मालवाहतूक करण्याकरता अतिशय मोठ्या आकाराचे कंटेनर (आधान) वापरायची पद्धत आहे. असे साधारण दोन मोठे कंटेनर एकत्र जोडून त्याचे चित्रपटगृहात रूपांतर करण्याची संकल्पना सध्या भारतात मूळ धरत आहे. एकमेकांना जोडलेल्या आधानांची प्रवेशद्वारे, आमंत्रणकक्ष, तिकीट खिडकी, स्वच्छतागृहे असा एक भाग, मुख्य चित्रपटगृह असलेला दुसरा भाग आणि उपहारगृहाचा तिसरा भाग अशा तीन भागात या गृहाची विभागणी केली जाते. वातानुकूलन यंत्रणा व ध्वनीविज्ञानावर आधारित असे ध्वनीचे अनावश्यक आवागमन होऊ नये, यासाठीचे विशेष तंत्रज्ञान (अकॉस्टिक्स) यामध्ये उपलब्ध करून दिले जाते. हे चित्रपटगृह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येऊ शकते, म्हणून याला मोबाईल चित्रपटगृह अथवा फिरते चित्रपटगृह असेही म्हणतात. पूर्वी शहरभागापासून दूरच्या छोट्या गावांमध्ये तंबू लावून चित्रपट दाखवले जात. ‘गाव तेथे चित्रपटगृह’ ही जुनीच संकल्पना आधुनिक रीतीने पुढे नेत तंबूला पर्याय म्हणून यात आधानांचा विचार केला गेला. त्यातून ‘आधान चित्रपटगृह’ (कंटेनर थिएटर) ही संकल्पना उदयास आली. भारताबरोबरच रशिया, अमेरिकेसारख्या देशातही या संकल्पनेबाबत विचार केला गेला आहे.

मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या कंटेनर्सचा वापर चित्रपटगृह बनवण्यासाठी करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे या प्रकल्पाला ‘कंटेनर थिएटर’ असे बोलीत रूढ असे नाव देण्यात आले. जागा, मनुष्यबळ आणि भांडवलाची चणचण भासत असताना आधान चित्रपटगृह या संकल्पनेमध्ये अनेकांना रस वाटण्याची शक्यता आहे.

पुनर्वापरक्षम केलेल्या जुन्या आधानांवर रासायनिक प्रक्रिया करून वापरण्यायोग्य केलेले नौका आधान (शिपिंग कंटेनर) हा या चित्रपटगृहासाठी लागणारा प्रमुख कच्चा माल होय. याचबरोबर मध्यम घनतेचे तंतु तक्ते (फायबर बोर्ड्स) आणि इतर काही पुनर्वापरक्षम केलेल्या वस्तू अशा प्रकारच्या चित्रपटगृहाच्या बांधणीसाठी वापरल्या जातात. कमीतकमी खर्चात जास्त नफा करून देणारा उद्योग या दृष्टीने या व्यवसायाचे निश्चितच महत्त्व आहे. ‘आधान चित्रपटगृहा’ची बांधणी आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने निश्चित आखून दिलेल्या नियमांनुसार केली जाते. याची इमारत ध्वनी आणि उष्णता यांच्या अनावश्यक वहनाला प्रतिरोध करणारी म्हणजेच ‘विसंवाहित’ (इन्सुलेटेड) असते. बांधणीसाठी वापरला जाणारा कच्चा माल हा १००% पर्यावरणस्नेही असलेल्या वस्तूंपासून किंवा पदार्थांपासून बनवलेला असतो.

चित्रपटगृहाचा आकार हा अंदाजे ११०० चौ. फूट इतका असतो. त्याच्याबरोबरच अंदाजे ५०० चौ. फूट इतका भाग उपहारगृह, स्वच्छतागृहे, प्रक्षेपकाची (प्रोजेक्टर) खोली आणि तिकीट खिडकी यांसाठी विभागून दिलेला असतो. सर्व सोयींनी परिपूर्ण अशा चित्रपटगृहाच्या बांधणीसाठी साधारण तीन महिन्याचा कालावधी लागतो. हे चित्रपटगृह वातानुकूलित असते. सिनेमाचा पडदा आणि आसनव्यवस्था याचबरोबर आधान चित्रपटगृहामध्ये कॅफेटेरिया / उपहारगृह, शौचालय या सोयी सुद्धा उपलब्ध असतात. याची आसनक्षमता साधारण १०५ एवढी असते.

‘आधान चित्रपटगृह’ हे आजकालच्या रूढ झालेल्या बहुपडदा (मल्टिप्लेक्स) चित्रपटगृहांच्या तुलनेत खूपच उपयुक्त आणि फायदेशीर पर्याय ठरू शकते. भारतातील पहिले आधान चित्रपटगृह ‘स्टारलाईट सिनेमा’ हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे २०१८ मध्ये उभे केले गेले. तसेच विशाखापट्टणम् येथेही आता आधान चित्रपटगृह ही संकल्पना अमलात आणली गेली आहे. देवगडनंतर कोकणातच सावंतवाडी येथे अजून एक कंटेनर थिएटर आकारास आले आहे. आधान चित्रपटगृह ही संकल्पना चित्रपटगृहांच्या इतिहासातली एक महत्त्वाची पायरी आहे, असे दिसून येते.

समीक्षक : हर्षद सहस्त्रबुद्धे