दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध राजवंश (इ. स. दहावे शतक ते तेराव्या शतकाची सुरुवात). कर्नाटकातील कल्याणी (बसवकल्याण) ही त्यांची राजधानी. कल्याणी चालुक्य राजवंशाला अनेकविध प्रकारची नाणी काढल्याचे श्रेय दिले जाते. यामध्ये नाणे पाडण्याची पद्धत, चिन्ह, लेख, वजन या सर्वच बाबतीत मोठ्या प्रमाणावर वैविध्य आढळते. यामुळे या नाण्यांचा थेट संबंध कल्याणी चालुक्य घराण्याशी लावणे आव्हानात्मक ठरते व बऱ्याच वेळा असा संबंध विवादास्पद व संदेहपूर्ण ठरतो, ही बाब लक्षात घेऊनच कल्याणी चालुक्यांची नाणी अभ्यासावी लागतात.

जयसिंह दुसरा उर्फ जगदेकमल्ल पहिला : (१०१५–१०४२). कल्याणी चालुक्य घराण्यात तीन जयसिंह होऊन गेले; तथापि त्यांतील जयसिंह दुसरा हा नृपती सर्वांत प्रभावी व शक्तिमान असल्यामुळे काही नाण्यांचा संबंध त्याच्याशी लावला जातो. त्याने जगदेकमल्ल हे बिरुद धारण केले होते. आहत पद्धतीने काढलेल्या या नाण्यांवर जयसिंह उर्फ जगदेकमल्ल या लेखांची विविध रूपे आढळतात. जयसिंह पद्धतीच्या नाण्यांचे वजन ५४- ५९ ग्रेन मध्ये असून नाण्यांवर तेलुगू- कानडी लिपीतील श्री  हे अक्षर दोन वेळा आणि वराह/ सिंह/ हत्ती यांपैकी एका चिन्हाचे एकापेक्षा अधिक ठसे आढळतात. नाण्यांवर जयदेव/ जय/ यज/ जयसिंह असा तेलुगू कानडी लिपीतील लेख आढळतो. जगदेकमल्ल पद्धतीच्या नाण्यांवर एका ठश्यात एका बाजूला भाल्याचे टोक (?) किंवा लहान देवळासारखी (?) आकृती आढळते. त्याच्या विरुद्ध दिशेस दुसऱ्या ठश्यात जग/ जगदे/ जगदेकमल्ल असा लेख सापडतो. या दोन्हीच्या मध्ये तेलुगू-कानडी लिपीतील नक्षीदार श्री  या अक्षराचे ठसे दिसून येतात. देवळाच्या आत वृक्ष, बिंदू, चंद्रकोर अशा प्रतिमा आढळतात. नाण्याची मागील बाजू कोरी असली तरी क्वचित नाग, चवरी, स्वस्तिक, शंख, हत्ती यांपैकी एखादी प्रतिमा आढळते. या नाण्यांशिवाय मध्यभागी मोठे देऊळ/ मनुष्य आकृती/ लिंग- वेदी/ वराह-पद्म/ सिंह अशी चिन्हे असणारी नाणी सापडली आहेत. त्यावर जगदेकमल्ल या शब्दाची अनेक अपभ्रंशित रूपे आढळतात. या बरोबरच मध्यभागी मोठे देऊळ (?) किंवा भाल्याचे टोक (?), वरती श्री जगदेव  असा नागरी लेख असणारी नाणी सापडली आहेत. तथापि ही नाणी काढण्याचे श्रेय परमार जगदेवला दिले जाते.

त्रैलोक्यमल्ल सोमेश्वर पहिला : (१०४४–१०६८). त्रेलो-मल  असा लेख असणाऱ्या काही नाण्यांचे श्रेय त्रैलोक्यमल्ल सोमेश्वर याला दिले जाते. नाण्यांवर एकूण नऊ ठसे दिसून येतात. या नाण्यांवर सिंह प्रतिमेचे पाच ठसे, श्री या तेलुगू कानडी लिपीतील अक्षराचे दोन ठसे व दोन ठश्यांमध्ये त्रेलो-मल असा लेख सापडतो.

भुवनेकमल्ल सोमेश्वर दुसरा : (१०६८–१०७६). कोडुर नाणे संचयामध्ये (कोडुर हे आंध्र प्रदेश मधील कडाप्पा जिल्ह्यातील एक गाव असून येथे १९३६ साली कल्याणी चालुक्यकालीन नाण्यांचा मोठा संचय सापडला होता. त्याचे ऐतिहासिक दृष्ट्या असाधारण महत्त्व आहे.) सापडलेल्या नाण्यांवर भुवन  हा लेख आढळतो. सोमेश्वर दुसऱ्याने ‘भुवनेकमल्ल’ हे बिरुद घेतल्यामुळे ही नाणी काढल्याचे श्रेय त्याला देण्यात येते. या नाण्यांवर पुढीलप्रमाणे ठसे आढळतात : ४ पद्म, २ तेलुगू-कानडी लिपीतील श्री हे अक्षर, सूर्य, अंकुश व चंद्र तसेच भुवन किंवा बवन हा लेख. काही नाण्यांवर सिंहाचा ठसा देखील आढळतो. मध्यभागी हत्तीचा ठसा असणारी व बवन लेख असणाऱ्या नाण्यांचा संबंधही सोमेश्वर दुसऱ्याशी लावला जातो.

विक्रमादित्य सहावा : (१०७६–११२६). कल्याणी चालुक्य घराण्यातील सर्वश्रेष्ठ नृपती विक्रमादित्य (सहावा) याच्याशीही अनेक प्रकारच्या नाण्यांचा संबंध लावला जातो. यामध्ये वराह चिन्ह व चालुक्यराम असे ठसे असणाऱ्या नाण्यांचा समावेश होतो. विक्रमादित्य (सहावा) याचे एक बिरुद चालुक्यराम होते. या शिवाय इतरही काही नाणे प्रकारांचा संबंध या नृपतींशी लावण्याचा प्रयत्न केला जातो. यांमध्ये मयूरचिन्ह असणारी नाणी, तसेच करुणाभूप लेख असणारी नाणी यांचा अंतर्भाव होतो. तथापि कोणत्याही ठोस पुराव्याअभावी या नाण्यांचा संबंध विक्रमादित्यशी लावणे संदेहपूर्ण ठरते.

वर वर्णन केलेल्या नाण्यांव्यतिरिक्त इतर अनेक आहत व ठसा पद्धतीने काढलेल्या नाण्यांचे श्रेय कल्याणी चालुक्य राजवंशातील  जयसिंह तिसरा (हा सार्वभौम राजा झाला नाही) याच्याशी संबंध लावला जातो; तथापि याबाबत अपुरी माहिती मिळते. कल्याणी चालुक्यांची नाणी मोठ्या प्रमाणावर आंध्र प्रदेश राज्यातील मसुलीपट्टण, नेल्लोर, कोंडविडू; तेलंगण राज्यातील वरंगळ, करीमनगर, मेडक, नळगोंडा, खम्मम, आदिलाबाद; कर्नाटक राज्यातील  विजापूर जिल्हा, बीदर, गुलबर्गा; महाराष्ट्राचा दक्षिण भाग तसेच खानदेश या दख्खन मधील बहुतेक प्रदेशांत आढळली आहेत, तर काही प्रमाणात मध्य प्रदेश येथे देखील आढळली आहेत.

संकेतशब्द : कल्याणी चालुक्य, कोडुर नाणे संचय, जयसिंह दुसरा जगदेकमल्ल पहिला,  त्रैलोक्यमल्ल सोमेश्वर पहिला,  जयसिंह तिसरा, विक्रमादित्य सहावा, सोमेश्वर तिसरा , जगदेकमल्ल  दुसरा, तैल तिसरा

संदर्भ :

  • Bhagwat, Vaidehi, History of Coinage in Deccan with Special Reference to Padmatankas (6th- 13th Century A.D.), Karnataka Historical Research Society, Dharwad, 2017.
  • Chattopadhyay, B. D. Coins and Currency Systems in South India c. AD 225- 1300, Delhi, 1997.
  • Mitchiner, Michale, The Coinage and History of South India, Karnataka Andhra, Part I, London, 1998.
  • Rama Rao, M. Select Gold and Silver Coins in the Andhra Pradesh Government Museum, Government of Andhra Pradesh, Hyderabad, 1963.

                                                                                                                                                                                    समीक्षक : अभिजित दांडेकर