सेमेरे, . : (२१ ऑगस्ट, १९४०)

हंगेरियन–अमेरिकन गणिती सेमेरेद यांचा जन्म हंगेरीतील बुडापेस्ट येथे झाला. तेथील इओट्वोस लॉंरंड विद्यापीठातून (Eötvös Lorand University) १९६५ साली त्यांना मास्टरची पदवी मिळाली. १९७० साली रशियन गणिती इस्त्रायल गेलफँड (Israrel Gelfand) यांच्या मार्गदर्शनाखाली, रशियातील मॉस्को स्टेट विद्यापीठातून त्यांना गणितातील पीएच.डी. मिळाली.

१९७४ साली अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफर्ड, १९८० मध्ये कॅनडातील मॉन्ट्रियलमधील मॅकगिल आणि कोलंबिया येथील साऊथ करोलिना (South Carolina) तसेच १९८५–८६ मध्ये शिकागो येथील विद्यापीठांतून अध्यापन केल्यानंतर, १९८६ साली सेमेरेद यांनी, न्यूजर्सी येथील रटजर्स विद्यापीठात संगणक विभागात प्राध्यापक म्हणून पदभार स्वीकारला. सेमेरेद यांनी विविक्त गणित (Discrete Mathematics), आलेख सिद्धांत, चयनशास्त्र (Combinatorics) आणि अंकगणितीय श्रेणी यांसारख्या गणिताच्या विविध शाखांत तसेच सैद्धांतिक संगणकशास्त्रांत आतापर्यंत प्रसिद्ध केलेल्या एकूण शोधनिबंधांची संख्या दोनशेच्यावर आहे. १९७० मध्ये सेमेरेद आणि हाजनेल (Hajnel) यांनी मांडलेला आलेखशास्त्रातील एक सिद्धांत हाजनेल-सेमेरेद थिअरम या नावाने ओळखला जातो. १९७५ मध्ये सेमेरेद यांनी अंकगणितीय श्रेणींविषयीचे मांडलेले प्रमेय दि सेमेरेद थिअरम हा विसाव्या शतकातील गणित संशोधनाचा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. ह्यातील सिद्धतेमध्ये उल्लेखलेले एक सहाय्यक प्रमेय (लेमा), सेमेरेद यांनी १९७८ साली तपशीलवार सिद्ध केले होते, जे सेमेरेदीज रेग्युलॅरिटी लेमा म्हणून प्रसिध्द आहे. यावर आधारित आणखी एक सहाय्यक प्रमेय १९८२ साली बालॉग-सेमेरेद-गोवर्स (Gowors) लेमा सिद्ध करण्यात आले. त्याच वर्षी दि क्रॉसिंग लेमा नावाचा आलेखशास्त्रातील एक महत्त्वाचा सिद्धांत, अजताई (Ajtai) श्वाताल (Chvatal), न्यूबॉर्न आणि सेमेरेद यांनी सिद्ध केला. ह्या सिद्धांताची अनेक उपयोजने विविक्त गणित आणि संगणकीय गणितात आढळतात. १९८३ मध्ये सेमेरेद आणि एरडॉश (Erdös) यांनी सान्त संचाच्या बेरजा आणि गुणाकारांसंदर्भात मांडलेला सिद्धांत एरडॉश–सेमेरेद थिअरम म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच सेमेरेद आणि ट्रॉटर (Trotter) यांचे आलेखशास्त्रातील सेमेरेद ट्रॉटर प्रमेय आपात भूमिती (Incidence Geometry) आणि चयन भूमितीतही (Combinatorial Geometry) उपयुक्त ठरले आहे.

गणिताच्या विविधशाखांइतकेच, सेमेरेद यांचे सैद्धांतिक संगणकशास्त्रातील योगदानही उल्लेखनीय आहे. त्यांनी अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ अजताई यांच्यासह दि कॉर्नर्स थिअरम हे एक कळीचे प्रमेय सिद्ध केले. अजताई, कॉम्लोस (Komlos) आणि सेमेरेद या त्रयीने इष्टतम खोली शोधण्यासाठी जालाचे वर्गीकरण याचा आधार घेऊन विकसित केलेली रीत (एल्गोरिदम) एके एससॉर्टींग नेटवर्क फॉर ऑप्टीमल डेप्थ म्हणून प्रसिद्ध आहे. फ्रेडमन कॉमलॉस आणि सेमेरेद यांनी विकसित केलेली एफ.के.एस. हॅशिंग स्किम संगणकीय प्रणालींच्या तंत्रासंदर्भात अतिशय उपयुक्त ठरली आहे. १९८४ मधील पॉल-पाईपेंजर-सेमेरेद-ट्रॉटर सिद्धांतही या क्षेत्रातील एक महत्त्वाचे संशोधन ठरले आहे. त्यांचे थिअरी ऑफ एल्गोरिदम्स (‘Theory of Algorithms’) पुस्तक १९८६ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. सेमेरेद यांना वेळोवेळी अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले. उदा., ग्रूनवाल्ड प्राईज (Grunwald Prize) रेनई प्राईज (Renai Prize), सियाम (SIAM) या संस्थेचे पोलया प्राईज (Polya Prize), लेरॉय पी. स्टीलप्राईज (Leroy P. Steele Prize) आणि दि रॉल्फशॉक प्राईज (The Rolph Schock Prize) आणि गणिती जीवनगौरव म्हणून दिले गेलेले आबेल प्राईज. त्याचबरोबर हंगेरियन अॅकेडमी ऑफ सायन्स, अमेरिकेतील नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस आणि इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हांस स्टडीज तसेच बुडापेस्टमधील आल्फ्रेड रेनई इन्स्टिटयूट अशा प्रतिष्ठित संस्थांचे मानद सभासदत्व सेमेरेद यांना देण्यात आलेले आहे.

संदर्भ :

 समीक्षक: विवेक पाटकर