बॅनर्जी, सुदिप्तो : (२३ आक्टोबर १९७२ )

सुदिप्तो बॅनर्जी यांचा जन्म भारतात, कलकत्ता येथे झाला. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. संख्याशास्त्रातील उच्च पदवी त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधून मिळवली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेतील कनेक्टिकट (Connecticut) येथे गेले. युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिटमधून त्यांनी संख्याशास्त्रातील एम.एस. आणि पीएच.डी. केले. त्यासाठी त्यांना गेल्फंड (Gelfand) यांचे मार्गदर्शन मिळाले. मल्टीव्हेरिएट स्पॅशिअल मॉडेलिंग इन ए बेजीयन सेटिंग  हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.

बॅनर्जी प्रथम जीवसांख्यिकीचे सहाय्यक व्याख्याता म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा येथे रुजू झाले. चौदा वर्षे ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील फिल्डींग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संपर्कात राहून समस्यांचा अभ्यास करीत होते. नंतर ते तेथील जीवसांख्यिकी विभागाचे व्याख्याता बनले आणि सध्या ते तेथे पिठासीन प्राध्यापक आहेत. येथेच त्यांनी अवकाशी सांख्यिकीतील समस्यांवर काम केले. बेजीय प्रतिमानकरणाशी संबंधीत सिद्धांतांची निर्मिती आणि पद्धतींचा विकास ही त्या कामांची फलश्रुती आहे. भौगोलिक आधारसामग्रीचे अनुमान काढण्यासंबंधी बॅनर्जी यांनी केलेल्या संशोधनाचे उपयोजन आज पर्यावरणीय आरोग्यशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वनशास्त्र, स्थावर मालमत्ता अर्थशास्त्र, कृषिशास्त्र इ. अनेक क्षेत्रांत होत आहे.

संख्याशास्त्रात बॅनर्जीं यांनी अनेक मूलगामी संकल्पनांची भर घातली. वॉम्ब्लिंग (Wombling) म्हणजे भौगोलिक किंवा युक्लिडीय अवकाशात काही परिमाणे बदलत रहातात, या बदलांच्या प्रमाणांचे अनुमान करणे गुंतागुंतीचे असते. त्यासाठी त्यांनी बेजीय तत्त्वांवर आधारित सिद्धांत आणि पद्धती विकसित केल्या. उदा., एखाद्या विशिष्ट प्रजातीच्या लोकसंख्येतील जनुकांची वारंवारता शोधणे, भाषांच्या उत्क्रांती जाणून घेणे किंवा भूविषयक आयुर्मानाचे विश्लेषण करणे. या संदर्भातील आधारसामग्री विशाल ते महाकाय अशी असते. या आधारसामग्रीच्या विश्लेषणासाठी बेजीय पदानुसारी प्रतिमाने विकसित करणे व त्यांचे उपयोजन करणे याचे श्रेय बॅनर्जीं यांच्याकडे जाते. अनेक रोगांचे क्षेत्रिय प्रतिचित्रण करणारे बॅनर्जींच पहिले आहेत.

बॅनर्जीं आणखी एका गोष्टीसाठी ओळखले जातात. ती म्हणजे, ‘गॉसिय भाकितात्मक प्रक्रमांचा विकास’ (Gaussian Predictive Process). गॉसिय प्रक्रमाला लागणारी आकडेमोड प्रचंड गुंतागुंतीची व खर्चिक असते. त्यासाठी बॅनर्जीं यांनी गॉसिय प्रक्रमाच्या अगदी जवळून जाणारा एक स्वस्त आणि कार्यक्षम प्रक्रम निर्माण केला. तो प्रक्रम निअरेस्ट नेबर गॉसियन प्रोसेस (एनएनजीपी) म्हणून ओळखला जातो.

ब्रॅडले (Bradley) आणि गेल्फंड यांच्यासह बॅनर्जीं यांनी हायरारकिकल मॉडेलिंग  ड  नालिसिस फॉर स्पॅशिअल डेटा  (‘Hierarchical Modelling and Analysis for Spatial Data’) हे पुस्तक प्रसिध्द केले. या पुस्तकांत त्यांनी अवकाशी आधारसामग्रीतून अनुमान काढण्यासंबंधी बहुसमावेशक चर्चा केली आहे. जेव्हा आधारसामग्री दोन किंवा अधिक महत्त्वाच्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे केलेल्या गटांमध्ये विभागलेली असते तेव्हा पदानुसारी प्रतिमान वापरले जाते. या प्रतिमानात विश्वसनीयता सिध्दांतातील (credibility theory) आवश्यक कल्पना अंतर्भूत झालेल्या असतात.

अनिन्द्य रॉय (Anindya Roy) यांच्यासह त्यांनी आणखी एक महत्त्वाचे पाठ्यपुस्तक लीनिअर आल्जिब्रा  ड मॅट्रिक्स  नालिसिस फॉर स्टॅटिस्टिक्स (‘Linear Algebra and Matrix Analysis for Statistics’) प्रसिद्ध केले. हॅंडबुक ऑफ स्पॅशिअल एपिडेमिऑलॉजी (‘Handbook of Spatial Epidemiology’) हे बॅनर्जीं यांचे आणखी एक सहलेखित पुस्तक प्रसिद्ध झाले.

बॅनर्जीं यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. द इंटरनॅशनल एनव्हायर्नमेट्रिक सोसायटीकडून त्यांना ॲब्डेल एल-शरावि (Abdel El-Shaarawi) पुरस्कार, अमेरिकन पब्लिक हेल्थ ॲसोसिएशनकडून मॉरटिमर स्पिजेल्मेन (Mortimer Spiegelmen) पुरस्कार, इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे सदस्यत्व, इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स आणि अमेरिकन स्टॅटिस्टिकल ॲसोसिएशनची पाठ्यवृत्ती, तसेच स्टॅटिस्टिक्स एनव्हिरॉनमेंट विभागाचे पदक यांसारखे प्रतिष्ठित सन्मान बॅनर्जीं यांना लाभले आहेत. विशेषतः वनीकरण, पर्यावरण आणि आरोग्यविषयीच्या निष्पत्तींसाठी उपयुक्त असणारे, अवकाशी आधारसामग्री पदानुसारी बेजीय प्रतीमानांतील महत्त्वपूर्ण संशोधन करून, त्यासाठी लागणाऱ्या संगणकीय पद्धती, कार्यक्रमसामग्री (software), पाठ्यपुस्तके तयार करणे व व्यवसायाला संपादकीय सेवा देणे, या कार्यासाठी त्यांना एएसएनेचा आउटस्टॅंडिंग स्टॅटिस्टिकल ॲप्लीकेशन पुरस्कार दिला आहे.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर