क्लूय्व्हर, अल्बर्ट यान : (३ जून, १८८८ – १४ मे, १९५६)

अल्बर्ट यान क्लूय्व्हर यांचा जन्म लेडन या नेदर्लंडमधील शहरी झाला. मारी होनिश आणि यान क्लूय्व्हर यांचा हा मुलगा. यान क्लूय्व्हर हे लेडन येथील विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते.  अल्बर्ट यान क्लूय्व्हर यांनी डेल्फ्ट येथील टेक्निकल विद्यापीठातून रसायन अभियांत्रिकीची पदवी मिळवली. पण नंतर मात्र त्यांना वनस्पतीशास्त्रात जास्त रस वाटायला लागला. त्यांनी जीवरसायनशास्त्राचा उपयोग करून शर्करायुक्त पदार्थांचे मोजमापन करण्याचे प्रयोग सुरू केले. यासाठी त्यांनी यीस्ट या एकपेशीय बुरशीचा उपयोग केला. यीस्टच्या श्वसन प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइडचे मोजमाप करून शर्करायुक्त पदार्थांचे प्रमाण मोजण्याची प्रक्रिया शोधून काढली. योग्य यीस्टचा उपयोग करून बऱ्याच वेगवेगळ्या शर्करायुक्त पदार्थांचे प्रमाण मोजता येऊ लागले. पुढे त्यांना डॉक्टरेट मिळाली. १९१६ ते १९२० च्या दरम्यान त्यांनी जावा व श्रीलंका येथे विविध विषयांवर संशोधन केले. त्यात नारळाच्या झाडावरील संशोधनाचा समावेश होता. १९२१ मध्ये क्लूय्व्हर यांना डेल्फ्ट विद्यापीठातील जीवाणूशास्त्राच्या विभागाचे प्रमुख म्हणून निमंत्रण आले. खरे तर तोवर क्लूय्व्हरना जीवाणूशास्त्रात फारसा अनुभव नव्हता.

क्लूय्व्हर यांनी जीवाणूमधील जीव रासायनिक क्रियांचा, विविध रसायनांच्या  व्यावसायिक उत्पादनासाठी उपयोग कसा करता येईल हे दाखवून दिले. त्यांनी ॲझेटोबॅक्टर या जीवाणूचा  सॉरबोज ह्या शर्केरेच्या उत्पादनात उपयोग करून दाखविला. जीवाणूमधील अमर्यादित जीवरासायनिक क्रियांचा रासायनिक संश्लेषणात उपयोग करण्याचा आरंभ येथूनच सुरू झाला.  या निमित्ताने त्यांनी जीवसृष्टीतील विविध जीवरासायनिक क्रियांचा अभ्यास केला.  क्लूय्व्हर यांनी डॉंकर या शास्त्रज्ञाबरोबर जीवरसायनशास्त्रातील एकात्मता हा त्यांचा जगन्मान्य शोधनिबंध प्रसिद्ध केला. जीवरसायनशास्त्रातील ऑक्सीकरण-क्षपण (Oxidation Reduction ) या प्रक्रियेचा सर्व जिवंत प्राण्यातील चयापचयाच्या क्रियेत कसा समावेश असतो हे दाखवून दिले. क्लूय्व्हर यांनी हायड्रोजनच्या देवाणघेवाणाचे जीवरसायनशास्त्रातील महत्व शोधून काढले व सर्व सजीव सृष्टीतील या क्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. हत्तीपासून तो जीवाणूपर्यंत सर्व सजीवांमध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियामधील समानता क्लूय्व्हर यांनी दाखवून दिली. जीवरसायनशास्त्रातील ही एकात्मता २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत इतकी सर्वमान्य झाली होती की ह्या सिद्धान्तामागे क्लूय्व्हर यांची संकल्पना व ते सिद्ध करण्याचे परिश्रम आहेत ह्याची नोंदपण घ्यायची तसदी शास्त्रज्ञमंडळी घेईनाशी झाली. व्हॅन नील (Van Niel) या शास्त्रज्ञाबरोबर प्रकाश संश्लेषणात पाण्याच्या परमाणुचे हायड्रोजन व ऑक्सिजनमध्ये विभाजन होऊन वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती होते हे सिद्ध केले. व्हॅन नील व क्लूय्व्हर यांनी जिवाणूंचे जीवशास्त्रातील स्थान यावर हार्वर्ड विद्यापीठात  व्याखाने दिली. त्या व्याख्यानांचे पुस्तक देखील प्रसिद्ध झाले. क्लूय्व्हर यांनी जिवाणूंच्या संवर्धनासाठी बऱ्याच पद्धती शोधून काढल्या. त्या आजही प्रचलित आहेत. डेल्फ्ट  येथे क्लूय्व्हर यांनी वेगवेगळया यीस्टचा संग्रह करण्यास सुरुवात केली.

क्लूय्व्हर यांना बरेच मान-सन्मान मिळाले. नेदरर्लंडमधील रॉयल सोसायटीचे ते सदस्य होते. त्यांनी नेदरर्लंडमधील नॅचरल सायन्स संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही सहा वर्षे काम बघितले. नेदरर्लंड सरकारचे सल्लागार, अगदी अणुऊर्जा क्षेत्रातील सल्लागार म्हणून पण त्यांनी काम केले. ह्या काळात त्यांचे संशोधन सुरुच  होते व त्यावरील शोध निबंध सुद्धा प्रसिद्ध होत होते.

क्लूय्व्हर यांनी शास्त्रीय संघटना निर्माण करण्यात व त्या चालवण्यात खूप मेहनत घेतली. अशा संघटनांचे संघटक व अध्यक्ष म्हणून देखील काम केले. क्लूय्व्हर यांना तुलनात्मक जीवाणूशास्त्राचा जनक मानले जाते व त्यासाठी त्यांना कॉपली मेडल प्रदान करण्यात आले.

क्लूय्व्हर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी  निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे