पार्डी, आर्थर बी. (१३ जुलै १९२१).
अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. पेशीचक्राच्या G1 प्रावस्थामध्ये मिळणाऱ्या निर्बंध बिंदूचा शोध, पाझामॉ प्रयोग आणि गाठींची वाढ व त्याचे नियंत्रण यासंबंधी कार्य.
पार्डी यांचा जन्म शिकागो, इलिनॉय येथे झाला. त्यांच्या घरातच विज्ञानाची परंपरा असल्यामुळे विज्ञान माझ्या रक्तातच आहे असे ते म्हणतात. लूई पाश्चर यांच्यावरील मायक्रोब हंटर्स या पुस्तकापासून त्यांनी विज्ञानाची प्रेरणा घेतली. जीवशास्त्राचे असे कदाचितच एकही क्षेत्र नसेल की, ज्यात पार्डी यांचे योगदान नाही आणि या सर्व कामांमुळे त्यांची सैद्धांतिक अंदाज बांधण्याची व त्यानंतर अभ्यासपूर्ण प्रयोग करण्याची समज वाढत गेली. पार्डी यांनी कॅलिफोर्नियाच्या बर्कली विद्यापीठातून विज्ञानातील पदवी १९४२ मध्ये तर पदव्युत्तर पदवी १९४३ मध्ये आणि डॉक्टरेट १९४७ मध्ये मिळवली. लायनस कार्ल पॉलिंग हे विसाव्या शतकातील सगळ्यात चांगले रसायनशास्त्रज्ञ समजले जात होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी डॉक्टरेट पदवी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून मिळविली (१९४७). डॉक्टरेट नंतरचे काम त्यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठ, मॅडिसन येथे केले. त्यानंतर ते १९४९ मध्ये जीवरसायनशास्त्राचे प्रशिक्षक म्हणून बर्कली येथे परत आले. पार्डी १९६१ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठात जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. १९७५ मध्ये ते बॉस्टन येथील डेना फार्बर कॅन्सर इन्स्टिट्यूट (१९४२) अँड हार्व्हर्ड मेडिकल स्कूल ( Dana-Farber Cancer Institute and Harvard Medical School) येथे जैविक रसायनशास्त्र आणि रेणवीय औषधनिर्माणशास्त्राचे (Biological Chemistry and Molecular Pharmacology) प्राध्यापक झाले. १९९२ मध्ये देना फार्बरमधून ते निवृत्त झाले. १९६८ पासून ते राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे (National Academy of Sciences) सभासद झाले.
१९७० च्या सुरुवातीला डॉ. पार्डी यांच्या लक्षात आले की, पेशीचक्राच्या G1 प्रावस्थामध्ये असा एक बिंदू आहे, की जेव्हा पेशी प्रावस्थामध्ये जाते. १९७४ मध्ये राष्ट्रीय विज्ञानपरिषदेच्या इतिवृत्तांतात (Proceedings of the National Academy of Sciences – PNAS) पार्डी यांनी या निर्बंध बिंदूबद्दल लिहिले. या निर्बंध बिंदुला ‘पार्डी बिंदू’ असेही म्हणतात.
पार्डी पॅरिस येथे फ्रांस्वा झाकॉब आणि झाक मॉनो यांच्याबरोबर १९५० मध्ये सुट्टीवर असताना ते एका प्रयोगात गर्क होते, ज्याला पाझामॉ (PaJaMo) प्रयोग असे संबोधले गेले. पुढे मोनिका रिले (Monica Riley) या विद्यार्थीनीबरोबर काम करीत असताना त्यांनी असे दाखवून दिले की, जनुक पेशीमध्ये शिरल्याबरोबर प्रथिने तयार व्हायला सुरुवात होते. जनुकांची माहिती प्रथिने तयार करण्यासाठी वापरताना रिबोसोमचे महत्त्व गृहीत धरले होते, परंतु पाझामॉ प्रयोगाप्रमाणे प्रथिने तयार करायला त्यांचा वेग कमी पडत होता. यावरून नवीन गृहीतक तयार झाले की, एम-आरएनए सारखा (संदेशक-आरएनएसारखा) आणखी एक आरएनए असला पाहिजे.
पार्डी यांनी गाठींची वाढ आणि त्याचे नियंत्रण यासंबंधी बरेच संशोधन कार्य केले आहे. यात संप्रेरकाला प्रतिसाद देणाऱ्या गाठींवर इस्ट्रोजेनचा परिणाम यासंबंधीचे कार्य आहे. पार्डी हे जीवरासायनिक संशोधनातील नवनवी तंत्रे विकसित करण्याबद्दलसुद्धा ओळखले जातात. पेशींमध्ये जनुके सक्रिय कशी होतात, हे समजण्यासाठी ही तंत्रे वापरली जातात.
पार्डी म्हणतात की, जेव्हा मी जीवरसायनशास्त्रात स्वतंत्र अभ्यास सुरू केला तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न होता की, रेणू येतात कोठून आणि जातात कोठे. जेव्हा त्यांनी आणि एडविन उम्बर्गर (Edwin Umbarger) यांनी असे स्वतंत्र रीत्या दाखविले की, जर आपण शेवटचे उत्पादन (end product) पुरविले तरच चयापचयाची प्रक्रिया थांबते आणि शक्ती वाया जाऊ दिली जात नाही. तो त्यांच्या दृष्टीने अत्त्युच्च आनंदाचा क्षण होता. परंतु हे कसे होते, ते कोणाला कळत नव्हते. जॉन गेरहार्ट (John Gerhart) ह्या त्यांच्या सहकाऱ्याने असे दाखवून दिले की, फीडबॅक इनहिबिशनने (feedback inhibition) काम करणारी वितंचके आणि त्यांचे नियमन करणाऱ्या जागांमुळे हे शक्य होते. डॉ. पार्डी यांचे हे योगदान रोमांचक व थरारक होते. (एखाद्या खाद्यपदार्थावर वितंचकाच्या प्रक्रियेद्वारे उत्पादक पदार्थ तयार होतो व तो जेव्हा एका विशिष्ट पातळीच्या वर साचू लागतो तेव्हा ती पेशी आपोआपच ते उत्पादन बंद करते. अशा रीतीने एखाद्या पदार्थाचे उत्पादन आणि त्याची पेशीला असलेली गरज यांच्यात जो समतोल राखला जातो त्याला फीड-बॅक इनहिबिशन पेशी नियंत्रण यंत्रणा असे म्हणतात.)
पार्डी यांची आई व बायको दोघी कर्करोगाने गेल्या. त्यामुळे आयुष्याची अर्ध्याहून अधिक शेवटची वर्षे पार्डी यांनी कर्करोगासाठी काम करण्यात घालविली. त्यांच्याप्रयोगशाळेत कर्करोगाविरुद्ध नवीन औषधे शोधण्याचेही काम होते. हे उपचार अवघड असले तरी त्यावर काम करण्याची गरज आहे असे ते म्हणतात.
पार्डी यांनी वेगवेगळ्या विषयांत मिळून १५०० पेक्षा अधिक शोधनिबंध लिहिले.
पार्डी यांच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्याला १९६१ मध्ये बर्कली विद्यापीठातून डॉक्टरेट मिळाली त्या ॲलन विल्सन (Allan Wilson) यांचा समावेश होतो. मोनिका रिले ही सुद्धा पार्डी यांची डॉक्टरेटची विद्यार्थिनी होती. तिचा एम-आरएनएच्या अभ्यासात सहभाग होता.
पार्डी यांना १९८० मध्ये पाजामो प्रयोगातील कार्यासाठी फेडेरेशन ऑफ अमेरिकन सोसायटीज फॉर एक्स्पेरिमेंटल बायॉलॉजीचे 3M पारितोषिक मिळाले.
संदर्भ :
- Arthur Pardee, From Wikipedia, the free encyclopedia, https://en.wikipedia.org/wiki/Arthur_Pardee
- American Association for Cancer Research, Fellows Detail,http://www.aacr.org
- The PaJaMo Experiment and the Lac I Repressor,Reflections of Bio Mole, December 7, 2012, http://reflectionsofabiomole.blogspot.in/
- Profile of Arthur B. Pardee, Ph.D., BioTechniques, Vol. 41, No. 6, December 2006, p. 659, http://www.biotechniques.com/BiotechniquesJournal/2006/December/Profile-of-Arthur-B.-Pardee-Ph.D./biotechniques-41202.html
- Leonard Norkin Virology Site, https://norkinvirology.wordpress.com/
समीक्षक – रंजन गर्गे