मॅकार्थी, जॉन : (४ सप्टेंबर १९२७ – २४ ऑक्टोबर २०११)

 जॉन मॅकार्थी यांचा जन्म अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्यातील बोस्टन या शहरात झाला. ते एक बुद्धिमान विद्यार्थी होते आणि विद्यार्थीदशेपासून त्यांचा गणित या विषयाकडे विशेष कल होता. आपल्या किशोरवयातच कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथे वापरल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करून त्यानी महाविद्यालयीन स्तरावरील गणिताचा बराचसा भाग आत्मसात केला, ज्यायोगे त्यांना कॅल्टेक येथील गणिताच्या पहिल्या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात सूट दिली गेली. मात्र त्यांनी मधेच अमेरिकन सैन्यात काही काळ काम केले आणि परत कॅल्टेकमध्ये प्रवेश घेऊन गणित विषयातील बी.एस. ही पदवी प्राप्त केली. कॅल्टेकमध्येच जॉन फॉन न्यूमान (John von Neumann) या हंगेरियन-अमेरिकन गणितज्ज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संगणकशास्त्रज्ञ यांच्या व्याख्यानांनी मॅकार्थी यांच्या भविष्यातील वाटचालीला प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात स्थानांतरण केले आणि तेथून सोलोमन लेफ्शेझ (Solomon Lefschez) या गणितज्ञाच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयात पीएच.डी. प्राप्त केली. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय आंशिक विकलन समीकरणांची उकल (the solution of partial differential equations) असा होता.

प्रिन्स्टन आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातील अल्पकालीन नियुक्तीनंतर मॅकार्थी अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर राज्यातील हॅनोवर येथील आयव्ही (IVY) लीगमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या डार्टमाउथ महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर नियुक्त झाले. नंतर मॅकार्थी यांची अमेरिकेतील सुप्रसिध्द मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी) या संस्थेमध्ये संशोधक अधिछात्र (Research Fellow) म्हणून निवड झाली. १९६२ मध्ये मॅकार्थी स्टॅनफर्ड येथे प्राध्यापक पदावर रुजू झाले आणि २००० मध्ये निवृत्त होईपर्यंत तेथेच राहिले. त्यांनी ३० विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीसाठी मार्गदर्शन केले.

संगणकविज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील झपाट्याने होणारी प्रगती लक्षात घेता १९५६ साली डार्टमाउथ येथे कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयावरील पहिली परिषद मॅकार्थी यांनी आयोजित केली. त्यासाठी त्यांनी बनविलेल्या प्रस्तावात कृत्रिम बुध्दिमत्ता ही संज्ञा आणि संकल्पना संगणकाच्या संदर्भात प्रथम मांडली. या मागचा उद्देश असा होता की मानवी मेंदूप्रमाणे तर्क-वितर्क, युक्तिवाद, अमूर्त विचार करणे, समस्या सोडविणे आणि स्वसुधारणेसाठी प्रयत्न करणे अशाप्रकारच्या क्रिया करू शकणारे यंत्र बनविण्यासाठी मार्ग शोधणे. यंत्राने वापरण्याची भाषा तसेच ज्ञानाचा उपयोग ह्या दोन्ही बाबी गणिती तर्कशास्त्रावरच आधारित असाव्यात असा मॅकार्थी यांचा आग्रह होता. त्यादृष्टीने १९५८ साली त्यांनी लिस्प (Lisp) नावाची एक संगणक भाषा बनविली. ती कृत्रिम बुध्दिमत्ता विकसनासाठी मानक भाषा बनली. या संगणकीय भाषेचा उपयोग आजही यंत्रमानवशास्त्र (Robotics), इतर अनेक वैज्ञानिक अनुप्रयोग (अॅप्लिकेशन) आणि आंतरजालाच्या (इंटरनेट) आधारे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा यांच्यात केला जातो. ही भाषा सध्या वापरात असलेले आवाज आकलन तंत्रज्ञान (voice recognition technology) विकसित करण्याकरिता मार्गदर्शक ठरली. याचे ठळक उदाहरण म्हणजे अद्यतन (latest) आयफोनमधील सिरी (Siri) ही विशेष आज्ञावली (अॅप), जी निवडक गोष्टींबाबत वैयक्तिक सहाय्यकाची भूमिका बजावते. निर्णय घेण्यास यंत्रमानव कसा मुक्त असावा हे त्यांचे विचार मांडणारी The Robot and the Baby नावाची एक विज्ञानकथा त्यांनी २००१ मध्ये प्रसिद्ध केली.

मॅकार्थी यांनी अॅलगॉल ६० (ALGOL 60) या १९६० मधील सुप्रसिद्ध संगणक भाषेच्या विकासातही मोलाचे योगदान दिले.

१९६० च्या दशकात त्यांनी संगणक वेळ-वाटणी अशी संगणक-जोडणीची संकल्पना विकसित केली ज्याद्वारे संगणक वापरकर्त्यांना त्यांचे संगणक एका मध्यवर्ती संगणकाशी जोडून माहितीची देव-घेव सुलभपणे करता येऊ लागली. त्यांच्या मते अशा पद्धतीने सार्वजनिक दूरध्वनी यंत्रणेप्रमाणे संगणक सेवा लोकांना देणे शक्य होऊ शकते. मॅकार्थी यांनी सुचवलेले हे नवप्रवर्तन आंतरजालाच्या विकासात पुढे मोलाचे योगदान देणारे ठरले. तसेच आता प्रचलित झालेल्या क्लाऊड कॉम्प्युटिंग प्रणालीची (आंतरजालामार्फत अभिगम्य असलेल्या सर्व्हरमध्ये माहितीचे संचयन करण्याची पद्धत) देखील ती नांदी ठरली.

मॅकार्थी यांनी स्थापन केलेल्या स्टॅनफोर्ड एआय प्रयोगशाळेचे (Stanford Artificial Intelligence Laboratory) ते १९६५ ते १९८० या कालावधीत संचालक होते. १९६० आणि १९७०च्या दशकांत या प्रयोगशाळेने अनेक मानवी कौशल्यांची नक्कल करता येणाऱ्या कृत्रिम प्रणाली तयार करण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामध्ये दृष्टी, श्रवण-शक्ती, तर्क आणि हालचाली यांचा समावेश आहे. १९७०च्या दशकात, मॅकार्थी यांनी संगणकाद्वारे खरेदी आणि विक्री करण्याबाबत एक पथदर्शी शोधलेख सादर केला. त्यात ई-कॉमर्स म्हणून आता संबोधली जाणारी संकल्पना मांडली होती.

मॅकार्थी यांचा असा ठाम विश्वास होता की मानवी अध्ययन प्रक्रिया किंवा बुद्धिमत्तेची विविध वैशिष्ट्ये यांचे इतके अचूक वर्णन करता येईल, की त्यांचे अनुकरण करणे यंत्राला शक्य होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता या ज्ञानशाखेमधील सध्याची प्रगती, यंत्राने तोंडी दिलेल्या सूचनांनुसार क्रिया करणे किंवा चालक-विरहीतगाड्या (सेल्फ-ड्रिव्हन) वापरात आणणे यावरून त्यांचा विश्वास सार्थ होत असल्याचे दाखवत आहे.

मॅकार्थी यांना त्यांच्या संगणकविज्ञान आणि त्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता या ज्ञानशाखेतील योगदानासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मान मिळाले. ते म्हणजे, १९७१ साली संगणक विज्ञानक्षेत्रात नोबेल पारितोषिक मानला जाणारा असोसिएशन ऑफ कॉम्प्युटिंग मशिनरी ट्युरिंग पुरस्कार, क्योटो पुरस्कार, (जपान या देशाचा सर्वात मोठा खासगी पुरस्कार असून तो जागतिक स्तरावरील कामगिरीबद्दल दिला जातो आणि तेथे नोबेल पुरस्कारासमान मानला जातो), अमेरिकेचे गणितीय, सांख्यिकी आणि कम्प्यूटेशनल विज्ञानातील राष्ट्रीय पदक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणक वेळ-वाटणी (Computer Time sharing) या क्षेत्रातील कार्यासाठी आणि गणित आणि संगणक विज्ञानामध्ये भरीव योगदान देण्याकरिता संगणक इतिहास संग्रहालयाचे अधिछात्र म्हणून निवड झाली.

मॅकार्थी यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता प्रणालीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान यासाठी आयईईई इंटेलिजंट सिस्टीमच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करुन सन्मानित करण्यात आले.

२०१२ च्या स्टॅनफर्ड अभियांत्रिकी नायकांपैकी एक म्हणून त्यांना नामांकित केले गेले.

संदर्भ :

 समीक्षक : विवेक पाटकर