थॉम्पसन, जॉनग्रिग्ज : (१३ ऑक्टोबर १९३२ )

फिल्ड्स पदक आणि आबेल पुरस्कार मिळवणारे अमेरिकन गणिती थॉम्पसन यांचा जन्म अमेरिकेतील कॅन्सास (Kansas) येथे झाला. येल विद्यापीठातून गणितातील पदवी मिळवल्यावर शिकागो विद्यापीठातून साऊंदर्स मॅक लेन (Saunders Mac Lane) यांच्या मार्गदर्शनाखाली,  A Proof that a Finite Group with a Fixed-point-free Automorphism of Prime order is Nilpotent  या प्रबंधावर त्यांना डॉक्टरेट मिळाली. त्यांच्या या प्रबंधामुळे ६० वर्षांपासून अनुत्तरित असलेल्या ‘The Nilpotency of Frobenius Kernels’ ह्या समस्येची उकल झाली त्याशिवाय सांत गटांच्या सिद्धांतात नवीन तंत्रे विकसित होण्यास चालना मिळाली.

हार्वर्ड विद्यापीठात गणिताच्या अध्यापनाचे काम केल्यानंतर शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे काम केल्यानंतर इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात शुद्ध गणिताचे, राऊस बॉल (Rouse Ball) प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अमेरिकेतील फ्लॉरिडा विद्यापीठातही पदवी मार्गदर्शनासाठी संशोधक प्राध्यापक (Graduate Research Professor) म्हणून त्यांची नेमणूक झाली. सध्या ते फ्लॉरिडा विद्यापीठात प्राध्यापक आणि केंब्रिज विद्यापीठात प्रोफेसर एमेरीटस ऑफ प्युअर मॅथेमॅटिक्स म्हणून कार्यरत आहेत.

थॉम्पसन आणि वॉल्टर फीट (Walter Feit) यांनी सिद्ध केलेले प्रमेय, आबेली नसलेल्या सर्व सांत साध्या गटांची कोटिका सम असते (All non–abelian finite simple groups are of even order), आता त्या दोघांच्या नावाने फीट-थॉम्पसन प्रमेय म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर ह्या दोघांनी विषम कोटिकेच्या गटांची उकलक्षमता (Solvability of groups of odd order) या विषयावर एक शोधनिबंध सादर केला होता. त्यांच्या ह्या संशोधनासाठी त्यांना कोल पारितोषिक (Cole Prize) देऊन गौरवले गेले.

सांत साध्या गटाच्या सिद्धांतामधील काही निष्कर्ष थॉम्पसन यांच्या नावाने ओळखले जातात, उदा., थॉम्पसन फॅक्टरायझेशन प्रमेय, थॉम्पसन ऑर्डर सूत्र आणि क्वाड्रॅटीक पेअर.

थॉम्पसन यांना १९७० नंतर संकेतन सिद्धांत (Coding theory) या विषयात रुची निर्माण झाली. त्यातील एक प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे १० कोटिकेचे सांत प्रतल अस्तित्वात नसते, हे विधान सिद्ध करण्यासाठी लागणारी बीजगणितीय पार्श्वभूमी थॉम्पसन यांच्या योगदानामुळे निर्माण झाली.

थॉम्पसन यांनी कालांतराने गॅल्वा (Galois) गटांविषयी संशोधन सुरु केले. त्यामध्ये व्यस्त गॅल्वा समस्येबाबत (inverse Galois problem) त्यांनी भरीव कार्य केले. त्याशिवाय त्यांनी सांत गट हा गॅल्वा गट केव्हा असू शकतो याचा निकषही विकसित केला, ज्यामुळे महाकाय सांत गट गॅल्वा गट असतो हे सिद्ध झाले.

एफ.आर.एस. (Fellow of Royal Society), ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स हे बहुमानही त्यांना प्राप्त झाले. गणितातले सर्वोच्च बहुमानाचे फिल्ड्स मेडल थॉम्पसन यांना प्रदान करण्यात आले. त्याशिवाय सिनियर बर्विक प्राईज, सिल्वेस्टर मेडल, वुल्फ (wolf) प्राईज, अमेरिकेचे नॅशनल मेडल ऑफ सायन्स हे सन्मानही त्यांना देण्यात आले. आणखी एक बहुमान म्हणजे आबेल पुरस्कार देऊन थॉम्पसन यांच्या गणिती कार्याचा उचित गौरव करण्यात आला.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर