कुलकर्णी, अशोक पुरुषोत्तम ( १० नोव्हेंबर १९५१ -) अशोक पुरुषोत्तम कुलकर्णी यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील सोलेगावचा येथे झाला. ते १९६९ मध्ये बी.एस्सी. आणि १९७४ मध्ये एम.बी.बी.एस. झाले. त्यानंतर त्यांनी रोगप्रतिबंध व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र या विषयात एम. डी. केले. त्यानंतर त्यांनी १९८९ मध्ये पीएच्. डी. पूर्ण केली.

औरंगाबाद आणि नांदेड येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात १९७५ ते २००९ अशी चौतीस वर्षे अध्यापन केले. त्यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमध्ये २०१० साली वरिष्ठ सल्लागार आणि २०११ साली नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य-विज्ञान विद्यापीठात एक वर्ष प्र-कुलगुरू म्हणून काम केले. पुढे वर्षभर ते अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठात संशोधन संचालक होते.

प्लास्मोडीयम व्हायवॅक्स  या प्रकारच्या हिवतापात तेंव्हा उपचाराचा कालावधी पाच दिवस असे. व्हायवॅक्स  मलेरियासाठी एक दिवसाचा समूळ (रॅडिकल) औषधोपचार (वन डे रॅडिकल ट्रिटमेंट इन प्लास्मोडिअम व्हायवॅक्स  मलेरिया) या त्यांच्या संशोधन प्रकल्पामुळे काही विशिष्ट परिस्थितीत प्लास्मोडीयम व्हायवॅक्स  मलेरियाचा उपचार पाच दिवसांऐवजी एक दिवसावर आणण्याची शिफारस मलेरियासाठी एका दिवसाचा समूळ (रॅडिकल) औषधोपचार (कंडेन्स्ड रॅडीकल ट्रिटमेंट) या नावाने राष्ट्रीय स्तरावर मान्य करण्यात आली.

शाळकरी मुळात जंतांसाठी केलेले नियतकालिक औषधोपचाराचा वजन आणि हिमोग्लोबिन परिणाम (इफेक्ट ऑफ पिरिऑडिक मास डी-वर्मिंग ऑन वेट अँड हिमोग्लोबीन लेव्हल्स इन स्कूल चिल्ड्रेन) या संशोधनात त्यांना शालेय विद्यार्थ्यांना जर वर्षातून दोनदा जंतांसाठी औषध दिले तर त्यांचे वजन आणि हिमोग्लोबीन ज्यांना हे औषध दिले नाही अशा मुलांच्या तुलनेत जास्त असते असे त्यांना आढळून आले. त्यामुळे सर्व शालेय विद्यार्थ्यांना हे औषध द्यावे अशी शिफारस त्यांनी केली. या शिफारशीवर विचार होऊन अंगणवाड्यात सकस आहार देण्यात येणाऱ्या मुलांना आहारासोबतच जंतासाठी औषध देण्यास सुरुवात झाली.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमात समुदायाधारित निगराणी प्रणाली (कम्युनिटी बेस्ड मॉनिटरींग) हा महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर अशोक पुरुषोत्तम कुलकर्णी आणि प्रकाश डोके यांचे संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनपर लेखांतील अनेक शिफारसी समुदायाधारीत निगराणी प्रणाली या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्विकारण्यात आल्या.

या शिवाय अशोक कुलकर्णी यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकिय नियतकालिकात संशोधनपर ३० निबंध प्रसिद्ध झाले आहेत.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्र-कुलगुरू असताना विद्यापीठातील सर्व शाखातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी तीन दिवसांच्या कार्यशाळेचा अभ्यासक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी केली. आता पावेतो चार एम. डी. आणि दोन पीएच्. डी. विद्यार्थ्याना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे आणि शांता बायोटेक, हैद्राबाद या संस्थांनी पुरस्कृत केलेल्या व्हॅक्सीनट्रायल / संशोधन प्रकल्पात प्रमुख संशोधक म्हणून त्यांचा सहभाग आहे. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस, लोणी इथे वैद्यकीय मागोवा मंडळाचे सदस्य म्हणून अनेक संशोधन प्रकल्पांच्या नियोजन व अंमलबाजावणीत त्यांनी मार्गदर्शन केले. नगर, पुणे, औेरंगाबाद, अमरावती, नागपूर, नांदेड, मुंबई, लातूर, लोणी इ. ठिकाणच्या वैद्यकिय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित संशोधन पद्धती या विषयावरील सुमारे ५० कार्यशाळात त्यांनी पदव्युत्तर विद्यार्थी व पदव्युत्तर वैद्यकिय शिक्षकांना मार्गदर्शन केले.

औरंगाबाद येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात इंडियन असोशिएशन ऑफ प्रिव्हेंटीव्ह अँड सोशल मेडिसीनचे राष्ट्रीयस्तरावरील अधिवेशन भरवण्यात संघटक सचिव म्हणून त्यांनी २००९ मध्ये सिंहाचा वाटा उचलला होता.

वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी टेक्स्टबुक ऑफ कम्युनिटी मेडिसीन  या पुस्तकाचे लेखन केले. याशिवाय बेसिक्स ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी  आणि बेसिक्स ऑफ बायोस्टॅटिस्टिक्स  या विद्यार्थी प्रिय पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.

जागतिक आरोग्य संघटना, दिल्ली आणि आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे यांनी संयुक्तरित्या प्रकाशित केलेल्या टेक्स्टबु ऑफ पब्लिक हेल्थ अँ कम्युनिटी मेडिसीन  या पाठ्यपुस्तकासाठी ते तज्ज्ञ परीक्षक होते.

संदर्भ :

  • Doke P, Kulkarni A, Lokare P, Tambe M, Shinde R. ‘Community based monitoring under national rural health mission in Maharashtra: Status at primary health centres.’ Indian J Public Health. 2014;58(1):65.
  • Doke P, Kulkarni A. ‘Status of community based monitoring at subcenters in Maharashtra.’ National J Comm Med. 2013;4(3):479–484.
  • Kulkarni AP: ‘One day radical treatment in Pl. Vivax malaria’ Paper presented in National Conference of Indian Association of Preventive and Social Medicine, Mysore, Karnataka India, Jan, 1986
  • Kulkarni A, Sathe P. ‘Effect of periodic mass de-worming on weight and haemoglobin levels in school children.’ Indian J Prev.Soc Med. 1981;12(3):131–35.
  • Kulkarni A, Doke P. ‘Community based monitoring under National Rural Health Mission (NRHM) at village level in the state of Maharashtra, India.’ Int J Trop Dis and Health. 2014;3(4):355–364.

 समीक्षक : राजेंद्र आगरकर