विटेन, एडवर्ड : (२६ ऑगस्ट १९५१)

विटेन यांनी १९७१ मध्ये ब्रॅण्डेस (Brandeis) विद्यापीठातून इतिहास आणि भाषाशास्त्र या विषयात बी. ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर प्रिन्स्टन विद्यापीठातून १९७४ मध्ये भौतिकशास्त्रात एम. ए.ची पदवी आणि १९७६ मध्ये ‘Some Problems in the Short Distance Analysis of Gauge Theories’ या प्रबंधासाठी पीएच.डी. मिळवली. ते हार्वर्ड येथे पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणून आणि नंतर ज्युनिअर फेलो म्हणून काम करत होते. १९८०-८७ दरम्यान त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. १९८७ मध्ये प्रिन्स्टन येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्सड् स्टडीजमध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.

मूळचे भौतिकशास्त्रज्ञ असूनही त्यांचे गणितीशास्त्रातील कार्य तितकेच सखोल आहे. भौतिकशास्त्रातील संशोधनातून सापडणारी तत्त्वे गणिताच्या चौकटीत बसवण्याची विशेष हातोटी त्यांच्यापाशी आहे. त्यांच्या संशोधनातून त्यामुळे नवीन आणि सखोल गणिती प्रमेये निर्माण होत राहिलेली आहेत. क्वांटम फील्ड थिअरीचा लो-डायमेंन्शन टोपॉलॉजीमधे वापर करून त्यांनी टोपॉलॉजीकल क्वांटम फील्ड थिअरीची निर्मिती केली. भौतिकशास्त्रातील चर्न-सिमोन्स सिद्धांताचा (Chern–Simons theory) विटेन यांनी गणितातील गाठीचा सिद्धांत (Knot theory) आणि ३-समेष्टी (manifolds) समजून घेण्यासाठी वापर केला. व्यापक सापेक्षता सिद्धांतातील धन कार्यशक्तीच्या प्रमेयाची (positive energy theorem) सिद्धता देण्याबद्दल फिल्डस पदक हा गणिती संशोधनासाठी दिला जाणारा सर्वोच्च बहुमान त्यांना देऊन गौरवण्यात आले. याशिवाय सुपरसिमेट्री आणि मोर्स सिद्धांत या शाखांमधेही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

तंतू सिद्धांत १९९५पर्यंत पाच रूपात मांडला गेला होता. या पाचांपैकी कुठचे तरी एक रूप खरे आहे, ज्याला आपण थिअरी ऑफ एव्हरीथिंग म्हणू शकू अशी शास्त्रज्ञांची विचारधारा होती. पण १९९५ मध्ये साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठात भरलेल्या तंतू सिद्धांतावरील चर्चासत्रात विटेन यांनी तंतू सिद्धांताची ती पाचही रूपे वेगवेगळी नसून एकाच एम-थिअरीच्या (Membrane theory) वेगवेगळ्या मर्यादा आहेत, असे प्रतिपादन केले. विटेन यांच्या एम-थिअरीच्या सादरीकरणानंतर तंतू सिद्धांताच्या संशोधनात क्रांती घडून आली.

गेज/ग्रॅव्हिटी ड्युॲलिटी (gauge/gravity duality) बद्दलचे विटेन यांचे संशोधनही भौतिकशास्त्रात मोलाचे मानले जाते.

नाथन सिबर्ग (Nathan Seiberg) यांच्या सहकार्याने विटेन यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. तंतू-सिद्धांत आणि नॉनकम्युटेटीव्ह भूमिती आणि सुपरसिमेट्रीक गेज थिअरी यांवरचे त्यांचे शोधलेख विशेष प्रसिद्ध आहेत. सिबर्ग-विटेन थिअरी, सिबर्ग-विटेन इन्व्हेरीअण्टस्, वेस-झुमिनो-विटेन मॉडेल, वैनबर्ग-विटेन थिअरम, ग्रोमॉव्ह-विटेन इन्व्हेरीअण्टस्, विटेन इंडेक्स यांसारख्या अनेक संकल्पना विटेन यांच्या नावाने ओळखल्या जातात.

विटेन यांची स्वतंत्र आणि सहलिखित निवडक पुस्तके खालीलप्रमाणे आहेत :

  • Some Problems in the Short Distance Analysis of Gauge Theories,
  • Current Algebra and Anomalies: A Set of Lecture Notes and Papers,
  • Superstring Theory. Vol. 1, Introduction, 1988.
  • Superstring Theory. Vol. 2, Loop Amplitudes, Anomalies and Phenomenology, 1988.
  • Quantum fields and strings: a course for mathematicians, 1& 2, 1999.

विटेन यांना मिळालेल्या पुढील प्रतिष्ठीत पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यात अल्बर्ट आइनस्टाइन पदक, फिल्डस पदक, ॲलन टि. वॉटरमन पारितोषक, डॅनी हैनेमन पारितोषक, नेमर्स पारितोषक, नॅशनल मेडल् ऑफ सायन्स, पायथागोरस पारितोषक, हार्वे पारितोषक, क्राफुर्ड पारितोषक, लॉरेन्झ पदक, आयझॅक न्यूटन पदक, फंडामेण्टल फिजिक्स पारितोषक, क्योटो पारितोषक, आणि अल्बर्ट आइनस्टाइन ॲवॉर्ड ही आहेत.

संदर्भ :

समीक्षक: विवेक पाटकर