टोलंड, जॉन फ्रांसिस : (२८ एप्रिल, १९४९ ) 

इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आयरिश गणिती टोलंड यांचा जन्म, दक्षिण आयर्लंडमधील डेरी येथे झाला. त्यांचे शिक्षणही तेथे सेंट कोलंबस महाविद्यालयात झाले. बेलफास्ट येथील क्वीन्स युनिव्हर्सिटीमधून बी.एससी ही पदवी त्यांना मिळाली. इंग्लंडमधील ससेक्स विद्यापीठातून, चार्ल्स स्टुअर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टोपॉलॉजिकल मेथड्स फॉर नॉनलिनियर आयगनव्हॅल्यू प्रॉब्लेम्स’ (Topological Methods for Non-linear Eigenvalue Problems) या प्रबंधासाठी टोलंड यांना डॉक्टरेट मिळाली.

टोलंड यांनी इंग्लंडमधील एसेक्स आणि लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज येथे अधिव्याख्याता म्हणून काम केले. त्या दरम्यान त्यांनी यूरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथील वीसहून अधिक शैक्षणिक संस्थात अभ्यागत संशोधक म्हणून काम केले. नंतर टोलंड गणिताचे प्राध्यापक म्हणून इंग्लंडमधील बाथ विद्यापीठात रुजू झाले आणि निवृत्त होईपर्यंत तिथेच कार्यरत राहिले.

टोलंड यांचे संशोधन गणिती विश्लेषण, अरेषीय अंशिक विकलक समीकरणे (Non-linear partial differential equations), तसेच भौतिकशास्त्रातील निश्चल तसेच द्रायुगतिक जललहरींच्या शास्त्रांमध्येही (Theory of hydrostatic and hydrodynamic water waves) आहे. १९७८ साली, टोलंड यांनी इतर सहकाऱ्यांसह स्टोक कन्जक्चर (अटकळ) ह्या गेल्या शतकापासून खुल्या असलेल्या समस्येची उकल केली. खोल पाण्यातील कमाल उंचीच्या गुरुत्वाकर्षणीय लहरी संबंधीचे हे संशोधन आहे. गणित आणि भौतिकशास्त्रातील अनेक शाखांबरोबरच टोलंड यांनी हॅमिल्टोनियन यांत्रिकी आणि विविधता गणन (Variable calculus) यावरही संशोधन केले. त्यांचे अमूर्त सार्वत्रिक द्विभाजन सिद्धांत (Abstract global bifurcation theory), अबहिर्वक्र इष्टतमीकरण (Non-convex optimisation) आणि गतिमान प्रणाली (Dynamical systems) या क्षेत्रातील योगदान मूलभूत स्वरूपाचे मानले जाते.

गणितातील अनेक शोधनिबंधांसह टोलंड यांनी बर्नाउली फ्री बाऊंड्री प्रोब्लेम्स (‘Bernoulli free boundary problems’) हे पुस्तकही लिहिले.

टोलंड यांना ‘इंजिनियरिंग अँड फिजिकल सायन्सेस रिसर्च सेंटर’ (EPSRC) तर्फे सिनियर फेलोशिप, फेलो ऑफ रॉयल सोसायटी (FRS) तसेच फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ एडिनबर्ग (FRSE) हे बहुमान प्राप्त झाले. सेंट जॉन्स कॉलेजची आणि युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनची (UCL) (मानद) फेलोशिपही त्यांना मिळालेली आहे. लंडन मॅथेमॅटिकल सोसायटी (एडिनबर्ग) तर्फे टोलंड यांना बर्विक (Berwick) प्राईज दिले गेले. तसेच त्यांना रॉयल सोसायटीचे सिल्व्हेस्टर (Sylvester) पदक देऊन गौरवले गेले. टोलंड एडिनबर्ग येथील इंटरनशनल सेंटर ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस (ICMS) येथे वैज्ञानिक संचालक (सायंटिफिक डायरेक्टर) पदावर होते. तर पुढे ते ‘सर आयझॅक न्यूटन इन्स्टिटयूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस (केंब्रिज) या संस्थेच्या संचालकपदी होते. २००५ आणि २००७ या काळात ते लंडन मॅथेमॅटिकल सोसायटीचे अध्यक्ष होते. गणिती विज्ञान मंडळाच्या रिसर्च एक्सलन्स फ्रेमवर्कचे (REF) ते अध्यक्षही होते. लंडन मॅथेमॅटिकल सोसायटी, रॉयल सोसायटी तसेच सायन्स अँड इंजिनियरिंग रिसर्च कौन्सिल (SERC) अशा मातब्बर संस्थांच्या नियतकालिकांच्या संपादकीय कामातही टोलंड यांचा सहभाग राहिलेला आहे.

टोलंड सध्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल युनियन (IMU) या जागतिक पातळीवर गणिताला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या कार्यकारी समितीचे सभासद आहेत. त्याद्वारे त्यांनी मेंटरिंग अफ्रिकन रिसर्च इन मॅथेमॅटिक्स (MARM) हा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे.

संदर्भ :

 समीक्षक : विवेक पाटकर