जॉन्सन, फिलिप : ( ८ जुलै १९०६ – २५ जानेवारी २००५ ) फिलिप जॉन्सन एक अमेरिकन आर्किटेक्ट होते जे त्यांच्या मॉर्डन व नंतर पोस्ट-मॉर्डन आर्किटेक्चर शैलीतील कामांसाठी जग प्रसिद्ध होते. प्रिझ्कर आर्किटेक्चर पुरस्कार,जो १९७९ मध्ये स्थापन झाला, त्याचे ते प्रथम विजेते आहेत. ग्लास हाऊस (१९४९), सीग्राम बिल्डिंग (१९५६), ५५० मॅडिसन एव्हेन्यू (१९८४), आय.डी.एस टॉवर (१९७३), पी.पी.जी प्लेस (१९८४), लिपस्टिक बिल्डिंग (१९८६) क्रिस्टल कॅथेड्रल (१९९०) ही जॉनसन यांची प्रतिष्ठित कामे.
फिलिप कॉर्टेलिउ जॉन्सन यांचा जन्म ८ जुलै १९०६ रोजी क्लीव्हलँड, ओहायो, अमेरिका येथे एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील होमर जॉनसन एक यशस्वी वकील होते व आई लुईसा पोप एका प्रतिष्ठित कुटुंबातून होती. लुईसा पोपचे काका, अल्फ्रेड पोप हे अमेरिकन उद्योगपती आणि कला संग्राहक होते, व चुलत बहीण थिओडटा पोप रिडल ह्या अमेरिकेतील प्रथम महिला आर्किटेक्टपैकी एक व मानवताप्रेमी होत्या. फिलिप हे न्यू ऍमस्टरडॅमच्या जानसेन घराण्याचे वंशज होते, त्यांच्या पूर्वजांपैकी न्यू ऍमस्टरडॅमची पहिली नगर योजना आखली होती. न्यूयॉर्क मध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर जॉन्सन यांनी हार्वर्ड विद्यापीठातून ग्रीक तत्त्वशास्त्र, इतिहास आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेतले. १९२७ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर, शास्त्रीय आणि गॉथिक आर्किटेक्चरच्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी, त्यांनी यूरोप दौऱ्यांची मालिका केली.
त्यांची १९२८ मध्ये जर्मनीचे आर्किटेक्ट लुडविग मीस व्हॅन डर रोहे यांच्याशी भेट झाली, त्यावेळी ते १९२९ च्या बार्सिलोना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी जर्मनी साठी मंडप डिझाइन करत होते. तेव्हापासून एकत्र काम, स्पर्धा व आजीवन मैत्रीची सुरुवात झाली.
हेनरी-रसेल हिचॉक, एक प्रख्यात स्थापत्य इतिहासकार, त्यावेळी अमेरिकेची ओळख ले कॉर्ब्युझियर, वॉल्टर ग्रोपियस आणि अन्य आधुनिकतावादी वास्तुविशारदांच्या कार्याशी करून देत होते. जॉनसन यूरोपहून परत आल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करु लागले. ‘मतांतराचा क्षण १९२९ मध्ये आला, जेव्हा मी जे.जे.पी. ऑडच्या आर्किटेक्चरवर हेनरीचा लेख वाचला. त्या क्षणापासून फक्त आधुनिकतावाद आणि त्या प्रकारच्या आधुनिक वास्तुकलेने मला आकर्षित केले’ जॉन्सन सांगतात.
जॉन्सन १९३० मध्ये न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टच्या आर्किटेक्चर विभागात सामील झाले व १९३२ साली त्यांनी तिथे मॉडर्न आर्किटेक्चरवर पहिले प्रदर्शन आयोजित करुन अमेरिकन लोकांपर्यंत आंतरराष्ट्रीय शैली व एक नवा दृष्टिकोन पोहोचवायची मोठी भूमिका बजावली. ‘आर्किटेक्चर ही कला आहे, इतर काहीही नाही’ असे जॉन्सन म्हणत.
दुसर्या महायुद्धाच्या काळात, जर्मनीत नाझींच्या उदयानंतर, आधुनिकतावादी मार्सेल ब्रुअर आणि मीस व्हॅन डर रोहे, यांना जर्मनी सोडण्यास भाग पडले. तेव्हा जॉन्सनने त्यांची अमेरिकेत येण्यास मदत केली. १९३६ मध्ये, महामंदीच्या काळात, जॉन्सनने म्युझियमची नोकरी सोडली व पत्रकारिता आणि राजकारण या क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु वयाच्या ३५ व्या वर्षी, १९४१ मध्ये, त्यांनी ते सोडले आणि हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाइनमध्ये प्रवेश घेतला; तिथे त्यांना मार्सेल ब्रुअर आणि वॉल्टर ग्रोपियस हे शिक्षक म्हणून लाभले. डिसेंबर १९४१ मध्ये अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केल्यानंतर जॉन्सन सैन्यात भरती झाले. १९४६ मध्ये, सैनिकी सेवा संपल्यानंतर, जॉन्सन क्यूरेटर आणि लेखक म्हणून म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टला परत आले. त्याचबरोबर त्यांनी आर्किटेक्चर क्षेत्रात कामे करण्यास सुरू केले.
त्यांनी १९४६ मध्ये लाँग आयलँड येथे मीस व्हॅन डर रोहेच्या शैलीत एक छोटेसे घर बांधले. त्यानंतर त्यांनी १९४९ मध्ये कनेक्टिकटमधील, मीसच्याच शैलीतील, ग्लास हाऊस पूर्ण केले जे आधुनिक वास्तुकलेतील एक स्मारक ठरले आहे. जॉन्सनने त्यानंतर मीस व्हॅन डर रोहे बरोबर न्यूयॉर्क मधील ३९ मजली सीग्राम बिल्डिंग वर सहयोगी आर्किटेक्ट म्हणून काम केले. १९६७ मध्ये जॉन्सन यांनी कारकिर्दीच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश केला, ज्यात आर्किटेक्ट जॉन बर्जी यांच्याबरोबर भागीदारी निर्माण झाली. जॉन्सन आणि बर्जी यांनी अनेक गगनचुंबी इमारतींची कामे मिळवली.
आर्किटेक्चरल स्टाईल/ शैलीबद्दल जॉन्सन १९७९ मध्ये असे म्हणाले की ‘शैलीची कोणतीही सुसंगतता सध्या दिसत नाही. संवेदनाशक्ती वेगाने बदलतायेत. पण कोणत्या दिशेने? सध्या कोणतेही प्रादेशिक अभिमान नाही, कोणतेही नवीन धर्म नाहीत, नवीन प्युरिटॅनिझम नाही, नवीन मार्क्सवाद नाही, अशी एखादी नवीन सामाजिकदृष्ट्या जाणीव असलेली नैतिकता नाही जी शिस्त, दिशा किंवा आर्किटेक्चरल पॅटर्नला सामर्थ्य देऊ शकेल. एखादी शैली तयार करण्यासाठी नैतिक आणि भावनिक झापडे लागतात. आपण बरोबरच आहोत अशी खात्री असावी लागते.’ १९८० नंतर जॉनसन पोस्ट मॉर्डन शैलीत डिझाइन करु लागले व १९९१ मध्ये त्यांनी भागीदारी संपवून स्वत: चे कार्यालय सुरू केले.
जॉन्सन यांना १९७८ मध्ये अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स गोल्ड मेडल देण्यात आले व १९७९ मध्ये ते, सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चरल पुरस्कार, प्रीट्झर आर्किटेक्चर प्राइजचे पहिले प्राप्तकर्ता झाले. १९९१ मध्ये जॉन्सन यांना अमेरिकन अॅकॅडमी ऑफ अचिव्हमेंटचा गोल्डन प्लेट पुरस्कार मिळाला.
‘कलेबद्दल बोलण्यापेक्षा ती करायला पाहिजे. आपण संगीत किंवा चित्रकला जाणवून घेणे जसे शिकू शकत नाही, तसेच आपण आर्किटेक्चर शिकू शकत नाही’ असे जॉन्सन म्हणत.
२५ जानेवारी २००५ ला वयाच्या ९८ वर्षी, त्यांच्या सुप्रसिद्ध ग्लास हाऊस कनेक्टिकट, येथे जॉन्सन मरण पावले.
संदर्भ :
- Peltason R. , Ong-Yan G. , P. ( 2010) The Pritzker Prize Laureates In Their Own Words, London: Thames and Hudson
- https://www.architecturaldigest.com/gallery/philip-johnson-architecture-buildings
- https://www.pritzkerprize.com/node/30
समीक्षक : श्रीपाद भालेराव