योग विद्या निकेतन, मुंबई : (स्थापना – १९७४)

योगावर प्रेम करणाऱ्या व योगाचा प्रचार व प्रसाराचे काम करणाऱ्या व्यक्तींनी योग विद्या निकेतन (योविनी) संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या स्थापनेमध्ये पद्मश्री योगाचार्य सदाशिव निंबाळकर यांचे मुख्य योगदान होते. योगाला घराघरामध्ये पोहचविणे हा योविनिचा मुख्य उद्द्येश आहे व त्यानुसार ‘योग विद्या घरोघरी ‘ या उद्द्येशाच्या पूर्तीसाठी योगशास्त्राच्या प्राचीन मूलतत्त्वांना बाधा न पोहचवता, त्यातील अचूक बारकाव्यांसहित व योगसाधनेच्या तंत्रासहित योगसाधना सामान्यजनांना करता यावी यासाठी योविनी संस्था प्रयत्नशील असते.

सदाशिव निंबाळकर व त्यांच्या पत्नी शकुंतला हे योगाच्या अभ्यासक्रमांचे आयोजन करीत आहेत. हे वर्ग पारंपरिक योगशास्त्रावरील मूलभूत सिद्धांतांवर आधारित असून ते शिकवतांना आधुनिक वैद्यकशास्त्रातील शरीररचनाशास्त्र (अॅनाटॉमी) व शरीरक्रियाविज्ञान (फिजिओलॉजी) तसेच प्रशिक्षणोपयोगी मानसशास्त्र (एजुकेशनल सायकॉलॉजी) या विषयांचा कौशल्याने उपयोग केला जातो. हा अभ्यासक्रम श्रेणीबद्ध असल्याने सुरुवातीला सुलभ त्यानंतर थोडे अवघड असे करत करत योगसाधकांना हळूहळू तयार करत सरतेशेवटी कठीण योगासने, प्राणायाम तसेच  बंध, मुद्रा इतकेच नव्हे तर हठयोगात सांगितलेली षट्कर्म (शुद्धिक्रिया) यांचाही अभ्यास विद्यार्थ्यांकडून करवून घेतला जातो.

योग विद्या निकेतनमध्ये ‘डिप्लोमा इन योगिक एज्युकेशन’ (टीचर्स ट्रेनिंग कोर्से इन योग) हा एक वर्षाचा महाराष्ट्र शासनमान्य अभ्यासक्रम दादर व वाशी येथे आयोजित केला जातो. या अभ्यासक्रमामध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयांमुळे योगाचे आपल्या मानवी शरीरावरील परिणाम जाणून घेण्याचे ज्ञान मिळावे हा हेतू असतो. परीक्षेच्या प्रात्यक्षिकांमध्ये आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा तसेच षट्कर्म (शुद्धिक्रिया) यांच्या सखोल चाचण्या, प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षाअखेरीस अन्य विद्यार्थी व परीक्षकांसमोर एखाद्या दिल्या गेलेल्या योग संबंधित आसन व प्राणायाम आदींवर वर्ग (लेसन प्लॅन) घ्यावा लागतो. सर्वांत महत्त्वाचे आणि कठीण म्हणजे अभ्यासक्रमाच्या शेवटी मे महिन्यात एक महिन्याच्या वासंतिक योग वर्गांचे आयोजन करणे व त्यामध्ये त्या वर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शिकविणे. या वर्गाच्या आयोजनाकरिता संस्था योगप्रशिक्षक विद्यार्थ्यांना सर्वप्रकारे साहाय्य करीत असते. वासंतिक वर्गासंदर्भात भित्तीपत्रके कशी बनवावीत, कुठे लावावीत, वासंतिक योग वर्गांसाठी जागा कशी व कुठे मिळवावी, नोंदणी/प्रवेश शुल्क कसे गोळा करावे, अशा अनेक महत्त्वाच्या सूचना संस्था करीत असते.

योविनीमध्ये डिप्लोमा इन योग थेरपी, नॅचरोपॅथी अँड नॅचरल लिविंग हा आणखी एक अभ्यासक्रम आहे. ज्या विद्यार्थ्यांनी योविनीचा वा अन्य योग संस्थांचा योग प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, अशांना या प्रगत योग थेरपी व नॅचरोपॅथी अँड नॅचरल लिविंग या वर्गासाठी प्रवेश देण्यात येतो. ह्या वर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या वर्गाना शिकविण्यासाठी योग तज्ज्ञांसोबत विविध वैद्यकशास्त्र तज्ज्ञ देखील आमंत्रित केले जातात. उदाहरणार्थ, हृदयरोगतज्ज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) यांचे व्याख्यान झाले की लगेच त्या रोगांना अनुकूल अशी योग संबंधित प्रात्यक्षिके व चर्चा योगतज्ज्ञ करतात व विद्यार्थ्यांना रुग्णाकडून ती कशी करवून घेतली जावीत याबाबतचे मार्गदर्शन केले जाते.

निसर्गोपचाराची मूलतत्त्वे तसेच निसर्गोपचाराची प्रात्यक्षिके ह्यांची जोड ह्या अभ्यासक्रमास दिली जाते. निसर्गोपचार आश्रमास भेट व दोन दिवसांची निवासी कार्यशाळा ही अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. याखेरीज मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रमांचे आयोजन पुणे, सातारा, नागपूर इथे केले होते. तसेच भारताबाहेरही परदेशामध्ये  शास्त्रशुद्ध योगाचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने संस्थेतर्फे अमेरिका, कॅनडा, थायलंड आणि सिंगापूर येथे विशेष योगप्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात केले होते.

बालकांसाठी दरवर्षी योगसंस्कार कार्यशाळा, सूर्यनमस्कार कार्यशाळा, योगाद्वारे स्थूलता निवारण, योग व मधुमेह नियंत्रण,  योग व रक्तदाब नियंत्रण अशा अनेक कार्यशाळांचे नियोजन योविनी करते.

योग विषयाशी संबंधित अनेक पुस्तकांचे प्रकाशन संस्थेने मराठी,  इंग्लिश, हिंदी, कन्नड, तमिळ आणि गुजराथीत केले आहे. योविनि योगवार्ता  मासिकाचेही  प्रकाशन करते.

योविनिचे संस्थापक योगाचार्य निंबाळकर यांच्या कार्याचा गौरव २००४ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान करून केला. नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कार्याचा सन्मान २००२-०३ साली ‘नवी मुंबईरत्न’ पुरस्कार देऊन केला.

संदर्भ :

समीक्षक : सतीश पाठक