प्राचीन मानवी वसाहतींच्या ठिकाणी चाललेल्या उत्खननांत सर्व प्रकारच्या वनस्पतींचे अवशेष निरनिराळ्या स्वरूपांमध्ये सापडतात. अत्यंत प्राचीन काळी मानव अन्न गोळा करून व शिकार करून उपजीविका करत असे, तेव्हापासून मानव-वनस्पती सहसंबंध आहेत. प्राचीन काळात वनस्पतींचा वापर घरबांधणी, इंधन, अवजारे व हत्यारे आणि अन्न इत्यादींसाठी होत असे. थर्मोकोल, प्लॅस्टिक, काच, मिश्रधातू यांचा शोध लागण्यापूर्वी रोजच्या व्यवहारात माणसाला नेहमीच वनस्पतींची गरज पडत असे. पुरातत्त्वीय स्थळांवर प्राप्त होणाऱ्या वनस्पतींच्या अवशेषांचा अभ्यास पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञानात केला जातो. पुरातत्त्वीय स्थळांच्या ठिकाणी वसाहतींच्या थरांमध्ये आढळणाऱ्या वनस्पतींच्या अवशेषांमध्ये प्रामुख्याने मानवाने दैनंदिन व्यवहारात वापरलेल्या वनस्पती आणि मानवी वसाहतीच्या सभोवताली असणाऱ्या पण मानवाने व्यवहारात न वापरलेल्या वनस्पती असे दोन मुख्य प्रकार आढळतात. अशा दोन्ही प्रकारच्या पुरातत्त्वीय अवशेषांत समाविष्ट असणाऱ्या वनस्पतींच्या अभ्यासातून महत्त्वाची माहिती मिळते.

नवाश्मयुगीन स्थळावरील वनस्पतींचे अवशेष, कनिषपूर, (काश्मीर).

मानवी वसाहतीच्या संदर्भात अनेक वनस्पतींचे पराग, बिया, लाकूड व धागे असे विविध प्रकारचे अवशेष मिळतात. काही ठिकाणी जळके धान्य तर काही प्राचीन स्थळांमध्ये बांधकामासाठी वापरलेल्या मातीत धान्याची टरफले आढळून येतात. तसेच चुलीजवळील मातीच्या गोळ्यावर अथवा मातीच्या भांड्यांवर वनस्पतींचे ठसे मिळतात. हे अवशेष फार काळजीपूर्वक जमा करून सूक्ष्मदर्शकाचा वापर करून तपासले जातात. पुरातत्त्वीय स्थळांमध्ये असणारी माती चाळून पाण्यात टाकल्यास जळके अवशेष तरंगतात. पुरातत्त्वीय वनस्पतिवैज्ञानिक यावरून तेथे कोणत्या वनस्पती होत्या, ते ओळखतात. परंतु या वनस्पतींचा उपयोग मानवाने केला होता की नाही ते शोधून काढणे, हे यापेक्षाही अवघड काम आहे. म्हणूनच पुरातत्त्वीय निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी मानवशास्त्राची मदत घेतली जाते. अनेकदा आपण कितीतरी वनस्पतींचा उपयोग परंपरेने करीत असतो. लोकव्यवहार, लोकसाहित्य, लिखित परंपरा यांच्या बरोबरीने सध्या अस्तित्वात असणाऱ्या आदिम जमातींच्या वनस्पतिवापराचे निरीक्षण केले जाते. ऐतिहासिक काळात मानवाने शेकडो वनस्पती जगभर इकडून तिकडे नेल्या. मानवाच्या मदतीने झालेल्या अशा वनस्पतिप्रसाराची दखल घेणे आवश्यक असते. या सर्व कारणांमुळे पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञानातील संशोधनाचे स्वरूप फार व्यापक झाले आहे.

मानवाने सुमारे आठ-नऊ हजार वर्षांपूर्वी शेतीला प्रारंभ केला. या काळापासून आपल्याला प्राचीन वसाहतींमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या बिया मिळतात. पुरातत्त्वीय स्थळांमध्ये धान्याचे अवशेष पुष्कळदा जळालेल्या अवस्थेत मिळतात. वनस्पतींच्या अशा अवशेषांचा अभ्यास केल्याने आपल्याला प्राचीन व ऐतिहासिक काळातील शेतीविषयी आणि प्राचीन काळातील आहारांविषयी अतिशय उपयुक्त माहिती मिळते. उदा., उत्तर प्रदेशात चोपनी-मंडो या मध्याश्म युगातील (इ. स. पू. सुमारे पाच हजार वर्षे) ठिकाणी केलेल्या उत्खननात रानतांदळाचे अवशेष आढळले आहेत, तसेच संत कबीरनगर जिल्ह्यातील लहुरादेवा या नवाश्मयुगीन स्थळात भाताचे इ. स. पू. सहा हजार वर्षे जुने अवशेष मिळाले आहेत. यावरून गंगेच्या खोऱ्यात इ. स. पू. सुमारे सहा हजार वर्षे आधी भाताचा (तांदळाचा; Oriza sativa) आहारात समावेश असावा, असे दिसते. भारतीय उपखंडात गहू पश्चिम आशियातून आला. बलुचिस्तानमध्ये मेहेरगढ या ठिकाणी इ. स. पू. सुमारे सहा हजार वर्षे वयाच्या थरांमध्ये आइनकॉर्न (Triticum monococcum) व एम्मर (खपली; Triticum dicoccum) या जातींच्या गव्हाचे दाणे मिळाले. यानंतरच्या काळात एम्मर जातीच्या गव्हाचा आणि इतर कोणत्यातरी रानटी जातीच्या गवताचा संकर होऊन सहज मळणी करता येईल अशा गव्हाच्या गुणसूत्रांचे चार संच असणाऱ्या जाती तयार झाल्या. मेहेरगढ येथे गव्हाबरोबरच बार्लीच्या (Hordeum vulgare) अनेक उपजातींचे अवशेष आढळले. गव्हाचा वापर होण्यापूर्वी दीर्घकाळ रोटी बनविण्यासाठी बार्लीचा उपयोग केला जात असे.

भारतात अनेक धान्ये आफ्रिकेतून इतिहासपूर्व काळातच आलेली आहेत. उष्ण हवेत व अत्यंत कमी पावसाच्या प्रदेशातील महत्त्वाचे पीक असलेली ज्वारी (Sorghum vulgare), बाजरी (Pennisetum typhoides) व नाचणी (Elusine coracana) ही त्यांतील काही उदाहरणे आहेत. तर तुरीचा (Cajanaus cajanus) उगम भारतातच झालेला असून तुरीचे मूळ हे ओडिशा व छत्तीसगढमधील बस्तरमध्ये आढळणाऱ्या कजानस कजानिफोलिया (Cajanaus cajanifolia) या रानजातीमधे आहे.

उत्तर भारतात पठारी प्रदेशात असणाऱ्या रोपड या सिंधू संस्कृतीच्या ठिकाणी आणि अतरंजीखेडा या ऐतिहासिक स्थळावर सरल देवदार (पायनस रॅाक्सबर्गाय; Pinus roxburghii) व देवदार (सीड्रस डेओडारा; Cedrus deodara) या जातीच्या वृक्षांच्या लाकडाचा कोळसा मिळाला आहे. हे दोन वृक्ष हिमालयातील असून ते या ठिकाणापासून खूप लांब अंतरापर्यंत आढळतात. त्याचप्रमाणे शिसू (डाल्बर्जिया लॅटिफोलिया; Dalbergia latifolia) या दक्षिण भारतातील वृक्षाचा कोळसा उत्तर भारतात सापडणे यावरून प्राचीन काळात लोकांचे लांब अंतरावरील लोकांशी संबंध होते, असे दिसते.

ऐतिहासिक काळात मानवाने आपल्या फायद्यासाठी अनेक वनस्पतींचा प्रसार केला आहे. विशेषतः यूरोपीय वसाहतवादाच्या कालखंडात हे फार मोठ्या प्रमाणात घडून आले. परंतु यापूर्वीही मानवाने स्वतःबरोबर नवीन प्रदेशांमध्ये वनस्पती नेल्याची अनेक उदाहरणे आहेत. याबाबतीत निष्कर्ष काढण्यास पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञान उपयोगी पडते. भारतात चिनार वृक्ष (Platinus orientalis) मोगल कालखंडात आणण्यात आला, असे मानले जाई. तथापि काश्मीरमध्ये महापाषाण युगातील अवशेषांमध्ये या चिनार वृक्षाचे अस्तित्व आढळले आहे. मानवाच्या मदतीने इतिहासपूर्व काळात झालेल्या वनस्पतींच्या प्रसाराचे भारतीय उपखंडातील हे उत्तम उदाहरण आहे.

संदर्भ :

  • Fuller, Dorian ‘Agricultural Origins and Frontiers in South Asia : A Working Hypothesisʼ, Journal of World Prehistory, 2006.
  • Madella, Marco, Lanceolatti, Carla & Savard, Manon Eds. Ancient Plants and People, Tucson, 2014.
  • Misra, V.N. & Kajale, M. D. Introduction of African Crops into South Asia, Pune, 2003.
  • Palmer, Carol & M. Van der Veen ‘Archaeobotany and the Social Context of Foodʼ, Acta Paleobotanica, 2002.
  • Pokharia, Anil K. & Srivastava, Chanchala ‘Current Status of Archaeobotanical Studies in Harappan Civilization : An Archaeological Perspectiveʼ, Heritage, 2013..
  • Saraswat, K. S. ‘Agricultural Background of the Early Farming Communities in the Middle Ganga Plainʼ, Pragdhara, 2005.

समीक्षक : सुषमा देव