त्लालोक ही मेक्सिकोमधील अॅझटेक व तोल्तेक ह्या संस्कृतींची एक प्रमुख आणि प्राचीन देवता आहे. हा ओमेतेकुह्त्ली व ओमेतिकुहात्ल या विश्वनिर्मात्या दांपत्याचा पुत्र मानला जातो. ही पर्जन्य, वादळे आणि पर्वतांची देवता मानली जाते. यास जलाशय, झरे आणि मेघांचा स्वामी मानले जाते. जल व पर्जन्य यांचा निर्माता असल्याने ह्यास प्रजननाचा देवही मानले जाते. त्लालोक्वे नावाच्या गौण देवता त्याच्या निर्मितीच्या कार्यामध्ये त्याच्या साथीदार म्हणून सहभागी होतात. ह्या देवता विविध प्रकारचा पाऊस असलेले घडे धारण करतात. त्लालोकच्या आज्ञेने त्या हे घडे फोडतात, तेव्हा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो.
त्लालोकचे मुख व शरीर कृष्णवर्णीय असल्याचे वर्णन आढळते. त्याच्या हातात विजेचे चिन्ह किंवा सुळे असलेला सर्प चित्रित केलेला दंड दर्शविलेला आहे. अॅझटेक पुराणांमध्ये उल्लेख केलेल्या तेरा स्वर्गांपैकी आठव्या स्वर्गावर त्लालोकचे राज्य मानले जाते. तसेच विश्वाच्या पाच युगांपैकी तिसरे युग ह्याच्या अधिपत्याखाली येते, ज्याचा त्याने अग्निच्या वर्षावाने नाश केल्याचा उल्लेख पुराणकथेतून आढळतो.
मेक्सिको शहरामधील तेम्प्लोर मायोर येथे त्लालोकचे मंदिर आहे. प्राचीन काळी त्लालोकचे मुख्य देऊळ पर्वतावर असल्याचे म्हटले जाते. पर्जन्यप्राप्तीसाठी त्लालोकच्या देवालयामध्ये मनुष्यबळी दिले जात असत. ज्यात विशेषेकरून लहान मुलांचा समावेश असे. तसेच पूर टाळणे, अन्य ऋतूत थंडी पडू नये, पिकांवर रोग पडू नये अशा कारणांसाठीदेखील त्याला वर्षभर बळी दिले जात असत.
संदर्भ :
- Aguilar-Moreno, Manuel, Handbook to Life in the Aztec World, Los Angeles, 2006.
- Reville, Albert, Native Religions of Mexico and Peru, Pennsylvania, 2018.
- Spence, Lewis, The Mythologies of Ancient mexico and Peru, London, 1907.
समीक्षक : शकुंतला गावडे