प्राणायाम हा हठयोग व पातंजल (अष्टांग) योगाचा एक प्रमुख भाग आहे. आसनांच्या दीर्घ अभ्यासामुळे प्राणायामासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची, उदा., शारीरिक व मानसिक स्थैर्य, स्वास्थ्य, पद्मासन किंवा तत्सम ध्यानोपयोगी आसनांत बराच वेळ बसण्याची क्षमता, आंतरिक शांती व नाडीशुद्धी इत्यादींची पूर्तता होते व साधक प्राणायामासाठी सिद्ध होतो.

प्राणायाम

जोपर्यंत श्वासोच्छ्वास सुरू आहे तोपर्यंत मन भटकत राहते व श्वास प्रयत्नपूर्वक थांबविला तर मन निश्चल होते; म्हणजेच मनाचा व श्वसनाचा घनिष्ठ संबंध आहे. सुईमध्ये दोरा ओवताना श्वास किंचित काळ थांबतो. याचा अर्थ लक्ष केंद्रित करण्याची गरज असली तर श्वास थांबतो. या निरीक्षणातून हठयोगाने श्वसनाच्या नियंत्रणावर आधारित अशी प्राणायामाची पद्धत विकसित केली. ‘प्राणायाम’ ही संज्ञा ‘प्राण’ व ‘आयाम’ या दोन शब्दांनी तयार झाली आहे. ‘प्राण’ म्हणजे आपली जीवनशक्ती असून तिच्यामुळे मनासहित सर्व इंद्रियांना कार्य करण्याचे सामर्थ्य मिळते. रक्ताभिसरण व श्वसनादि कार्ये प्राणशक्तीमुळे अव्याहत चालतात. ‘आयाम’ याचा अर्थ विस्तारणे, प्रसारित करणे, कार्यान्वित करणे होय. अर्थात प्राणायाम म्हणजे श्वासावर ऐच्छिक नियंत्रण आणून नाड्यांद्वारे प्राणशक्तीला प्रवाहित करणे. अव्याहत चालणाऱ्या श्वसनरूपाने ही प्राणशक्ती आपल्या शरीरात टिकून असते व ती शरीरधारणेसाठी विविध कार्ये संपादित करते. श्वसनाचा संबंध प्राणाशी आहे आणि प्राणाचा संबंध चित्ताशी आहे. म्हणूनच प्राणायाम केल्याने चित्तावर नियंत्रण येते.

आपल्या इच्छेनुसार, जाणीवपूर्वक, योग्य तऱ्हेने, योग्य प्रमाणात स्वयंचलित श्वसनाची गती थांबविणे, नियंत्रित करणे, जेणेकरून मनाला स्थिर करणे म्हणजे प्राणायाम (पातंजल योगसूत्र २.४९). गतिविच्छेद म्हणजे श्वासाची सुरू असलेली गती रोखणे. गती थांबविल्यास त्या क्रियेला कुंभक किंवा स्तंभवृत्ती असे म्हणतात. अष्टांगयोगात श्वास-प्रश्वासरहित स्तंभवृत्ती, श्वास-प्रश्वाससहित स्तंभवृत्ती, सूक्ष्म नाडी शोधन व चक्रशोधन या चार प्रकारच्या स्तंभवृत्ती दिलेल्या आहेत. परंतु, कोणत्याही प्राणायामाचे नाव दिलेले नाही. हठयोगात मात्र ८ प्रकारचे कुंभक म्हणजेच प्राणायाम व त्यांची नावे व कृती तसेच त्यांच्या लाभांचेही वर्णन केले आहे. सूर्यभेदन, उज्जायी, सीत्कारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्च्छा व प्लाविनी हे ते आठ प्राणायाम आहेत. सर्व प्राणायामांमध्ये कुंभकाची कृती एकसारखी आहे. मात्र पूरक व रेचकाच्या कृतीत बदल असल्याने निरनिराळ्या प्राणायामांचा परिणामही वेगवेगळा आहे.

उद्दिष्टे : जेव्हा जेव्हा राग, द्वेष, दु:ख इत्यादी भावनांचा अतिरेक होतो तेव्हा तेव्हा श्वसनाची गती, खोली व प्रकारात फरक होतो. भावनांचा व मानसिक अवस्थांचा परिणाम स्वयंचलित मज्जासंस्थेवर होतो व त्याद्वारे श्वसनात बदल घडतात. याचा अर्थ असाही होतो की, जर श्वसनात योग्य ते बदल मुद्दाम केले व असा प्रयत्न रोज केला तर भावनांवर, मनावर नक्कीच नियंत्रण प्राप्त होऊ शकेल. परिणामी आपल्या अवाजवी इच्छा, वासना, अहंकार यांतून उत्पन्न होणारे विचार व अनावश्यक वृत्तींवरही नियंत्रण आणता येईल. प्राणायामाचा एक उद्देश मनावर आणि चित्तवृत्तींवरही ताबा मिळविणे हा होय. मानसिक शांतता, संतुलन, स्थिरता प्रस्थापित करणे, निर्धारित लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणे हे देखील प्राणायामाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे साधकाची धारणा, ध्यान यासाठी तयारी होते.

‘कुंडलिनी प्रबोधन’ म्हणजेच सुप्तावस्थेत असलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करून तिला सुषुम्ना मार्गाने ऊर्ध्वगामी करणे हा प्राणायामाचा आणखी एक उद्देश आहे. अर्थातच ह्या आध्यात्मिक प्रगतीसाठी निरंतर तीव्र स्वरूपाच्या प्राणायामाची साधना आवश्यक आहे. यासाठी गुरूच्या मार्गदर्शनाखालीच प्राणायामाचा अभ्यास शिकावा व करावा असे हठयोग सांगतो.

स्वरशास्त्र व नाडीशुद्धी : आपण बहुतेक वेळा एकाच नाकपुडीने श्वास घेत असतो व सोडत असतो, दुसरी नाकपुडी जवळ जवळ बंदच असते किंवा अंशत: उघडी असते. दर २-३ तासांनी नाकपुड्या आलटून पालटून उघडत असतात, बंद होत असतात. योगात उजवी व डावी बाजू अनुक्रमे सूर्य व चंद्र तत्त्वांशी सबंधित असल्याचे मानले जाते. नाडी म्हणजे सूक्ष्मनलिका, जिच्यामधून प्राणशक्तीचे यथायोग्य वहन होत असते. अशा ७२,००० नाड्या आपल्या शरीरात आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाच्या तीन नाड्या म्हणजे इडा, पिंगला व सुषुम्ना. इडा नाडी डाव्या नाकपुडीतून सुरू होते, तर पिंगला नाडी उजव्या नाकपुडीतून सुरू होते. दोन्ही नाड्या मेरुदंडाजवळून खाली जाऊन एकमेकींस मिळतात व तेथून सुषुम्ना नाडी सुरू होते. हठयोग असे मानतो की, या नाड्यांमध्ये ‘मल’ म्हणजे त्याज्य असा विषारी पदार्थ (अशुद्धी) साठल्यास या नाड्यांमधून प्राणशक्ती वाहू शकत नाही. तिला अडथळा उत्पन्न होतो व म्हणून रोग होतात. विषारी पदार्थांचा हा अडथळा दूर करणे म्हणजेच नाडीशुद्धी होणे. कपालभाती, नेती इत्यादी सहा शुद्धिक्रिया व नाडीशोधन तंत्राने म्हणजे अनुलोम-विलोम प्राणायामाने ही नाडीशुद्धी साधली जाते. उज्जायी, सूर्यभेदनादि प्राणायामांच्या आधी अनुलोम-विलोम तंत्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

वैशिष्ट्ये : प्राणायाम करताना जाणीवपूर्वक, सुनियंत्रित, दीर्घ, परंतु योग्य त्या प्रमाणात श्वास घेतला जातो म्हणून त्याला पूरक असे म्हणतात. हेच मापदंड श्वास सोडताना लावले, तर त्यास रेचक अशी संज्ञा आहे. पूरकानंतर किंवा रेचकानंतर जो श्वास रोखून ठेवला जातो तो सुद्धा दीर्घवेळ, परंतु प्रमाणात तसेच बंध लावून रोखला जातो म्हणून त्याला कुंभक म्हणतात. साधारणपणे १:२:२ व १:४:२ असे पूरक-कुंभक-रेचकासाठी प्रमाण असते. म्हणजे ४ सेकंद पूरकाला दिले तर ८ सेकंद कुंभकासाठी व ८ सेकंद रेचकासाठी द्यावे लागतील. प्रदीर्घ रेचकामुळे फुप्फुसांमधील सर्व अशुद्ध हवा बाहेर सोडली जाते. त्यामुळे नंतरच्या पूरकांत संपूर्ण हवा ताजी व शुद्ध मिळते.

प्राणायाम यांत्रिकपणे न करता मन लावून, लक्ष केंद्रित करून करावयाचा असतो. त्यामुळे चंचल मनाला आवर घातला जातो. कुंभकात तर मनाला स्तब्धताच येते. विचार संपतात, भावनांना थारा मिळत नाही. म्हणूनच प्राणायाम झाल्यावर साधक अतिशय शांत झालेला दिसतो. त्यानंतर साधक ध्यानासाठी सिद्ध होतो. प्राणायामाची कमीतकमी १० आवर्तने करावीत असा संकेत आहे. प्राणायामानंतर ओंकार जप केल्यास अधिक फायदा असा की ध्यान लवकर लागते.

प्रक्रिया :

१.      प्राणायाम करण्यासाठी पद्मासन, अर्धपद्मासन, सिद्धासन किंवा साधी मांडी घालून ताठ बसावे.

२.      पूरक-रेचकासाठी श्वास घेणे-सोडणे हे शांतपणे, हळूहळू, सहजतेने, कोणत्याही प्रकारे घाई न करता करावे, श्वासावर पूर्ण नियंत्रण असावे.

३.      पूरक-कुंभक-रेचक यांचे प्रमाण १:२:२ असावे. नुसते पूरक-रेचक असेल तर तेही १:२ या प्रमाणात असावे.

४.      मूलबंध, उड्डीयानबंध व जालंधरबंध हे तीनही बंध कुंभक दीर्घ असेल तर लावावेत. कुंभक दीर्घ नसेल तर फक्त जालंधर बंध लावला तरी चालेल.

५.      प्राणायाम करताना डोळे बंद ठेवावेत म्हणजे बाहेरील प्रबळ संवेग बंद होतात व आतील घडामोडींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

आपली श्वसनक्रिया स्वयंचलित (अनैच्छिक) व अर्ध-ऐच्छिक अशी आहे. म्हणजेच ती आपणहून सुरू असते. स्वत:च नियंत्रित होते आणि शिवाय आपण ठरविले तर, आपल्या इच्छेनुसार आपण एका मर्यादेमध्ये तिच्यात काही प्रमाणात बदल करू शकतो. तेव्हा ती ऐच्छिक होते.

पूरक ही जाणीवपूर्वक लांबविलेली श्वास घेण्याची क्रिया आहे. अनुलोम-विलोम प्राणायामात डाव्या-उजव्या नाकपुड्यांमधून आलटून पालटून पूरक-रेचक करावे लागते, तर सूर्यभेदन प्राणायामात फक्त उजव्या नाकपुडीने पूरक करून कुंभक झाल्यावर डाव्या नाकपुडीने रेचक करावे लागते.  उज्जायी व भ्रामरी प्राणायामात घशाचे आकुंचन करून विशिष्ट आवाज काढायचा असतो. अशा तऱ्हेने हवेच्या मार्गाने नियंत्रण करून फुप्फुसांमध्ये पोहोचणाऱ्या हवेचे प्रमाण कमी-जास्त करण्याचे तंत्र हठयोगाच्या प्राणायामांमध्ये आहे. त्याचे दोन उद्देश आहेत – (१) आपले संपूर्ण लक्ष, मन त्या ठिकाणी केंद्रित करणे आणि (२) फुप्फुसांमध्ये पोहोचणाऱ्या हवेचे प्रमाण व  हृदयाकडून येणाऱ्या रक्ताचे प्रमाण बदलणे. पूरकामध्ये फुप्फुसे सर्व भागांत चांगल्या तऱ्हेने फुगविली जातात,  वायुकोशांच्या भित्तिकाही पूर्णपणे ताणल्या जातात. प्राणवायू (ऑक्सिजन) व कर्बाम्लवायूच्या (कार्बन डाय-ऑक्साइड) अदलाबदलीला भरपूर वेळ मिळतो. फुप्फुसांची कार्यक्षमता चांगली होते.

कुंभकामध्ये प्राणालाच बांधून ठेवल्याने मन इकडे तिकडे भटकू शकत नाही. ते तेथेच राहते व स्थिर होते. विचार थांबतात. कुंभकात जालंधरबंध, उड्डीयानबंध, मूलबंध हे तीन बंध प्राणायामाची तीव्रता वाढवितात. या वेळी नासाग्रदृष्टी (नाकाचे टोक) किंवा भ्रूमध्यदृष्टी (दोन भुवयांमधील जागा) यांचा उपयोग केल्यास तीव्रता आणखी वाढते. अर्थातच हे सर्व गुरूच्या मार्गदर्शनाखाली करावयाचे असते. यामुळेच प्राणायामाने सहनशक्ती वाढते.

रेचकाला सुरुवात करण्याआधी जालंधरबंध सोडावा लागतो. बाकीचे बंध आपोआपच सुटतात. प्रदीर्घ रेचकामुळे अशुद्ध हवा पूर्णपणे बाहेर निघते. त्यापुढील पूरकांत आपल्याला पूर्ण शुद्ध हवा मिळते. रेचकांत मानसिक ताण कमी होतात व संयम वाढतो. प्राणायामाच्या या सर्व प्रक्रियांमध्ये मन इकडे तिकडे भटकू शकत नाही व आपण वर्तमान क्षणातच राहतो. तणाव नाहीसे होतात व आपली रोगप्रतिकारशक्तीही प्रबळ होते. मानसिक शांतीचा अनुभव येतो.

पतंजलींनी प्राणायामाचे पुढील लाभ वर्णन केले आहेत – प्राणायामामुळे चित्तातील प्रकाशस्वरूप सत्त्वगुणावर आवरण घालणाऱ्या रजस् आणि तमस्  दोषांचा क्षय होतो. धारणेचा अभ्यास करण्याची योग्यता मनाच्या ठिकाणी प्राप्त होते (पातंजल योगसूत्र २.५२, ५३).

प्राणवायूचे प्रच्छर्दन म्हणजे तो संपूर्णतया जोराने बाहेर सोडणे म्हणजे रेचक करणे आणि मग त्याचे विधारण म्हणजे वायू बाहेर सोडल्यानंतर तो आत येऊ न देता तसाच बाहेर धारण करणे म्हणजे बाह्य कुंभक करणे, ह्या दोन उपायांनी चित्तप्रसादन होते (पातंजल योगसूत्र १.३४).

लौकिक लाभ : प्राणायामाने आकलनशक्ती निश्चितच वाढते. उच्च रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश, दमा इत्यादी मनोकायिक रोगांमध्ये मानसिकतेचा भाग अधिक असतो. मानसिक तणावांमुळे हे रोग उद्भवतात. हठयोगानुसार योग्यरीतीने प्राणायाम केल्यास हे सर्व रोग नाहीसे होतात. प्राणायामाने एकूणच मानसिक स्वास्थ्य चांगले होते. नकारात्मक व दुष्ट विचारांचा प्रभाव कमी होतो. वागण्यात उदात्तता येते व व्यक्तिमत्व प्रभावशाली होते. अर्थातच रोगांचे निवारण करण्यासाठी जसा प्राणायामाचा उपयोग होतो तसाच रोग होऊच नयेत या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही प्राणायामाचा उपयोग होतो.

गैरसमज : बरेचजण प्राणायामाला दीर्घश्वसन समजतात. वास्तविक या दोन्हींमध्ये कृती, प्रक्रिया, उद्दिष्टे व लाभ या अनुषंगाने खूप फरक आहे. म्हणून प्राणायामाला दीर्घश्वसन समजणे अयोग्य आहे. काहीजण प्राणायामाला श्वसनाचा व्यायाम समजतात. तेही चूकच आहे. आणखी एक गैरसमज म्हणजे प्राणायाम करताना आपल्याला भरपूर प्राणवायू मिळतो हा होय. साधारणपणे प्राणायामाचा अभ्यास सकाळी रिकाम्या पोटी केला जातो. त्यावेळी शरीर व मन ताजेतवाने, शांत व शिथिल असते. अशावेळी चयापचय क्रियाही मंद असल्याने प्राणवायूची गरज कमी असते. आवश्यकता नसताना जास्तीचा प्राणवायू उपलब्ध असला तरीही फुप्फुसांमध्ये शोषला जाऊ शकत नाही. शरीरात कोठेही प्राणवायू साठवून ठेवता येत नाही. याउलट सामान्य श्वसन व प्राणायामाच्या श्वसनाची खोली, गती तपासली तर असे लक्षात येते की, दर मिनिटास फुप्फुसांमध्ये येणाऱ्या हवेचे प्रमाण प्राणायामात कमीच असते. म्हणजेच प्राणवायू कमीच उपलब्ध होतो. तेव्हा जास्त प्राणवायू घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्राणायामात फुप्फुसांमधील वायुकोश अधिक भरले जातात व ताणले जातात. प्राणायामाचे एक आवर्तन साधारणत: २० सेकंदाचे होते. त्यामुळे रक्तातील कर्बाम्लवायू व फुप्फुसांत घेतला गेलेला प्राणवायू यांची अदलाबदल होण्यास भरपूर वेळ मिळतो. त्यामुळे साधकास दम लागत नाही. प्राणायामाचे उद्दिष्ट हे अधिक प्राणवायू मिळविण्याचे नाही, तर मनाचे नियंत्रण हे आहे हे विसरून चालणार नाही.

पहा : उज्जायी प्राणायाम, केवली प्राणायाम, चंद्राभ्यास प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, मूर्च्छा प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, शीतली प्राणायाम, सहित प्राणायाम, सीत्कारी प्राणायाम, सूर्यभेदन प्राणायाम, स्वन प्राणायाम.

संदर्भ :

  • स्वामी दिगंबरजी आणि डॉ. पीतांबर झा, हठप्रदीपिका, कैवल्यधाम श्रीमन्माधव योगमंदिर समिती, लोणावळा, २०१७ (सहावी आवृत्ती).
  • करंबेळकर, पु. वि., पातंजल-योगसूत्र, कैवल्यधाम श्रीमन्माधव योगमंदिर समिती, लोणावळा, २०१२.

समीक्षक : कला आचार्य