भारतीय नाण्यांमध्ये गुप्त राजांची नाणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर, इ. स. तिसर्या शतकाच्या उत्तरार्धात, प्राचीन भारताचा बहुतांश भूभाग गुप्त राजवंशाच्या आधिपत्याखाली आला. गुप्त राजवंशाने इ. स. तिसर्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते इ. स. सहाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत प्राचीन भारताच्या बहुतांश भूभागावर राज्य केले. या राजवंशाने प्रचलनात आणलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण नाण्यांचे प्राचीन भारताच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रारंभिक गुप्त नाण्यांवर कुषाण नाण्यांचा सकृतदर्शनी प्रभाव दिसत असला, तरी कालांतराने गुप्त सम्राटांनी विविध बदल घडवून स्वतंत्र धाटणीची नाणी प्रचलनात आणली. ही नाणी सोने, चांदी, तांबे आणि शिसे या धातूंची असून नाण्यांवरील बिरुदे आणि लेखांसाठी ब्राह्मी लिपी आणि संस्कृत भाषेचा वापर केलेला आहे. गुप्तकालीन अभिलेखात सुवर्ण नाण्यांसाठी ‘दिनार’ या संज्ञेचा प्रयोग केलेला आहे. नाणी बनविण्यासाठी ठसा पद्धत वापरली जात होती.
गुप्त सम्राटांच्या सुवर्ण नाण्यांच्या दर्शनी भागावरील नानाविध अंकनावरून या नाण्यांचे विविध प्रकार पडले असून, या अंकनात राजा वेगवेगळ्या कृतींत कार्यरत असताना दर्शविले आहे. दर्शनी भागावर प्रभावलयासहित राजा त्रिभंग मुद्रेत उभा असून, वेदीत अर्घ्यदान करताना दिसतो. राजा काही वेळेस धनुष्य व बाण, तलवार, परशू, चक्रध्वज आणि दंड धारण केलेला तर कधी हत्ती किंवा घोड्यावर स्वार असलेला अंकित केलेला आहे. दर्शनी भागावर राजा वाघ, सिंह किंवा गेंडा यांची शिकार करताना तसेच मंचावर आसनस्थ, मोरास फळ देताना किंवा वीणावादनात मग्न दिसून येतो. काही नाण्यांच्या दर्शनी भागावर राजावर छत्र धरणारा गण किंवा चक्रपुरुष अंकित केलेला दिसून येतो. काही सुवर्ण नाण्यांच्या दर्शनी भागावर, गुप्त राजवंशाचे राजचिन्ह असलेले गरुडध्वज अंकित केलेले दिसून येते. अश्वमेध प्रकारच्या नाण्यांवर फक्त युपासमोर (यज्ञविधितील लाकडी स्तंभ) उभा असलेला घोडा दर्शविलेला आहे. दर्शनी भागावर साधारणतः नाणी प्रचलनात आणणाऱ्या राजाचे नाव लिहिले असून विविध वृत्तातील — उदा., उपगीती, उपजाती, पृथ्वी, वंशस्थवील — लेख नाण्यांच्या कडेने लिहिलेला दिसतो.
सुवर्ण नाण्यांच्या मागील बाजूवर साधारणतः देवीचे प्रतिमांकन दिसून येते. देवी उभी किंवा विविध आसनात बसलेली दिसते. लक्ष्मी, गंगा, सिंहवाहिनी दुर्गा इत्यादी देवींचे प्रामुख्याने शिल्पांकन केलेले दिसून येते. क्वचित मागील बाजूस कार्तिकेय दिसतो. नाण्यांवर प्रामुख्याने ‘तमघा’ नामक भौमितिक रेखांकनाची विशिष्ट चिन्हे दिसून येतात.
नाण्यांच्या दर्शनी आणि मागील बाजूवरील लेखांतून गुप्त सम्राटांनी धारण केलेल्या उपाधी व त्यांच्यासाठी प्रयुक्त बिरुदे समजून येतात. या बिरुदांमध्ये प्रामुख्याने समुद्रगुप्त (अश्वमेध-पराक्रमः, कृतांत-परशु, व्याघ्र-पराक्रमः), काचगुप्त (सर्वराजोच्छेत्त्ता), द्वितीय चंद्रगुप्त (चक्रविक्रमः, सिंह-विक्रम, विक्रमादित्य), प्रथम कुमारगुप्त (अप्रतीघः, सिंहमहेन्द्रः, श्री महेंद्रखड्ग, श्री महेंद्रगजः, श्री महेंद्रादित्यः) आणि स्कंदगुप्त (क्रमादित्य) यांचा समावेश होतो.
प्रथम चंद्रगुप्ताची नाणी :
प्रथम चंद्रगुप्ताची केवळ सुवर्ण नाणी उपलब्ध आहेत. संजीव कुमार यांनी या राजाच्या सुवर्ण नाण्यांचे पाच प्रकार — राजा आणि राणी छाप, मंचावर आसनस्थ राजा आणि राणी छाप, मंचावरील धनुर्धर-देवी छाप, राजदंड छाप आणि मंच छाप — प्रकाशित केलेले आहेत; तथापि यांबाबत विद्वानांत मतभेद आहेत.
समुद्रगुप्ताची नाणी :
समुद्रगुप्ताने केवळ सुवर्ण नाणी प्रचलनात आणली असून या सुवर्ण नाण्यांचे सात प्रकार —धनुर्धर छाप, परशु छाप, अश्वमेध छाप, व्याघ्र-पराक्रम छाप, राजदंड छाप,भाला छाप आणि वीणावादक छाप — आहेत.
दर्शनी भागावर चक्रध्वज धारण केलेला राजा व ‘काच’ हे नाव आणि मागील भागावर देवीचे प्रतिमांकन व ‘सर्वराजोच्छेत्ता’ हे बिरुद असलेले सुवर्ण नाणे प्राप्त झालेले आहे. काही अभ्यासकांच्या मते, हे नाणे काच या राजाने प्रचलनात आणले असावे, तर काही अभ्यासक हे नाणे समुद्रगुप्ताचे मानतात. अलीकडील संशोधनावरून काही अभ्यासकांनी हे नाणे रामगुप्त या गुप्त राजाने काढले असावे, असे मत प्रतिपादित केले आहे.
रामगुप्ताची नाणी :
रामगुप्ताचे नाव साधरणतः गुप्त वंशावळीत आढळून येत नसले, तरी अभिलेखीय आणि नाणकशास्त्रीय पुराव्यांच्या आधारे, रामगुप्त या राजाने अल्पावधीसाठी गुप्त साम्राज्याची सूत्रे हाती घेतली होती, असे अभ्यासक मानतात. रामगुप्ताची केवळ ताम्र नाणी उपलब्ध असून ही नाणी प्रामुख्याने मध्यप्रदेशातील माळवा प्रांतातील विदिशा परिसरात प्राप्त होतात. या राजाची सहा प्रकारची ताम्र नाणी — गरुड छाप, कलश छाप, चक्र छाप, देवी छाप आणि अश्वमेध छाप — उपलब्ध आहेत.
द्वितीय चंद्रगुप्ताची नाणी :
द्वितीय चंद्रगुप्ताने चार वेगवेगळ्या धातूंत — सुवर्ण, चांदी (रजत), ताम्र आणि शिसे — नाणी काढली. अनंत सदाशिव अळतेकर यांच्या मते, द्वितीय चंद्रगुप्ताने प्रचलनात आणलेल्या सुवर्ण नाण्यात धनुर्धर छाप, सिंह-विक्रम छाप, घाडेस्वार छाप, छत्र छाप, मंच छाप, मंचावर आसनस्थ राजा आणि राणी छाप, राजदंड छाप आणि चक्रविक्रम छाप यांचा समावेश होतो. तसेच ताम्र नाण्यांत शीर्ष छाप, उभा राजा छाप, चक्र छाप, कलश छाप, छत्र छाप आणि गरुड छाप यांचा समावेश होतो. द्वितीय चंद्रगुप्ताने प्रचलनात आणलेली चांदी आणि शिसे यांची नाणी प्रामुख्याने सौराष्ट्र, कच्छ आणि माळवा प्रदेशामध्ये प्राप्त होतात. रजत नाणी पश्चिमी क्षत्रपांच्या रजत नाण्यांचा विलक्षण प्रभाव दर्शवितात. या नाण्यांच्या दर्शनी भागावर राजाचे शीर्ष आणि मागील बाजूस गरुड व राजाचे नाव अंकित आहे. काही नाण्यांवर शक किंवा गुप्त संवत्सरातील वर्ष नमूद केलेले दिसून येते. शिशाच्या नाण्यांत राजदंड छाप, पुष्प छाप, वृषभ छाप, गरुड-श्री विक्रम छाप आणि गरुडासहित तीन कमानयुक्त पर्वत छाप यांचा समावेश होतो.
प्रथम कुमारगुप्ताची नाणी :
प्रथम कुमारगुप्ताने द्वितीय चंद्रगुप्त प्रमाणे सुवर्ण, चांदी, शिसे आणि ताम्र नाणी काढली. त्याने प्रचलित आणलेल्या चौदा प्रकारच्या सुवर्ण नाण्यांत धनुर्धर छाप, घोडेस्वार छाप, खड्गधारी छाप, सिंहमहेंद्र छाप, व्याघ्रबलपराक्रम छाप, महेंद्रगज छाप, सिंहनिहंता महेंद्रगज छाप, महेंद्रखड्ग छाप, अश्वमेध छाप, कार्तिकेय छाप, छत्र छाप, अप्रतिघ छाप, वीणावादक छाप आणि राजा-राणी छाप यांचा समावेश होतो. रजत नाण्यांमध्ये गरुड छाप, मोर (मध्यदेश) छाप आणि त्रिशूळ छाप तसेच ताम्र नाण्यात छत्र छाप, गरुड छाप, घोडेस्वार छाप आणि डावीकडे उभा राजा छाप यांचा समावेश होतो. शिशाच्या नाण्यांत वृषभ छाप, चक्र छाप आणि गरुड छाप यांचा समावेश होतो. अभ्यासकांच्या मते रेपुझे (repousse) तंत्राने काढलेली सुवर्ण नाणी ज्यावर ‘महेंद्रादित्य’ हे बिरुद आढळून येते, ती नाणी प्रथम कुमारगुप्ताने प्रचलनात आणली असावीत. तसेच घटोत्कचगुप्तानेही धनुर्धर छाप या प्रकारचे सुवर्ण नाणे काढलेले आहे.
स्कंदगुप्ताची नाणी :
स्कंदगुप्ताने सुवर्ण, रजत आणि शिसे या तीन धातूंत नाणी काढली. सुवर्ण नाण्यांत धनुर्धर छाप, राजा व लक्ष्मी छाप, छत्र छाप, घोडेस्वार छाप आणि व्याघ्र-निहंता छाप यांचा समावेश होतो. ‘क्रमादित्य’ हे बिरुद असणारी रेपुझे तंत्राद्वारे निर्मित सुवर्ण नाणी ही स्कंदगुप्ताने काढली असावीत, असे अभ्यासकांचे मत आहे. रजत नाण्यांमध्ये गरुड छाप, मध्यदेश छाप, वृषभ छाप, वेदी छाप आणि त्रिशूळसहित वृषभ छाप यांचा समावेश होतो. शिशाच्या नाण्यांत गरुड छाप, महाशक्तीसह कुक्कुट छाप आणि महाशक्तीसह नंदी छाप यांचा समावेश होतो.
स्कंदगुप्तानंतर राज्य करणाऱ्या बहुतांश राजांनी धनुर्धर छाप या प्रकारातील सुवर्ण नाणी काढली. तृतीय चंद्रगुप्ताने काढलेली धनुर्धर छाप आणि घोडेस्वार छाप या प्रकारची नाणी अलीकडे अभ्यासकांनी प्रकाशित केली आहेत. प्रथम नरसिंहगुप्त, द्वितीय कुमारगुप्त आणि बुधगुप्त यांनी धनुर्धर छाप या प्रकारातील सुवर्ण नाणी प्रचलनात आणली. बुधगुप्ताने मध्यदेश छाप या प्रकारची रजत नाणीही काढली. वैन्यगुप्त, द्वितीय नरसिंहगुप्त आणि विष्णुगुप्त या राजांनी धनुर्धर छाप या प्रकारची सुवर्ण नाणी प्रचलनात आणली.
गुप्त राजवंशाच्या, विशेषतः त्यांच्या सुवर्ण नाण्यांच्या परिमाणावरून तत्कालीन आर्थिक स्थितीवर महत्त्वपूर्ण प्रकाश पडतो. प्रारंभिक कालखंडात नाण्यांचे वजन कमी असून ते कालांतराने वाढत गेल्याचे दिसून येते. गुप्त राजवंश व त्यांच्या सुवर्ण नाण्यांचे वजन पुढीलप्रमाणे : समुद्रगुप्त (६.५० ग्रॅ. ते ७.९९ ग्रॅ.), द्वितीय चंद्रगुप्त (६.७६ ग्रॅ. ते ९.१९ ग्रॅ.), प्रथम कुमारगुप्त (७.३४ ग्रॅ. ते ८.५९ ग्रॅ.), स्कंदगुप्त (७.११ ग्रॅ. ते ९.५५ ग्रॅ.) आणि बुधगुप्त (९.२१ ग्रॅ. ते ९.४५ ग्रॅ.).
गुप्तकालीन नाण्यांवरून तत्कालीन धार्मिक परिस्थितीवर महत्त्वपूर्ण प्रकाश पडतो. नाण्यांवरील गरुडध्वजांचे अंकन आणि ‘परमभागवत’ हे बिरुद गुप्त सम्राट वैष्णव धर्माचे कट्टर उपासक असल्याचे सूचित करते. सुवर्ण नाण्यांच्या मागील बाजूवरील देवी लक्ष्मीचे प्रतिमांकन समृद्धी व वैभवाच्या उपासनेचे महत्त्व दर्शविते. तर नाण्यांवरील कार्तिकेयाचे अंकन युद्ध देवता आणि स्कंद उपासना यांच्याशी गुप्त राजवंशाचे नाते प्रतिपादित करते. वैदिक यज्ञसंस्थेचे तत्कालीन समाजजीवनातील अनन्यसाधारण स्थान गुप्त राजवंशाच्या ‘अश्वमेध छाप’ या नाणे प्रकारातून दिसून येते. सुवर्ण नाण्यांवरील प्रदर्शित वस्त्रविन्यास, अलंकार, आयुधे, संगीतवाद्य आदींच्या अभ्यासावरून तत्कालीन सांस्कृतिक जीवनाचे समृद्ध दर्शन घडते.
संदर्भ :
- Altekar, Anant Sadashiv, The Coinage of the Gupta Empire and Its Imitations, Varanasi, 1957.
- Goyal, S. R. An Introduction to Gupta Numismatics, Jodhpur, 1994.
- Kumar, Sanjeev, Treasures of the Gupta Empire : A Catalogue of Coins of the Gupta Dynasty, 2017.
- गुप्त, परमेश्वरीलाल, भारत के पूर्व-कालिक सिक्के, वाराणसी, १९९६.
- ढवळीकर, मधुकर केशव, प्राचीन भारतीय नाणकशास्त्र, पुणे, २०१३.
चित्रसंदर्भ :
- श्री. संजीव कुमार, शिवली ट्रस्ट, अमेरिका, यांच्या सौजन्याने
समीक्षक : वैदेही भागवत