बोली, आर्थर लायन : (६ नोव्हेंबर १८६९ – २१ जानेवारी १९५७)

बोली यांचा जन्म ग्लाऊस्टरशायरमधील ब्रिस्टल (Bristol) येथे झाला. १८७९ ते १८८८ दरम्यान बोलि लंडनच्या ख्रिस्तस् हॉस्पिटल (Christ’s Hospital) या निवासी शाळेत शिकले. इथे त्यांनी अभिजात कलाविषयांत आणि गणितात विविध बक्षिसे मिळवली. एका शिष्यवृत्तीमुळे त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. १८९१ मध्ये ते दहावे रँग्लर झाले.

१८९२ मध्ये त्यांच्या ए शॉर्ट अकाउंट ऑफ इंग्लंड्स् फॉरेन ट्रेड इन दि नाइन्टीनथ् सेंच्युरी (A Short Account of England’s Foreign Trade in the Nineteenth Century’) या निबंधाला कॉब्डेन पारितोषिक मिळाले. दोनच वर्षांनी त्यांनी लिहिलेल्या वेतनातील बदलांसंबंधीच्या शोधनिबंधाला ॲडम स्मिथ (AdamSmith) पारितोषिक मिळाले.

बोली यांची १८९५ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स स्थापन झाल्यापासूनच व्याख्याता म्हणून तेथे नेमणूक झाली होती. त्यावेळेस ते सेंट जॉन्स स्कूलमध्ये शिक्षक होते. पुढे ते प्रपाठक व प्राध्यापक बनले. बोली, रिडींग येथील विद्यापीठ  महाविद्यालयातही गणित व अर्थशास्त्र या विषयांचे प्राध्यापक होते.

बोली यांना १८९३ मध्ये कॉब्डेन पारितोषिक मिळालेल्या निबंधाचे पुस्तक प्रकाशित झाले. यातून त्यांनी तत्कालीन व्यापाराशी निगडीत मूलभूत तथ्यांची तोंडओळख सामान्यांना करून दिली होती. त्यांनी अनेक क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यवसायांच्या वाढीला कारणीभूत ठरलेले घटक शोधले होते. व्यवसायाच्या वाढीचे उघड सामाजिक परिणामदेखील दाखवून दिले होते. ह्यासाठी त्यांनी तुलनात्मक भावाचा (comparative degree) केलेला वापर पुढे सर्वसंमत झाला. या पुस्तकांत आधारसामग्री साचेबद्ध पद्धतीने तक्त्यात देण्याऐवजी, आकृत्यांच्या रूपात सादर केली होती.

बोली यांनी ॲडम स्मिथ पुरस्कार मिळालेल्या निबंधाचे सुधारित लेखन रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीला सादर केले आणि त्याला गाय रौप्यपदक मिळाले. यात बोली यांनी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले एकूण वेतन व सरासरी वेतन, स्थूलमानाने नफा व व्याज, आणि देशाचे एकूण उत्पन्न यांत होत जाणारे बदल सादर केले होते. या निबंधाची दोन खास वैशिष्ट्ये म्हणजे – निव्वळ एकाच अधिकाराखाली सादर केलेले वेतनाचे विवरणपत्र विचारात न घेता, उपलब्ध असलेल्या सर्वच विवरणपत्रांची तुलनात्मक माहिती घेणे आणि वेतनाच्या निव्वळ रक्कमांऐवजी गुणोत्तरे विचारात घेणे.

स्वतःच्या भविष्यातील कामाची दिशा बोली यांना खऱ्याखुऱ्या अर्थाने सापडली. लहानपणीच त्यांची ओळख ब्रिस्टलमधील झोपडपट्टीतील अभावग्रस्त जीवनाशी झाली होती. त्यामुळे गरीब समाजाबद्दल त्यांना विशेष आत्मीयता होती.

बोली यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये दिलेल्या व्याख्यानांतून दोन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. त्यांपैकी पहिले एलिमेंटस् ऑफ स्टॅटिस्टिक्स (‘Elements of Statistics’). शासकीय किंवा तत्सम आधारसामग्रींची सांख्यिकी समजून घेणे, तिचे मूल्यांकन करणे किंवा तिचे सटीक परिक्षण करणे यांसाठी हे पुस्तक उपयुक्त होते. त्यांचे दुसरे पुस्तक, एलिमेंटरी मॅन्युअल ऑफ स्टॅटिस्टिक्स (‘Elementary Manual of Statistics’).

बोली यांनी ए जनरल कोर्स ऑफ प्युअर मॅथेमॅटिक्स (‘A General Course of Pure Mathematics’) प्रकाशित केले. यामिकी, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र यांत शुद्ध गणिताचा वापर करणाऱ्यांना हे उपयुक्त ठरले. त्यांचे मॅथेमॅटिकल ग्राउंडवर्क ऑफ इकॉनॉमिक्स (‘Mathematical Groundwork of Economics’) हे खासकरून व्यावसायिकांसाठी लिहिलेले पुस्तक आहे. आधीच्या अर्थशास्त्रज्ञांनी वापरलेल्या गणिती पद्धती या पुस्तकात त्यांनी एकत्रितपणे मांडल्या होत्या.

बोली यांचे अर्थशास्त्रातील काम दुहेरी होते. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आणि मोजणी या संदर्भातील संशोधन हे पहिले काम, तर दुसरे म्हणजे लंडन आणि केंब्रिजच्या इकॉनॉमिक सोसायटीत अर्थशास्त्रामध्ये सांख्यिकीला दिलेले योगदान. यात सामाजिकशास्त्रांतील संशोधनासाठी त्यांनी विकसित केलेली नमुनानिवड तंत्रे महत्त्वाची होत.

जनसांख्यिकीच्या संशोधनासाठी प्रत्येक व्यक्तीची माहिती घेणे अनिवार्य आहे, अशी समजूत विसाव्या शतकापर्यंत होती. ब्रिटीश असोसिएशन फॉर अडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी या वृत्तीवर टीका केली होती. नमुनानिवडीवर आधारित सर्वेक्षणे त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवली, जी पुढील काळासाठी संदर्भ म्हणून वापरली. नंतरच्या काळात इंग्लंडच्या अनेक राज्यांची सर्वेक्षणे त्यांच्या पर्यवेक्षणाखाली पार पडली. बोलली व संख्याशास्त्रज्ञ बुर्नेट-हर्स्ट (Burnett-Hurst) यांनी या सर्व सर्वेक्षणांचे अहवाल एकत्रितपणे प्रकाशित केले.

बोली इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या मंडळाचे सदस्य होते. मंडळावर असताना केलेल्या कामांतून त्यानी मेझरमेंट ऑफ दि प्रिसिजन अटेन्ड इन सँपलिंग (‘Measurement of the precision attained in sampling’) हा एक प्रभावी मार्गदर्शक अहवाल तयार केला. यासंदर्भात त्यांनी नमुनानिवडीच्या चौकटीचे स्वरूप व भूमिका यांचे विवरण, विकसित केलेले प्रमाणशीर नमुनानिवड सिद्धांत आणि सहेतुक नमुनानिवड सिद्धांत दिले होते. बोली यांच्या सर्वेक्षणांमुळे शासकीय सांख्यिकी निश्चितच प्रगल्भ झाली.

बोली नंतरच्या काळात अर्थमितीशास्राकडे (Econometrics) वळले. बोली आणि इंग्लिश अर्थतज्ज्ञ, गणिती व संख्याशास्त्रज्ञ ॲलन, आर. डी. जी. (Allen, R.D.G.) यांचे प्रकाशित झालेले फॅमिली एक्सपेंडिचर (‘Family Expenditure’) हे पुस्तक परंपराछेदक ठरले. यात त्यांनी प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक खर्चाची तुलना त्या त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आर्थिक खर्चाशी केली होती. कायवर्ग ही सांख्यिकी कसोटी वापरून त्यांनी अनुभवसिद्ध साधित रेषीय नियमाची, अन्वायोजन समर्पकता तपासली होती. बोली नियमानुसार श्रमाधिष्ठीत सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे (ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट) प्रमाण नेहमीच स्थिर असते (The proportion of GNP from labour is constant), हा एक महत्त्वाचा निष्कर्ष आहे.

बोली यांच्या योगदानांसाठी त्यांना केंब्रिज विद्यापीठाने एससी. डी. (Sc.D.), तर ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना मानद डी. लिट. (D.Litt.) आणि मँचेस्टर विद्यापीठाने डी. एससी. (D.Sc.) प्रदान केली होती. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील, सांख्यिकी तसेच अर्थशास्त्राशी संबंधीत, अनेक महत्त्वाच्या संस्थांतून त्यांनी उच्च पदे भूषवली होती. त्यांना ब्रिटिश अकॅडमीचे सदस्यत्त्व देण्यात आले. त्यांची नेमणूक ब्रिटिश साम्राज्याचे कमांडर म्हणून करण्यात आली होती, तर त्यांना सर या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते.

 संदर्भ :

 समीक्षक: विवेक पाटकर