बावा, जेफ्री : ( २३ जुलै १९१९ – २७ मे २००३ ) जेफ्री बावा हे श्रीलंकेतील प्रसिद्ध आर्किटेक्ट होते. त्यांच्या पिढीतील सर्वात प्रभावशाली आशियाई आर्किटेक्ट म्हणून बावा यांने नाव कमावले. जागतिक स्तरावर ‘उष्णकटिबंधीय आधुनिकतावाद’ (Tropical modernism) ही शैली बावा यांने अग्रेषित केली.

बावा यांचा जन्म ब्रिटीश श्रीलंकेत झाला. बावांचे वडील, न्यायमूर्ती बी.वी. बावा, मुस्लिम आणि इंग्रजी पालकांचे, एक श्रीमंत आणि यशस्वी वकील होते आणि त्यांची आई, बर्था मारियान श्रेडर मिश्र जर्मन, स्कॉटिश आणि सिंहली कुळातील होती. जेफ्रीचे मोठे बंधू, बेविस बावा, हे  प्रसिद्ध लँडस्केप आर्किटेक्ट होते. आर्किटेक्ट होण्याआधी बावा वकील होते. १९४४ साली बावा यांना केंब्रिज विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळाली. श्रीलंकेत परतून त्यांनी वकीली करण्यास सुरुवात केली. मात्र ते त्यात रमले नाहीत. त्यांना असे वाटे की त्यांचा स्वभाव वकीलीस योग्य नाही व त्या अक्षमतेमुळे कोणा निरपराध्याला शिक्षा होऊ नये. १९४८ साली बावा यांनी लुनुगंगाची जमीन विकत घेतली. तेथील घर व बाग डिझाइन करण्यात त्यांची रूची निर्माण झाली. हा प्रकल्प करताना त्यांची आर्किटेक्चर मधली आवड वाढू लागली व वयाचा ३८ व्या वर्षी १९५७ साली त्यांनी, ए.ए. लंडन मधून, आर्किटेक्चरची पदवी मिळवली. १९५८ मध्ये सिलोनला परतून, कोलंबो येथे मेसर्स एडवर्ड्स, रेड आणि बेग यात भागीदार झाले. १९५९ मध्ये डॅनिश वास्तुविशारद उलरिक प्लसेनर या कंपनीत सामील झाले. त्या नंतर या दोघांनी त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये अनेक इमारती एकत्र डिझाइन केल्या.  १९६७ मध्ये प्लेसनरने हे बेट सोडले.

श्रीलंकन ​​संसद भवन (१९८२)

बावा १९६० मध्ये श्रीलंका इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे सहकारी बनले. या शिवाय बावा (RIBA) रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सचे फेलो, अमेरिकन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट्सचे निवडलेले फेलो होते. १९८५ साली श्रीलंकेच्या अध्यक्षांकडून ‘विद्या जोति’ चे शीर्षक व  १९९३ साली ‘देशमानीय’ पदवी बावांना मिळाली. २००१  साली लाइफटाइम अचिव्हमेंट व आर्किटेक्चरच्या क्षेत्रात योगदानासाठी आगा खान स्पेशल चेयरमन्स अवार्डने  बावांना गौरविले गेले.

जेफ्री बावाचे लुनुगंगाची इस्टेट (१९४८), जेफ्री बावाचे कोलंबोचे घर (१९६०), बेंटोटा बीच रिसॉर्ट (१९६९), श्रीलंकन ​​संसद भवन (१९८२), रुहुना विद्यापीठ (१९८८), हेरिटेज कंडलमा हॉटेल (१९९४), लाइट हाउस हॉटेल, गॅाल (१९९७) ही बावांची जगप्रसिद्ध कामे बघायला आजही शेकडो विद्यार्थी, आर्किटेक्ट आणि पर्यटक गर्दी करतात.

रुहुना विद्यापीठ (१९८८)

बावा यांची डिझाइन शैली पाश्चात्य आर्किटेक्ट्सपेक्षा वेगळी आहे. श्रीलंकेच्या उष्णकटिबंधीय (tropical) वातावरणाची जाणीव ठेवून, परिसराला अनुरूप अशी डिझाइन्स त्यांनी केली. बावांचा कामावर कलोनियल व पारंपारिक सिलोनीज आर्किटेक्चरचा प्रभाव होता, परंतु त्यांनी प्रादेशिकता व पूर्वकल्पित फॉर्म जागेवर लादणे हे दोन्ही विचार नाकारला. बावा म्हणतात ‘आर्किटेक्चर शिकवले जाऊ शकत नाही, आपल्याला ते शिकावे लागते. आर्किटेक्चर चे काही जुने व दृढ नियम आपण पाळले पाहिजेत’, असे ते सांगतात.

१. ज्या गरजेमुळे इमारतीचा जन्म झाला आहे, कमित कमी ती गरज तरी संतुष्ट झाली पाहिजे,

२. इमारत ज्या जागी आहे त्या ठिकाणच्या वातावरणाला योग्य असावी,

३. तांत्रिक नियम –  बांधकाम साहित्याचा अभ्यास  करून, ते समजून घेऊन, हुषारीने वापर केला पाहिजे.

बावांच्या कामात छत या घटकाला विषेश महत्त्व होते. ते म्हणतात, ‘छत हा न बदलणारा घटक आहे- संरक्षणात्मक, जोरदार, सर्वात महत्वाचे – कोणत्याही काळात, कोणत्याही जागेवर सौंदर्यशास्त्र नियंत्रित करणारे. अनेकदा इमारत- छत, स्तंभ, फ्लोअरिंग – या साध्या घटकांनी बनली असते. यात छत हे प्रबळ, संरक्षक,आश्रयाचे समाधान देणारे असे असते. छत- त्याचा आकार, पोत आणि प्रमाण – हे सर्वात दृढ दृश्य घटक आहे.’

‘आपल्याकडे बांधकामाची एक अद्भुत परंपरा आहे जी आपण आता गमावली आहे. हे झाले कारण  लोक त्यांच्या स्वत: च्या चांगल्या अंतःप्रेरणेपेक्षा बाहेरील प्रभावांचे पालन करतात. निसर्गा कडे पाठ करुन आपणच निसर्गाला आपल्यापासून दूर लोटतो.’ बावांच्या कामात विद्यमान निसर्ग हा अतिशय महत्वाचा घटक होता.बावांच्या मते ‘आर्किटेक्चर शब्दात समजावून सांगणे अशक्य आहे, ते अनुभवायलाच हवे.

वयाच्या ८३ व्या वर्षी, वृद्धापकाळाने ते कोलंबो, श्रीलंका  येथे मरण पावले.

संदर्भ :

समीक्षक : श्रीपाद भालेराव