ट्रेवी कारंजे, रोम :

रेनासंस अर्थात यूरोपमधील कृष्ण युगाच्यानंतर आलेला नवनिर्मितीचा कालखंड. रोमन ग्रीक संस्कृतींतील सौंदर्य दृष्टांतांना पुनरुज्जीवीत करताना नवनिर्मिती व सृजन असे दोन्ही व्यक्त होत होते. या नंतर बरोक काळ आला ज्यात भव्यता व अलंकारीकता दिसून येते जी याच काळातील इटालियन भूदृष्य कलेत पाहायला मिळते. १८व्या शतकातील बरोक रोममधील याचे उत्कट उदाहरण म्हणजे ‘ट्रेवी कारंजे.’ अंदाजे १७३२ ते १७६२ मध्ये सालवी व पानिनी या वास्तुविद्यांनी संकल्पलेले व फिलिपो डेला वाले व पी. ब्राकी या शिल्पकारांनी मूर्त रूप दिलेली एक सुंदर शिल्पकृती – ट्रेवी कारंजे.

अंदाजे २६ मी. उंच व ४९ मी. रुंद असलेले ट्रावरटीन दगडा मध्ये साकारलेले हे कारंजे तीन रस्त्यांच्या मिळण्याच्या ठिकाणी ट्रेवी या जिल्ह्यात आहे. अक्वा वेर्गी या जलवाहकाच्या अंतिम स्थळाच्या ठिकाणी रचलेले हे कारंजे अक्वा वेर्गीच्या पाण्यावर चाले. या कारंज्यात ओसिनस या जलदेवतेचा शिंपल्याच्या आकाराचा रथ अश्व ओढत आहेत व त्यांना ट्रिटोन हा समुद्राचा दूत हाकत आहे असे शिल्प पहावयास मिळते. या कारंज्याला क्लासिकल रोमन शैलीवर आधारलेल्या इमारत व कमानीची पार्श्वभूमी आहे व  ओसिनस जणू या कमानीतून येत आहे असे भासते. पाणी, दगड, शिल्प, इमारत हे सारे एकमेकांचा तोल न ढळू देता एका  लयबद्ध आकृतीबंधात बद्ध आहेत. भूदृश्य, शिल्प व वास्तू यांची  सुंदर  एकरूपता येथे पहावयास मिळते. कारंज्याचे पाणी खळखळत खाली येताना रथाचे अश्व जणू पाणी उडवीत आपल्याकडे येत आहेत असे भासते. हे पाणी खालील तलावात येते. ग्रीक देवता, रथ, अश्व या सर्वांच्या मूर्ती विलक्षण जिवंत वाटाव्यात अशा आहेत व शरीरे, हालचालीमुळे येणारा  स्नायूंतील ताण हे सारे मूर्तिकारांनी विलक्षण योजले आहे.

ट्रेवी कारंज्यात नाणी टाकण्याचा प्रघात आहे व हा नित्यक्रम अनेक वर्ष चालू आहे.

संदर्भ :

  • Jellicoe G and Jellicoe S. [1991]. The Landscape of Man. London: Thames and Hudson.

समीक्षक : श्रीपाद भालेराव