाडीत आणि किल्ल्याच्या पश्चिम बाजूला पाण्यातील अवशेषांचा शोध घेतला. वाघोटण खाडीत २.५ मी. खोलीवर लोखंडाचे तुकडे, लोखंडी तोफगोळे, चिनी मातीच्या भांड्याचा तुकडा, स्थानिक मध्ययुगीन खापरे व फुटक्या जहाजांचे तुकडे मिळाले. वाघोटण नदीच्या तीरावर किल्ल्यापासून ३ किमी. अंतरावर एका गोदीचे (११० मी. लांब, ७५ मी. रुंद) अवशेष मिळाले. ही गोदी मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी अठराव्या शतकाच्या प्रारंभी बांधली होती व त्यांचे सरदार आनंदराव धुळुप यांनी तिचे नूतनीकरण केले होते. गोदीचे प्रवेशद्वार ७ मी. रुंद असून या गोदीत ५०० टन वजनापर्यंतची जहाजे उभी राहू शकत होती. गोदीच्या जवळ अनेक दगडी नांगर मिळाले. ते सर्व स्थानिक वालुकाश्मांपासून बनवलेले आहेत.
पाण्याखालील सर्वेक्षणात किल्ल्याच्या पश्चिम बाजूला समुद्रात १०० मी. अंतरावर त्यांना पाण्याखाली दगडांनी बांधलेली प्रचंड मोठी भिंत (१२२ मी. लांब, ७ मी. रुंद व ३ मी. उंच) आढळली. दगड गोलाकार असून ते सांधण्यासाठी काहीही वापरलेले दिसले नाही. शत्रूची जहाजे फुटावीत म्हणून मराठा काळात संरक्षक भिंत बांधण्यात आली असल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते. तथापि अशाच प्रकारची २.८ किमी. लांबीची दगडांची रचना गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे पाण्याखाली आढळली आहे. त्यामुळे विजयदुर्ग येथील दगडांची रचना मानवनिर्मित नसावी, असे मत काही संशोधकांनी मांडले आहे.
संदर्भ :
- Joshi, Sachin, ‘Myth and Reality: The Submerged Stone Structure at Vijaydurgʼ, Annals of the Bhandarkar Oriental Research Institute, XCIII : 262-269, 2012.
- Tripati, Sila; Saxena, M.K.; Sundaresh; Gudigar, P. & Bandodker, S. N. ‘Marine Archaeological Exploration and Excavation of Vijaydurg – a naval base of the Maratha Period, Maharashtra, on the west coast of Indiaʼ, International Journal of Nautical Archaeology, 27(1): 51-631998.
समीक्षक : सचिन जोशी