ग्रेग,आर्थर जेम्स : (१८ मे १९४४)

जेम्स ग्रेग आर्थर यांचा जन्म हॅमिल्टन, ओंटॅरिओ येथे झाला. टोरान्टो विद्यापीठाच्या बी.एस्सी. आणि एम. एस्सी. पदव्या संपादन केल्यानंतर त्यांनी येल विद्यापीठातून रॉबर्ट लॅंगलॅंण्ड्स (Robert Langlands) यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पदवी मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय Analysis of Tempered Distributions on Semisimple Lie Groups of Real Rank One असा होता. येल विद्यापीठात सहा वर्षे तसेच ड्यूक विद्यापीठात दोन वर्षे अध्यापन करून नंतर ते टोरान्टो विद्यापीठात प्राध्यापक झाले. तसेच त्यांनी चार वेळा अमेरिकेतील प्रिन्स्टन येथील सुप्रसिद्ध इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स स्टडीजमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले आहे.

आर्थर यांच्या अभ्यासाचे मुख्य क्षेत्र संवादी विश्लेषण (Harmonic Analysis) हे आहे. सममिती (Symmetry) ही संकल्पना गणितात खूप महत्त्वाची आहे आणि प्रतिरूपण सिद्धांतात (RepresentationTheory) सममितीचा सखोल अभ्यास होतो. या सिद्धांताची स्वयंरूपी प्रतिरूपण ही शाखा सममितीचा अंकगणिताशी आणि अंकशास्त्राशी असलेला संबंध विषद करते. या क्षेत्रातच आर्थर यांचा गाढा अभ्यास आहे. रॉबर्ट लँगलॅण्ड्स यांच्यासमवेत लँगलॅण्ड्स प्रायोजन (Langlands program) यावर काम करताना लॅंगलॅंण्ड्स यांची अटकळ प्रत्यक्ष गणिती सत्यापर्यंत नेण्याच्या वाटचालीत आर्थर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आर्थर-सेल्बर्ग संछेद सूत्र (Arthur-Selberg Trace Formula) हे त्यांचे आणखीन एक उल्लेखनीय योगदान मानले जाते. त्यांच्या नावाने विख्यात झालेली आर्थर अटकळ (Arthur Conjecture) हीदेखील त्यांची एक लक्षणीय कामगिरी होय. विशेष म्हणजे आर्थर पॅकेट्स या नावाने ओळखले जाणारे स्वयंरूपी प्रतिरूपणातील अटकळींचे जे वर्गीकरण त्यांनी केले आहे, ते या क्षेत्रातील सर्व अभ्यासकांना उपयुक्त आहे. आर्थर यांचे पुढील विषयांवर एकूण ६० हून अधिक दर्जेदार शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत:

  • Unrefined trace formula and truncation
  • Invariant trace formula and refined expansions
  • Stable trace formula and endoscopy
  • Characters, Hecke operators, L2-cohomology
  • Intertwining operators
  • Harmonic analysis and non-abelian Fourier transforms
  • Local trace formula and applications
  • Functoriality and classification of representations

याशिवाय त्यांचे संशोधनपर लेखन पुढील दोन ग्रंथांच्या रूपाने प्रकाशित झाले आहे.

  • Simple Algebras, Base Change and the Advanced Theory of the Trace Formula,1989.
  • The Endoscopic Classification of Representations: Orthogonal and Symplectic Groups, 2013.

आर्थर यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांमध्ये, वुल्फ पारितोषिक (Wolf prize) आणि अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीचा लेओरी पी. स्टील (Leory P. Steele) जीवनगौरव पुरस्कार उल्लेखनीय आहेत. याशिवाय कॅनडा येथील तीन संस्थांकडून एकत्रितपणे दिले जाणारे सीआरएम-फिल्डस-पीआयएमएस (CRM–Fields–PIMS) पारितोषिक, कॅनडाच्या रॉयल सोसायटीकडून जॉन एल. सिंज (John L. Synge) पारितोषिक आणि हेन्री मार्शल टोरी (Henry Marshall Tory) पदक हे सन्मान आर्थर यांना प्राप्त झाले. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठीचे कॅनडातील सर्वोच्च मानले जाणारे सुवर्णपदक त्यांना मिळाले. आर्थर सन कॅनडाच्या रॉयल सोसायटीचे आणि लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेसचे विदेशी मानद सदस्यत्व तसेच सन अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीचे सदस्यत्व त्यांना प्राप्त झाले.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर