महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक बंदर. मुंबईपासून सु. ४५ किमी. दक्षिणेकडे रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीत कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर प्राचीन चौल बंदराचे अवशेष आढळतात. महाभारतात चंपावती किंवा रेवतीक्षेत्र म्हणून उल्लेखलेले चौल हे तिमुल्ल, सेमुल्ल, चेमुल्ल, चिमोलो, सैमूर, सिबोर, चेऊल अशा विविध नावांनी प्राचीन भारतीय वाङ्मयात प्रसिद्ध आहे. मुंबईजवळील कान्हेरी बौद्धलेणीसमूहातील इ. स. १३० या काळातील शिलालेखात ‘चेमुल्ला’ येथील सोनाराने कान्हेरी येथे बौद्धभिक्षूंकरिता विहार व पाणपोईसाठी देणगी दिल्याचे उल्लेख सापडतात. पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी या ग्रीक प्रवासवर्णनात प्राचीन कलियानच्या (सध्याचे मुंबईजवळील कल्याण) दक्षिणेस चौल येथे स्थानिक बाजारपेठ असल्याचे नमूद केले आहे. तसेच अरबी व युरोपियन प्रवाशांनीही चौलचा उल्लेख भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दोन मोठ्या बंदरांपैकी एक असा केला आहे.
डेक्कन कॉलेज, पुणे या अभिमत विद्यापीठातर्फे विश्वास गोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली चौल येथे २००२–२००६ या कालावधीत उत्खनन केले गेले. हे उत्खनन म्हणजे १९९८ पासून सुरू असलेल्या ‘भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्राचीन बंदरे व मानवी वस्त्यांचा अभ्यास’ याचा एक भाग होय. येथे प्राचीन वसाहतीचे व प्राचीन बंदराचे अवशेष खाडीलगत, तसेच नदीकाठी असलेल्या दोन किमी.च्या परिसरात आढळले. याच भागात चार विविध ठिकाणी मर्यादित उत्खनन केले गेले. या उत्खननातील पुरावशेषांचे समालोचन पुढीलप्रमाणे केले आहे : उत्खननात एकूण चार सांस्कृतिक क्रम उजेडात आले. यांतील पहिला कालखंड मौर्यकाळातील; दुसरा सातवाहन काळ; तिसरा शिलाहार आणि चौथा इस्लाम काळ असल्याचे दिसून आले. चौल हे बंदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक महत्त्वपूर्ण बंदर होते व ते सु. २००० वर्षे, सर्वसाधारणपणे इ. स. पू. ३०० ते इ. स. १७०० या कालावधीत सक्रिय होते, असे अनुमान केले गेले. असे असले तरी सातवाहन काळात हे बंदर सर्वोच्च शिखरावर होते, हे या काळातील उपलब्ध वैशिष्ट्यपूर्ण अवशेषांवरून दिसून येते. यांमध्ये घरांचे-जोत्यांचे अवशेष, घरांच्या छप्पर आच्छादनासाठीची कौले, सांडपाण्याचा निचरा होण्याकरिता खापरी विहीर, खूर असलेला दगडी पाटा, रोमन मद्यकुंभ, क्षत्रप राजवंशाचे शिशाचे नाणे, काळी आणि तांबडी भांडी इत्यादींचा समावेश होता.
चौल येथील उत्खननात तसेच पश्चिम भारताच्या संजान, केळशी येथील उत्खननांत प्रामुख्याने आढळलेले वैशिष्ट्यपूर्ण मणी व मृद्भांड्यांचे साधर्म्य पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील – किल्वा, मंडा, शंगा व क्वाना इत्यादी प्राचीन बंदरांत उपलब्ध झालेल्या – अवशेषांशी असल्याचे दिसून आले. यावरून इ. स. ८ वे ते १८ वे शतक या काळात भारताचा पूर्व आफ्रिका, तसेच प्राचीन मेसोपोटेमिया, पर्शिया, आशियातील चीन, जपान, कोरिया या देशांशी समुद्रमार्गे असलेला व्यापार व त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांची ये-जा, तसेच सांस्कृतिक संबंध अधोरेखित होतात. याव्यतिरिक्त येथील हमामखान्याजवळ झालेल्या उत्खननात ४.२२ मी. सांस्कृतिक थर असलेल्या उत्खनित खड्ड्यात मध्ययुगातील काचमण्यांचे उत्पादनकेंद्र असल्याचा पुरावा मिळाला व तेथून उत्पादनप्रक्रियेच्या विविध अवस्थांत असलेले ५१७ मणी मिळाले. हे मणी इण्डो-पॅसिफिक या प्रकारात मोडणारे असून यांत विविध रंगच्छटा आढळल्या. चौल येथील समन्वेषणात तसेच उत्खननातील पुराव्यांच्या आधारे प्राचीन व्यापारी बंदराला जी गुण-वैशिष्ट्यांची जोड लागते ती सर्व चौल येथील बंदरात होती, असे निश्चितपणे सांगता आले. त्याचप्रमाणे येथील वसाहतीचे अवशेष कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर सुमारे दोन किमी. अंतरापर्यंत विखुरलेले दिसून आले; तथापि वसाहतीचा निश्चित विस्तार विविध कारणांस्तव कळू शकला नाही. या बंदराने सुमारे दोन हजार वर्षे आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली, असे निष्कर्ष उत्खनकांनी काढले आहेत.
चौल बंदराचे महत्त्व इ. स. १७ व्या शतकानंतर लोप पावले. याला प्रामुख्याने दोन कारणे कारणीभूत ठरली आहेत. पहिले राजकीय तर दुसरे भौगोलिक. ब्रिटिशांचे सागरी व्यापारावर स्वामित्व होते व त्या अनुषंगाने मुंबई येथेच सागरी व्यापार एकवटला. पर्यायाने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील चौलसारख्या बंदरांचे महत्त्व घटले. या राजकीय कारणाशिवाय अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे कुंडलिका नदीच्या उजवीकडील भागात गाळ साचल्याने कालांतराने मोठे जहाज चौल बंदरात येण्यास असमर्थ झाले. याच्या परिणामी नदीचे पात्र बंदरापासून १ किमी. अंतरावर गेले व हे बंदर इतिहासजमा झाले.
चौल बंदराचा सर्वांगीण अभ्यास करण्याकरिता बहुप्रमाणित अभ्यासाची गरज उत्खनकांनी अधोरेखित केली आहे. यात पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील सर्व प्राचीन व फारशा परिचित नसलेल्या बौद्धधर्मीय शिलागृहांचे तसेच प्राचीन अभिलेखात उल्लेखिलेल्या स्थळांचे समन्वेषण, प्राचीन बंदरांची उत्खनने, उत्खननांतील पुराव्यांचे विश्लेषण व प्राचीन व्यापारी मार्गांचा अभ्यास या सर्व बाबींचा सविस्तर ऊहापोह केला आहे.
संदर्भ :
- Deotare B. C.; Joshi, P. S. & Parchure, C. N. Glimpses of Ancient Maharashtra Through Archaeological Excavations, Pune 2013.
- Gogte, V. D. ‘Ancient Port at Chaul : Semulla of the Periplus of the Erythrean Seaʼ, Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, 66 : 161-182, Pune, 2006-07.
- Gogte, V. D. ‘Discovery of Ancient Port of Chaulʼ, Man and Environment, 28 (1) : 67-74, 2003.
समीक्षक – विश्वास गोगटे