मशे, जिव्या सोमा : (२५ डिसेंबर १९३४ – १५ मे २०१८ ). वारली चित्रकला प्रकाराला सातासमुद्रापार नेणारे आणि भारतीय लोककलेच्या प्रांतात वारली चित्रकलेला मानाचे स्थान मिळवून देणारे चित्रकार. त्यांचा जन्म पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील गंजाड या खेड्यात झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांची आई निवर्तली. हा धक्का त्यांच्या बालमनावर आघात करून गेल्याने बरीच वर्षे ते बोललेच नाहीत. याचा परिणाम असा झाला की, ते सतत धुळीवर रेघोट्या मारत बसत असत. संवाद साधण्यासाठी ते या धुळीत काढलेल्या चित्रांचा वापर करीत. हळूहळू आजूबाजूच्या घरातील स्त्रियांना चौक रंगवण्यास ते मदत करू लागले. आदिवासी परंपरेमध्ये काही धार्मिक कार्य असल्यास घरातील भिंतींवर चौक रंगवण्याची पद्धत आहे. या चौक रेखाटनात एक चौकोनात देवीची प्रतीके व नित्य वापरातील काही वस्तूंचे चित्रण असते. या चित्र रंगवण्याच्या कामी शेजारच्या स्त्रियाही त्यांना प्रोत्साहन देत. परंतु स्त्रियांच्या कामात पुरुष मदत करतो हे तेथील काही लोकांना मान्य नव्हते, त्यामुळे त्यांना वाळीत टाकण्यात आले. तरीही मशे यांनी आपले चित्र रंगवण्याचे काम थांबवले नाही. मशे आपल्या चित्रकलेत कल्पनाशक्तीचा भरपूर वापर करीत. विविध प्राणी, पक्षी, झाडे, फुले यांचा चित्रात समावेश करून चित्रे काढत. त्यांची लक्षवेधक कला पाहून हळूहळू कटुता कमी झाली व चौक रंगवायला त्यांना बोलावले जाऊ लागले.
शेणाने सारवलेल्या भिंतीवर तांदळाच्या पिठाने देवीची प्रतीके आणि आजूबाजूच्या वस्तूंची चित्रे रेखाटणे ही वारली समाजाची परंपरा. साध्यासोप्या प्रतिमांचा वापर, कथनात्मक शैली आणि संस्कृतीचा अवकाश ही वारली चित्रशैलीची वैशिष्ट्ये होत.
१९७० मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या ‘अपना-उत्सव’ सोहळ्याकरिता लोककलांचा शोध घेतला जात होता. त्या वेळी वीव्हर्स सर्व्हिस सेंटरचे प्रमुख भास्कर कुलकर्णी यांच्या नजरेस मशे व तेथील काही स्त्रियांनी काढलेली ही चित्रे पडली. त्यांना हा चौक कलाप्रकार आवडला. त्यांनी या कलाकारांना दिल्लीला नेले. या कलाकारांकडून ही चित्रकला कागदावर उतरवली. अशा प्रकारे वारली चित्रकला जगासमोर आली.
केमोल्ड या मुंबईमधील गॅलरीतर्फे मशे यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन भरवले. हे चित्रप्रदर्शन खूप यशस्वी झाले आणि मशे यांच्या चित्रांना मागणी येऊ लागली.
मशे यांनी त्यांच्या चित्रांमधून आदिवासी जीवनशैली सोप्या आकारांमधून चित्रित केली. दिवाळी, होळी यांसारखे सण, मासेमारी, शेतीची कामे, विवाहविधी इत्यादी चित्रण यात उमटले. मशे यांची चित्रे परदेशांतही पोहोचली. चित्रांमुळे त्यांचा बाह्य जगाशी संपर्क वाढला, त्यामुळे त्यांच्या चित्रांत आगगाडी, हेलिकॉप्टर अशा प्रतिमा चित्रित होऊ लागल्या. शहरीकरणाचे जंगलांवर होणारे अतिक्रमण, शहरांच्या विकासासाठी चालू असलेली जंगलांची लूट इत्यादी चित्रविषय त्यांच्या चित्रांत दिसतात. पारंपरिक वारली चित्रे काढण्यापेक्षा त्यांनी जंगलांत भोवताली घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रियात्मक चित्रण केले. त्यामुळे त्यांची चित्रे आशयदृष्ट्या समकालीन वाटतात.
मशे यांना त्यांच्या वारली चित्रकलेतील योगदानाबद्द्ल अनेक मानसन्मान व पुरस्कार लाभले. १९७६ मध्ये त्यांचा सत्कार श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन करण्यात आला. त्याच वेळी मशे यांच्या आग्रहाखातर या चित्रशैलीचे नामकरण ‘वारली चित्रकला’ असे करण्यात आले. त्यांना दोन एकर जमीन पुरस्कार स्वरूपात दिली गेली. वस्त्र मंत्रालयाकडून २००२ मध्ये ‘शिल्प गुरू’ हा सन्मान त्यांना देण्यात आला. त्यांना २०११ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले ते पहिले आदिवासी कलावंत होत.
ख्यातनाम ब्रिटिश शिल्पकार व चित्रकार रिचर्ड लांग २००० मध्ये मशे यांच्याकडे येऊन राहिला, त्याने वारली जीवनाचा जवळून अभ्यास केला आणि मशे यांच्या चित्रासोबत स्वत:च्या चित्रांचे तुलनात्मक, संयुक्त प्रदर्शन भरवले. मशे यांच्या चित्रांचे रशिया, इटली, जपान, जर्मनी, चीन, बेल्जियम आणि इंग्लंड इत्यादी देशांतूनही प्रदर्शन भरविण्यात आले. तेथे त्यांनी वारली चित्रकलेच्या कार्यशाळाही घेतल्या. वारली चित्रकलेचा प्रसार व्हावा व होतकरू चित्रकारांना कामही मिळावे या हेतूने राज्यशासनातर्फे त्यांनी देशात अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या.
मशे यांचा विवाह पवनी यांच्याशी झाला. त्यांना तीन मुले व दोन मुली आहेत.
मशे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने डहाणू येथे निधन झाले. त्यांची दोन मुले सदाशिव आणि बाळू यांच्यासोबतच त्यांची नातवंडेदेखील हा कलेचा वारसा पुढे चालवीत आहेत.
संदर्भ
- बहुळकर, सुहास; घारे, दीपक (संपा.), शिल्पकार चरित्रकोश, साप्ताहिक विवेक ( हिंदुस्थान प्रकाशन संस्था ), मुंबई, २०१३.
https://www.youtube.com/watch?v=V_6QQY7zwfI
समीक्षक : मनीषा पोळ