चेंबरलँड, चार्ल्स एडवर्ड : (१२ मार्च, १८५१- २ मे, १९०८)

चार्ल्स एडवर्ड चेंबरलँड यांनी शालेय शिक्षण झाल्यावर पॅरिस येथील रोलीन महाविद्यालयामधे शिक्षण घेतले. तिथे त्यांनी गणिताचा विशेष अभ्यास केला. नंतर त्यांनी भौतिकीविज्ञान शाखेत पदवी घेतली आणि पॅरिसमधील लुई पाश्चर यांच्या प्रयोग शाळेत शिरकाव केला. गणित आणि भौतिक विज्ञान शाखेत शिक्षण घेऊनही त्यांच्या तंत्र आणि यंत्रामधील गती आणि आवडीचा उपयोग त्यांना पाश्चर प्रयोगशाळेत झाला.

प्रयोगशाळेत द्रव निर्जंतुक करण्यासाठी ते बकपात्रात ठेवून १०० अंश सेल्सियस तापमानास उकळले जाते. पण द्रव निर्जंतुक होत नसत. काही सूक्ष्मजीव आणि बीजपेशी त्या तापमानात मरत नसत. चेंबरलँड यांचा अंदाज होता की १०० अंश तापमान अपुरे ठरत असावे. मग तापमान १० ते २० अंशानी वाढवल्यावर सर्व जंतू मेले.

द्रव निर्जंतुक करून भागत नसे कारण ते ज्या पात्रात निर्जंतुक केले जात त्या पात्रात जंतू उरलेले असत. ही शक्यता लक्षात घेऊन चेंबरलँड यांनी पात्रेही निर्जंतुक केली. अशा तऱ्हेने पात्रे आणि द्रव दोन्ही निर्जंतुक करण्याची व्यवस्था चेंबरलँड यानी केली. चेंबरलँड यांनी निर्जंतुकीकरणासाठी ऑटोक्लेव हे पात्र तयार केले. ऑटोक्लेव उपकरण आजतागायत साऱ्या विश्वात निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाते.

ऑटोक्लेवमुळेच लुई पाश्चर यांना सूक्ष्मजीव सिद्धांत (जर्म थियरी) सिद्ध करणे शक्य झाले. १८७६ मधे लुई पाश्चर यांनी एका निबंधात चेंबरलँड यांच्या बहुमोल मदतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्या काळी चिनी माती किंवा वीट यामधून गाळलेले पाणी प्रयोगासाठी वापरले जाई. पिण्याचे पाणीही याच रीतीने शुद्ध केले जात असे. पण अशा गाळणीतून सूक्ष्मजीव निसटतात असा चेंबरलँड यांचा कयास होता. म्हणून जंतू गाळण्यासाठी त्यांनी चीनी मातीचे (पोर्सेलिन) गाळणे तयार केले. या गाळणीची छिद्रे सूक्ष्मजीवाणूंच्या आकारापेक्षा लहान होती. चहाच्या गाळणीतून जशी चहाची पाने गाळली जातात तसे या गाळणीतून जीवाणू गाळले जाऊ लागले. ही गाळणी स्वयंपाकघरातल्या नळांना बसवता येत असे. त्यामुळेच चेंबरलँड हे नाव शब्दशः घरोघरी पोहोचले. या गाळणीचे नावच चेंबरलँड पाश्चर गाळणी असे पडले. या गाळणीमुळे विषमज्वराच्या साथीत हजारो लोकांचे प्राण वाचले (१८९४). या गाळणीचा उपयोग करून पाश्चरनी घटसर्प आणि धनुर्वात यांची विषद्रव्ये शोधली.

कोंबड्यांना होणारा कॉलरा, मेंढ्यांमधील अँथ्रॅक्स या रोगांविरोधात पाश्चर यांनी लस तयार केली. ती लस तयार करण्यात सहसंशोधक  म्हणून पाश्चर यांनी चेंबरलँड यांचा गौरपूर्ण उल्लेख केला. फ्रेंच सरकारने चेंबरलँड यांना रेड रिबन: नाइट ऑफ  द लेजीअन ऑनर (Red Ribbon: Knight of the Legion of Honour) हा किताब दिला. पुढे त्यांना फ्रेंच संसदेत पाठवण्यात आले. तिथे त्यांनी लहान मुलांना सक्तीने लस टोचण्याचा कायदा केला. नंतर ते त्यांच्या राहात्या शहराचे महापौर झाले.

संदर्भ :

  • Horzinek, M.C., 100 years of virology, (1997).
  • Encyclopedia of Life Sciences

 समीक्षक : रंजन गर्गे