व्हॉन, जोन्स एफ. आर. : (३१ डिसेंबर १९५२)

व्हॉन एफ. आर. जोन्स यांचा जन्म न्यूझीलंडमधील गिसबोर्न (Gisborne) येथे झाला. शालेय शिक्षणानंतर विद्यापीठाची प्रवेश शिष्यवृत्ती तसेच गिल्स शिष्यवृत्ती मिळवून तेथील ऑकलंड विद्यापीठातून बी. एससी. आणि एम. एससी. पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. त्यानंतर त्यांना संशोधनासाठी स्विस सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी जिनिव्हा विद्यापीठातून आन्द्रे हॅफ्लिंगर (Andre Haeflinger) यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी मिळवली. त्यांनी सादर केलेल्या Actions of Finite Groups on the Hyperfinite ll1Factor या शीर्षकाच्या प्रबंधाला वॅचेरॉन कॉन्स्टॅन्टिन (Vacheron Constantin) पारितोषिकही मिळाले. जोन्स यांची अध्यापनाची आणि संशोधनाची पुढील कारकीर्द मात्र अमेरिकेत झाली. प्रथम एक वर्षभर कॅलिफोर्निया विद्यापीठात आणि पुढे चार वर्षे पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकपदावर काम करून सन परत ते कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक झाले.

जोन्स यांचे संशोधनक्षेत्र मुख्यतः गणिती विश्लेषणातील वॉन न्यूमान बीजगणित हे आहे. या शाखेत त्यांच्यापूर्वी ॲलेन कोन्नेस (Alain Connes) यांनी सुरू केलेले संशोधन जोन्स यांनी यशस्वीपणे प्रगतिपथावर नेले. गाठ बहुपदींवर विशेष काम करून त्यांनी जे नाविन्यपूर्ण निष्कर्ष प्रस्थापित केले त्यांमुळे गाठ सिद्धांतातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळवणे सोपे झाले आणि त्याचमुळे अवमितीय संस्थिती (Low-Dimensional Topology) या शाखेतील संशोधनालाही गती मिळाली. गाठ बहुपदींमधील त्यांनी शोधलेली अविकारी बहुपदी (Invariant Polynomial) आता जोन्स बहुपदी (Jones Polynomial) या नावाने ओळखली जाते. त्यांच्या या संशोधनामुळे गाठींचे गणित या एकोणिसाव्या शतकात उदयास आलेल्या गणितशाखेचा संबंध संख्याशास्त्रीय यामिकी (Statistical Mechanics) या आधुनिक भौतिकी शाखेशी जोडला गेला; त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येत घटक असलेल्या गुंतागुंतीच्या प्रणालींच्या अभ्यासाला दिशा मिळाली. याच महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जोन्स हे फील्डस पदकाचे (Fields Medal) मानकरी ठरले.

जोन्स यांना संस्थिती शाखेतील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कार्याच्या सन्मानार्थ न्यूझीलंडच्या रॉयल सोसायटीचे पहिले रुदरफोर्ड पदक (Rutherford Medal) प्राप्त झाले. पुढे ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले आणि नंतर त्यांची लंडन मॅथेमॅटिकल सोसायटीचे मानद सदस्य म्हणून निवड झाली. अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीचे उपाध्यक्षपद त्यांना प्राप्त झाले.

जोन्स यांची दोन पुस्तके विशेष मान्यताप्राप्त आहेत. यापैकी Subfactors and Knots हे एक आणि दुसरे व्ही. एस.सुंदर या भारतीय गणितज्ञासह लिहिलेले Introduction to Subfactors हे आहे. जोन्स यांनी अनेक गणितविषयक आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांचे संपादक किंवा सहसंपादक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर