जामखेडकर, अरविंद प्रभाकर : (६ जुलै १९३९). प्राच्यविद्या पंडित तसेच वाकाटककालीन कला व स्थापत्यशास्त्राचे जाणकार म्हणून लौकिक. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झाला. त्यांचे वडील मालेगावच्या शाळेत शिक्षक होते. त्यांना संस्कृत विषयाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांच्या सहाही वडील बहिणी संस्कृत विषयात प्रवीण होत्या. त्यांचे शालेय शिक्षण मालेगाव येथे झाले. उच्च शिक्षणासाठी ते पुण्याला आले. बालमुकूंद लोहिया संस्कृत पाठशाळेत (आताचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ) त्यांचे संस्कृतचे पारंपरिक शिक्षण सुरू झाले. पुण्यातील वास्तव्याच्या सुरुवातीला त्यांच्यावर महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव व रामचंद्र नारायण दांडेकर यांसारख्या भारतविद्येच्या गाढ्या अभ्यासकांचा तसेच भागवत गुरुजी (वा. बा. भागवत) व धुपकर गुरुजी या संस्कृतप्रेमींचा मोठा प्रभाव पडला. या काळात त्यांनी वेदांबरोबर व्याकरण, मीमांसा यांसारख्या विषयांचेही अध्ययन केले. पुढे स. प. महाविद्यालय येथे पदवी अभ्यासक्रमासाठी संस्कृबरोबरच अर्धमागधी हा विषय अभ्यासला (१९५४-५८). यानंतर डेक्कन कॉलेज (तत्कालीन पुणे विद्यापीठांतर्गत) येथे पदव्युत्तर पदवीसाठी (एम. ए.) संस्कृत या प्रमुख विषयाबरोबर भाषाशास्त्र हा विषय त्यांनी घेतला (१९५८-६०). पुढे तेथील संस्कृत शब्दकोश प्रकल्पामध्ये तसेच वैदिक संशोधन मंडळाच्या आयुर्वेद कोशावरही त्यांनी काम केले. त्याच सुमारास ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ ह. धी. सांकलिया आणि शां. भा. देव यांच्या मागर्दशर्नाखाली नेवासा (१९६०-६१) आणि चांडोली (१९६१) या ताम्रपाषाणयुगीन पुरास्थळांच्या उत्खननामध्ये त्यांनी सहभाग घेतला. दरम्यानच्या काळात डेक्कन कॉलेजने ‘वसुदेवहिंडी : एक सांस्कृतिक अध्ययन’ (Cultural History from the Vasudevahindi) या विषयावर देव यांच्या मार्गदर्शनानुसार लिहिलेल्या प्रबंधासाठी त्यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान केली (१९६१-६६).

पुढे जामखेडकर यांनी अर्धमागधीचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या कला, विज्ञान आणि एम. एफ. एम. ए. वाणिज्य महाविद्यालय, धुळे येथे काम केले (१९६६-६८). यानंतर ते नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व या पदव्युत्तर विभागामध्ये अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले (१९६८-७७). या कालावधीत त्यांनी टाकळघाट–खापा (१९६८-६९), पौनी (१९६९-७१), माहुरझरी (१९७०-७१), भोकरदन (१९७२-७३), मांढळ (१९७५-७७) अशा अनेक पुरातत्त्वीय उत्खननांत सहभाग घेऊन त्यांपैकी काहींचे उत्खनन अहवाल लिहिण्यातही योगदान दिले. दरम्यानच्या काळात नेदरलँड सरकारची रेसिप्रोकल फेलोशीप ही अधिछात्रवृत्ती मिळवून त्यांनी आग्नेय आशियाच्या संस्कृतीचा अभ्यास केला (१९७१-७२). या काळात संस्कृत, अर्धमागधी, भाषाशास्त्र, कोशशास्त्र, पुरातत्त्व हा त्यांचा प्रवास कला आणि कलेतिहासाच्या दिशेने होऊ लागला. या सुमारास त्यांनी यूरोपातील अनेक वस्तुसंग्रहालये आणि कलास्तुसंग्रहालयांना भेट दिली.

जामखेडकर यांची महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग, मुंबईच्या संचालकपदी नियुक्ती झाली (१९७७—९७). येथील २० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी या विभागाच्या कार्यपद्धतीत काही आमूलाग्र बदल घडवून आणले, तसेच अनेक नवीन वस्तुसंग्रहालयांची स्थापना केली. दरम्यान त्यांनी स्वतंत्रपणे तसेच नागपूर विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, औरंगाबाद विद्यापीठ अशा विविध विद्यापीठांबरोबर अनेक पुरातत्त्वीय उत्खनने हाती घेतली. नैकुंड (१९७७-८०), माहुरझरी (१९७८-७९), नागरा (१९७९-८३), बोरगाव (१९८०-८१), खैरवाडा (१९८१-८२), भागीमाहिरी (१९८२-८४), हमलापुरी (१९८२-८३), चारठाणा (१९८२-८३), तेर (१९८३-८४, १९८७-८८ आणि १९८८-८९), कंधार (१९८४-८५), मांढळ (१९८४-८५), अगर (१९८४-८५), थाळनेर (१९८४-८५), दौलताबाद (१९८४-८५), मुलचेरा आणि विवेकानंदपूर (१९८७-९०), इर्ला (१९८९-९०), मांढळ (१९९१-९२), वाशिम (१९९२-९५) आणि पैठण (१९९४-९५) ही त्यांपैकी काही महत्त्वाची उत्खनने होत. याच काळात त्यांनी प्राचीन भारतीय वाकाटक राजवटी संबंधीत अनेक पुरातत्त्वीय पुरावे उजेडात आणले. यांपैकी रामटेक (नागपूर जिल्हा) व नागरा (गोंदिया जिल्हा) येथील  वाकाटककालीन मंदिरे हे प्रमुख पुरावे होत. या वाकाटक राज्यकर्त्यांचे पुराभिलेख, कला, साहित्य, शासनकाळ अशा अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले. त्यांच्या कार्यकाळातील सर्वांत मोलाचे योगदान म्हणजे १९९३ मधील लातूरजवळील किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतरचे पुरातत्त्वीय स्थळांच्या आणि स्मारकांच्या संवर्धनाचे कार्य. याच काळात महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेखागार खात्याचे संचालक म्हणूनही त्यांच्यावर तीन वेळा अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली (१९८३ ते १९९४ च्या दरम्यान).

राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर (१९९७ ते आजतागायत) अनंताचार्य इंडॉलॉजीकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये व के. जे. सोमय्या सेंटर फॉर बुद्धीस्ट स्टडीज्, मुंबई विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी प्राचीन भारतीय संस्कृती या विषयासाठी जामखेडकरांना सन्माननीय प्राध्यापकपद बहाल करण्यात आले आहे. तसेच मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष होते (२०१३-१७). सध्या ते या संस्थेच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य आहेत. त्यांनी येथे अनेक संशोधनात्मक उपक्रम सुरू करून संस्थेला मोठा लौकिक प्राप्त करून दिला. संस्थेच्या ग्रंथालयातील हस्तलिखितांच्या अध्ययनाचा संशोधन प्रकल्प हा त्यांपैकीच एक होय. संस्थेतील त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सदर संस्थेने रजत पदक देऊन त्यांचा सन्मान केला (१९८३-८८). तसेच एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. याशिवाय सौंदर्यशास्त्र, पुरातत्त्वविद्या, बौद्धविद्या, प्राचीन भारतीय कला आणि विज्ञान, नाणकशास्त्र, प्राचीन भारतीय संस्कृती इ. विषयांचे विविध अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठामध्ये सुरू करण्यात त्यांचे भरीव योगदान आहे. विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी विभागीय अध्यक्ष किंवा तत्सम नात्याने सहभाग घेतला (१९८० — २०१५). याशिवाय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या अजिंठा हेरिटेज कमिटीचे सदस्यसल्लागार, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या संवर्धन समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याच्या दर्शनिका विभागाच्या संपादक मंडळाचे सदस्य आदी जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या. सध्या ते मराठी विश्वकोश प्राचीन ऐतिहासिक काळ या ज्ञानमंडळाच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. याशिवाय विविध कोशांमध्ये नोंदलेखनाचे कामही त्यांनी केले आहे. मुंबई आणि नागपूर विद्यापीठांच्या १७ विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनानुसार पदव्युत्तर आणि विद्यावाचस्पती पदव्या बहाल करण्यात आल्या आहेत. त्यांची आजपर्यंत १२ पुस्तके व उत्खनन अहवाल, ५९ शोधनिबंध, विविध परिषदांमधील ४७ मराठी अध्यक्षीय भाषणे व लेख प्रसिद्ध झाले असून; संशोधनात्मक आणि ललित अशा दोन्ही अंगानी त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय ग्रंथांमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला अजिंठा (२००९) तसेच महाराष्ट्र राज्य दर्शनिका विभागाने प्रकाशित केलेला महाराष्ट्र : प्राचीन काळ, भाग १ – खंड २, महाराष्ट्र स्थापत्य आणि कला हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पुण्यातील संविद्या इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरल स्टडीज या संस्थेने जामखेडकर यांच्या सन्मानार्थ एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते (फेब्रुवारी २०१५). तसेच याच संस्थेने प्रत्नरत्नम हा त्यांच्यावरील गौरवग्रंथ प्रकाशित केला (२०१९).

कुशाग्र बुद्धी,  उत्तम स्मरणशक्ती आणि जिज्ञासूवृत्ती असलेल्या जामखेडकरांनी भारतीय संस्कृतीतील हिंदू, बौद्ध आणि जैन या तीनही धर्मपरंपरांवर विपुल लेखन केले आहे. उदा., वेद आणि सिंधू संस्कृती, शैव-वैष्णव-शाक्तपरंपरा, आदिती-लज्जागौरी, पाञ्चरात्र, स्मार्त व श्रौत परंपरा, मंदिरस्थापत्य, हीनयान व  महायान स्तूप, आग्नेय आशियातील भारतीय संस्कृती इत्यादी. सध्या ते दिल्ली येथील भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे अध्यक्ष आणि पुणे येथील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती म्हणून कार्यरत आहेत. तसेच स्कंदपुराणाच्या सह्याद्रीखंडाच्या विश्लेषणात्मक संपादनाचे त्यांचे कामही सुरू आहे.

संदर्भ :

  • Pandit, Suraj A.; Bhalerao, Manjiri & Khare, Ambarish,  Eds., Pratnaratnam, Essays in Honour of Dr. Arvind Prabhakar Jamkhedkar, Samvidya Institute of Cultural Studies, Pune, 2019.
  • Karnik, Mugdha, ‘Prof. Arvind P. Jamkhedkar – A biographical note’, Essays in Honour of Prof. Arvind P. Jamkhedkar, The Proceedings of the Workshop on Explorations in Maharashtra (6th July 2014) by Centre for Extra-Mural Studies, University of Mumbai, Page VI, (Kurush F. Dalal, editor), Published by India Study Centre Trust, Mumbai, 2017.
  • पंडित, सूरज अ. संपा., पाठक, अरुणचंद्र, ‘जामखेडकर, अरविंद प्रभाकर’, प्राच्यविद्या, शिल्पकार चरित्रकोश, खंड ८, भाग १, पृष्ठ क्र. १३८-१४०, पुणे, २०१८.

                                                                                                                                                             समीक्षक : अरुणचंद्र पाठक