टार्झनरॉबर्ट आंद्रे : (३० एप्रिल१९४८)

टार्झन यांचा पोमोना (Pomona) कॅलिफोर्निया येथे झाला. कॅलिफोर्निया इंस्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी (CALTECH) मधून त्यांनी गणितात पदवी घेतली, तर स्टँनफोर्ड (Stanford) विद्यापीठातून त्यांनी संगणकशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली.

रॉबर्ट फ्लॉईड (Robert Floyd) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ॲन एफिशियंट प्लॅनॅरीटी ॲल्गॉरिथम’ (An Efficient Planarity Algorithm) या प्रबंधावर त्यांना संगणकशास्त्रातील डॉक्टरेट मिळाली.

अमेरिकेतील कॉर्नेल (Cornell), कॅलिफोर्निया आणि स्टँनफोर्ड  विद्यापीठ आणि न्यूयॉर्क विद्यापीठात संगणकशास्त्राचे अध्यापन केले. नंतर ते प्रिन्सटन (Princeton) विद्यापीठात संगणकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि सध्या ते तेथे जेम्स एस. मॅकडोनेल डिस्टींगविश्ड प्रोफेसर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (James S. McDonnell distinguished professor of computer science) म्हणून कार्यरत आहेत.

संगणकशास्त्रातील अध्यापनाबरोबरच, टार्झन यांनी एटी अँड टी बेल लॅब (AT and T Bell Lab), एन.ई.सी (Nippon Electric Company), आय.टी.सी. (International Technologies Corporation), एच.पी. (Hewlett ackard), कॉम्पॅक (Compaq) यासारख्या नामवंत संस्थांमध्ये वेळोवेळी संशोधन केले आहे. २०१४ पासून ते आय.टी.सी. मध्ये प्रमुख शास्त्रज्ञ तसेच एम.एस.आर.एस.व्ही.सी. (MSR SVC – Microsoft Research Silicon Valley Company) मध्ये अभ्यागत संशोधक (Visiting Researcher) म्हणून कार्यरत आहेत.

टार्झन यांनी स्वतंत्रपणे २५० हून अधिक तसेच इतर शास्त्रज्ञ आणि गणितींसह १९० च्या वर शोधनिबंध लिहिलेले आहेत. त्यांना त्यांच्या संशोधनामुळे होणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीचे आणि विक्रीचे अमेरिकेतील अठरा एकाधिकारही पेटंट्स (Patents) मिळालेले आहेत.

संगणकशास्त्रातील रिती आणि आधारसामग्रीची संरचना याविषयीचे टार्झन यांचे संशोधनकार्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी इतर ४ शास्त्रज्ञांसह मिडियन ऑफ मिडियन्स (Median of medians) ही रित १९७३ साली शोधून काढली. या पद्धतीने अतिशय गहन व्यामिश्रता (complexity) असलेल्या प्रश्नांसाठी  उत्तर शोधण्यास भरीव मदत मिळते. त्यांनी शोधलेली, संयोग–शोध आधार सामग्री (युनियन–फाईंड डेटा स्ट्रक्चर) मधील रित म्हणजेच टार्झन्स ऑफ लाईन लोएस्ट कॉमन ॲनसेस्टर्स ॲल्गॉरिथम’ (Tarjan’s off-line lowest common ancestors algorithm) ही आणखीन एक संगणकशास्त्रात त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे कारण अशा प्रकारच्या अन्य रितींपेक्षा त्यांची त्यांची रित वेगळी पण अतिशय कार्यक्षम ठरली आहे. त्याशिवाय जॉन हॉपक्रॉफ्ट (John Hopcroft) यांच्यासोबत विकसित केलेली The Hopcroft–Tarjan Planarity testing algorithm रित तसेच डॅनी स्लेटर (Danny Sleater) यांच्याबरोबर शोधलेली Self-adjusting binary search tree (splay tree) पद्धतही काही प्रश्नांसाठी उपयुक्त ठरली आहे. संगणकाच्या आधारसामग्रीची संरचना फिबोनास्सी हीप्स याप्रकारे मांडून  त्यांनी प्रक्रिया-वेळ वाचवण्याचे नवे तंत्र विकसित केले, जे इतर तंत्रापेक्षा सरस असल्याचे सिद्ध झाले आहे.

संगणकशास्त्राच्या जोडीने टार्झन यांनी गणितातील संशोधनातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेषत: आलेख सिद्धांतात दिलेल्या आलेखातील प्रबळ संबद्ध घटक (strongly connected components) या संदर्भात त्यांनी विकसित केलेली रित इतर रितींपेक्षा प्रभावी ठरली असून ती  Tarjan’s strongly connected components algorithm म्हणून ओळखली जाते. Akermann Funtions संबंधी टार्झन यांनी शोधलेला अविकारी (invariant) गुणधर्म उपयुक्त ठरला आहे.

टार्झन यांनी Combinatorial Mathematics, Optimal Designs, and Their Applications हे पुस्तक लिहिले. टार्झन यांनी डेटा स्ट्रक्चर नेटवर्क  ल्गॉरिथम  (‘Data structure and Network algorithm’) नावाचे आणखी एक पुस्तक लिहिले ज्यात त्यांनी आधारसामग्रीची संरचना आणि जाल व आलेख सिद्धांत याविषयी त्यांनी केलेल्या कामाची एकत्रित माहिती दिली आहे. या पुस्तकाला फ्रेडरिक डब्ल्यू. लॅंकेस्टर (Fredrick W. Lancester) पारितोषिक मिळालेले आहे.

टार्झन यांना माहितीशास्त्रातील पहिले नेवानलिना (Nevanlinna) प्राईज, एन.ए.एस. (National Academy of Science) पारितोषिक तसेच संगणकशास्त्रातील सर्वोच्च मानाचे ए.एम. टयूरिंग (A.M.Turing) ॲवॉर्ड (जॉन हॉपक्रॉफ्ट John Hopcroft यांच्यासह विभागून) मिळाले. याखेरीज पॅरिस कानेलकीज (Paris Kanellakis) पारितोषिक, ब्लेस पास्कल’ पदक (Blaise Pascal Medal) आणि कॅलटेक डिस्टींगविश्ड ॲलुम्नि (CALTECH Distinguished Alumni) पुरस्कार अशा सन्मानांनी  गौरवले गेले आहे.

संदर्भ :

 समीक्षक : विवेक पाटकर