पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च अॅसोसिएशन (स्थापना: १९७८)

पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च अॅसोसिएशन (पीसीआरए) या संस्थेचे मुख्य कार्यालय दिल्लीत आहे. ही संस्था औद्योगिक कंपन्यांसोबत सामान्य जनतेलादेखील पेट्रोलियम पदार्थाची बचत करण्यासंबंधी मार्गदर्शन करते. भारत सरकारच्या अखत्यारीत येणारी ही एक नोंदणीकृत संस्था आहे. सरकारला व वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थांना पेट्रोलियम पदार्थांबाबत विविध योजना व धोरणे आखण्यात व ऊर्जा वाचवण्यात पीसीआरए मार्गदर्शन करते. इंधनावरचे आपल्या देशाचे अवलंबित्व कमी व्हावे या उद्देशाने ही संस्था कार्यरत असते व त्यासाठी निगडीत असे सर्वेक्षण आणि संशोधनाचे कार्य ही संस्था हाती घेते.

सर्वसामान्य नागरिकांना ऊर्जेच्या वापराबाबत ही संस्था मार्गदर्शक सूचना करत असते. त्या याप्रमाणे, स्वयंपाक करताना पाणी उकळू लागले आणि आपण जर गॅसचा प्रवाह कमी केला तर ४० टक्के गॅसची बचत होते. अन्न शिजवताना कमीत कमी पाणी वापरणे, कमी खोल असलेल्या टाकीचा स्टोव्ह वापरला तर कमी रॉकेल जळते. भात-डाळीसारखे पदार्थ अगोदर पाण्यात भिजवून मगच शिजवायला घेणे. फ्रीजमधले थंडगार पदार्थ प्रथम काही वेळ हवेत उघडे ठेवून मग शिजवायला घेणे, अन्न शिजत असताना त्या भांड्यावर झाकण ठेवणे, प्रेशर कुकरचा वापर करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या आवश्यक वस्तूंची तयारी ठेवणे. या दक्षतांमुळे आपण खूप इंधन वाचवू शकतो. स्वयंपाकघरातील उष्ट्या-खरकटयापासून बायोगॅस तयार करता येतो व त्याचा वापर करून आपण खर्चिक पेट्रोलियम इंधने वाचवू शकतो.

पेट्रोल, डिझेल आधारित वाहनांच्या वापराबाबतीत सामान्य माणसाला कशाप्रकारे बचत करता येते, याबाबतीत संस्था लोकांना मार्गदर्शन करते. दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी स्वयंचलित वाहने जर ताशी ४० ते ५० किमी वेगाने चालवली तर कमीतकमी इंधन लागते. वाहने अतिवेगाने नेली तर इंधन अर्धवट जळून त्याची नासाडी होते. तसेच वातावरणाचे प्रदूषण होते व अपघात होण्याच्या शक्यता खूप वाढतात. सिग्नलवर वाहतूक खोळंबली असते तेव्हा आपण गाडीचे इंजिन सुरूच ठेवतो त्यामुळे इंधनाची नासाडी होते आणि हवेचे प्रदूषण होते.

औद्योगिक क्षेत्रात कारखाने व संयंत्रांच्या ऊर्जेच्या दर्जाचे परीक्षण करून कारखान्याच्या विविध विभागात ऊर्जा कशी वाचवता येईल हे पीसीआरए दाखवून देते. पीसीआरए टेक्निकल परिषदा आयोजित करते. अॅक्ट (अॅक्टीव्ह कन्झर्वेशन टेक्निक) या नियतकालिकाद्वारे सोप्या भाषेत सूचना प्रकाशित करून संस्था ग्राहकांना ऊर्जा बचतीबाबत माहिती देते.

     संदर्भ :

    • तुस्कानो, जोसेफ, दृष्टीकोन, अनघा प्रकाशन, ठाणे.

 समीक्षक : अ. पां. देशपांडे